नोकरी सोडून परांजपे दंपतीने उभारला कोट्यावधींचा काजूप्रक्रिया उद्योग, कोकणातील शेकडो बेरोजगारांना गावातच दिला रोजगार

‘उद्योगात वसते लक्ष्मी’ चा प्रत्यय देणारा कोकणातील ‘परांजपे अॅग्रो प्राॅडक्टस प्रा लि' चा काजूप्रक्रिया उद्योग!

नोकरी सोडून परांजपे दंपतीने उभारला कोट्यावधींचा काजूप्रक्रिया उद्योग, कोकणातील शेकडो बेरोजगारांना गावातच दिला रोजगार

Tuesday October 04, 2016,

6 min Read

एक काळ असा होता की, कोकणातील प्रत्येक घरातून किमान एक व्यक्ती तरी रोजगारासाठी गावापासून दूर मुंबई-पुण्यात किंवा अन्य ठिकाणी जात होती. आणि गावातील बहुसंख्य घरांचा उदरनिर्वाह त्यांनी पाठविलेल्या मनीऑर्डरवर होत असे. पण आज चित्र पालटले आहे, आडिवरे सारख्या राजापूर तालुक्यातील आडगावातुन कोट्यावधींच्या उलाढालीचा काजू प्रक्रिया उद्योग चालवला जातो आणि येथील उत्पादने देशात विदेशात बाराही महिने पाठविली जातात. त्यातून कोकणाच्या ‘समृध्दी’ चा नवा मार्ग इथल्याच मातीतल्या कष्टक-यांच्या हाती असल्याचे वास्तव जगासमोर येते.

 

 


होय आपण समृध्दी आणि ऋषीकेश या परांजपे दंपतीच्या उद्यमशिलतेबाबत बोलतोय, सात वर्षात या युगलाच्या अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीतून यंदा सुमारे पंधरा कोटी रुपयांची उलाढाल त्यांच्या उद्योगात होणार आहे, शिवाय सुमारे २०० जणांना (त्यात बहुतांश महिला आहेत) बारमाही रोजगाराची संधी मिळते आहे. युअर स्टोरीच्या वाचकांसाठी परांजपे अॅग्रो प्राॅडक्टसच्या ऋषीकेश परांजपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या शुन्यातून तयार केलेल्या विश्वाबाबत भरभरून सांगितले. एका व्यावसायिक पार्श्वभुमी नसलेल्या आणि नोकरीपेशा करणा-या जोडप्याने तरूण वयात उद्योगाची जोखीम स्विकारून तो कसा यशस्वी केला हे सांगताना ऋषीकेश यांचा आग्रह असा होता की, आमची ही उद्यमकहाणी एेकून आणखी काही जणांना प्रेरणा मिळावी. ते म्हणाले की, “सचीन तेंडूलकर यांच्या सारखे माझे पायही जमीनीवर राहावेत असे मला वाटते, त्यामुळे सध्याचे हे यश यश नाही, अद्याप ते मिळवायचे आहे आणि हा उद्योग किमान पाचशे जणांना रोजगार देणारा करता येईल का यासाठी काम करायचे आहे”.

image


त्यांच्या या उद्योगाच्या प्रेरणा आणि प्रारंभाबाबत सांगताना परांजपे म्हणाले की, लहानपणापासून माझ्या मनात उद्योगाबाबतचे आकर्षण होते नोकरी करतानाही आपल्याला किती कमाई होते त्यापेक्षा आपल्याला पगार देणा-या मालकाने किती कमाई केली याचा विचार येत असे आणि त्यातून आपणही असे काहीतरी करावे ही इच्छा बळावत गेल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणी शालेय वयापासून अनेक लहानमोठी कामे करताना बिर्ला महाविद्यालयात शिक्षण घेतले. आणि पटणी, टाटा कन्सल्टंन्सी सर्विसेस सारख्या नामवंत उद्योगात नोकरी देखील केली मात्र मनात ‘यातून काही समाधान नाही, उद्योगच केला पाहिजे’ हा विचार मनात जोर करत होता असे ते म्हणाले. त्यामुळे सन २००९च्या सुमारास नोकरी सोडून उद्योगास सुरुवात करायची आणि काजू प्रक्रिया उद्योगात उतरायचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतला त्यावेळी पत्नी आणि मी दोघांनी नोकरी सोडून मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यातील आडिवरे गावी जाण्याचा निर्णय घेतला. “तो निर्णय दोघांच्याही घरच्यांना पटवताना कठीण गेले, पण त्यांनी अंती सहकार्य करायचे ठरविले अणि उद्यमयात्रा सुरू झाली.” ऋषीकेश म्हणाले. यामागचे कारणही तसेच होते नुकतेच लग्न झाले होते आणि घरच्या कौटुंबिक जबाबदा-या होत्या त्यावेळी असा निर्णय घेणे धाडसाचे होते.

image


ते म्हणाले की, “कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते मात्र त्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात गेल्या अनेक वर्षापासून फारच थोड्या प्रमाणात काम केले जाते, त्यामुळे येथील काजूबिया कर्नाटकात जातात आणि तेथे त्यावर प्रक्रिया केली जात हे समजले तेंव्हा असा विचार केला की जर त्यांना तेथे हा उद्योग परवडतो तर इथे आपण केला तर का परवडणार नाही”. वडिलोपार्जित जागा होती त्यांनतर उद्योगासाठी परवानगी घेणे इत्यादी प्रक्रिया पूर्ण करत २०११मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

image


“सुरुवातीच्या दोन वर्षात प्रचंड संघर्ष केला, या काळात घरात लहानपणापासून असलेल्या बचत करण्याच्या आणि आहे त्यात समाधान मानून पुढचा मार्गक्रमण करण्याच्या संस्कारांचा उपयोग झाला असे ते सांगतात. उद्योगात मित्र-परिवाराची साथ होतीच मात्र तरीही अनेक गोष्टीना आपण स्वत:च सामोरे जात असतो हा अनुभव आला असे ते म्हणाले. बँकाकडून कर्ज मिळण्यात अनेक अडचणी होत्या उद्योगात यापूर्वी असलेल्यांकडून चांगला अनुभव नसल्याने उद्योगाबाबत लोकांच्या मनात नकारात्मकता होती. मात्र अशा स्थितीत काम सुरू झाले आणि हळुहळू कामातून नवा विश्वास अनुभव आणि उमेद निर्माण होत गेली. ऋषीकेश म्हणाल की, “चमत्काराशिवाय नमस्कार नाही या म्हणीचा प्रत्यय यावेळी आला. कौतुक खूप लोक करत होते, गावात परत येऊन उद्योग करण्याच्या धाडसाबाबत होणा-या कौतुकानंतरही अनेक वास्तव प्रश्न आणि समस्या मात्र आपल्या आपणच सोडवायच्या आहेत हे समजत गेले. कारण स्वत:च्या मदतीसाठी स्वत:च काहीतरी करावे लागते.” आर्थिक विषयांची माहिती होती आणि समाजात, नातेवाईक मित्रपरिवारात विश्वास होता त्यामुळे अनेकांचे अशिर्वाद, मदत होत गेली आणि पाच वर्षात काम पुढे जात राहिले. उत्पादनाचा दर्जा आणि सातत्य टिकवून ठेवले त्यातून छेडा ड्रायफूट, स्टेटस, आस्वाद सारख्या ग्राहकांची पसंती मिळाली. या काळात ब-याचदा चुकाही झाल्या, समस्या आल्या पण त्यातून नवे काहीतरी शिकत एकमेकाना धीर देत पुढे जात राहिलो. मग उद्योगातील काही उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला, त्यात घरच्यांची मदत झाली." असे परांजपे सांगतात.

image


परांजपे अॅग्रो प्राॅडक्टस प्रा लि मध्ये काजूंची ३२ प्रकारे वर्गवारी केली जाते आणि काजू विकला जातो. त्याचप्रमाणे काजूंना वेगवेगळे फ्लेवर्स दिले जातात, जसे चटपटा, मन्चुरीयन, चीज, पुदिना यासारखे १५ वेगवेगळे फ्लेवर्स येथे तयार करून बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. ग्राहकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 काजुच्या गरानंतर टरफले वाया जात असत, त्यातूनही तेल काढता येते हे माहिती होते मात्र त्यावर प्रक्रिया केली पाहिजे हे ज्ञान झाले आणि तो प्रकल्पही सुरु झाला, इतकेच काय चोथा देखील विकला जाऊ लागला. याबाबत सांगताना ते म्हणाले की, “ पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांचे एक भाषण ऐकायला मिळाले त्यात त्यांनी कोकणात काजूच्या टरफलांपासून तेल काढण्याच्या उद्योगाबाबत काम करण्याचा सल्ला दिला होता आणि योगायोगाने आम्ही त्यापूर्वीच हा उद्योग सुरू केला होता त्यामुळे आपली दिशा योग्य असल्याचे समाधान मिळाले”. परांजपे यांचा अशा प्रकारचा तेल काढण्याचा प्रकल्प देशातला सातवा प्रकल्प आहे आणि या तेलाला चांगली मागणी आहे. संगणकांच्या माध्यमातून याबाबत अभ्यास केला माहिती घेतली, त्यांच्या बहिणीने नुकतीच पीएचडी केली आहे तिने काही मोलाची माहिती संकलित करून दिली आणि तेल काढण्याच्या या नव्या उद्योगात आता चांगला जम बसला आहे असे ते म्हणाले.

image


देशांतर्गत काजूला चांगली मागणी आहे आणि जरी हे उत्पादन निर्यात प्रधान असले तरी त्याला जास्त स्पर्धा देशाबाहेर असल्याने फारसा भाव नाही, तरीही न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया पर्यंत येथला काजू जातो असे ते म्हणाले. मुख्यत: मुंबई दिल्ली, उत्तरेतील राज्य काश्मीर पर्यंत या काजूला मागणी असते. गेल्या वर्षी या उद्योगाने आठ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि यंदा ती १५ कोटीच्या घरात जाण्याची अपेक्षा आहे असे परांजपे सांगतात.

भविष्यातील योजनांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “आज जेंव्हा हा उद्योग पाहण्यासाठी देशातून लोक येतात त्यावेळी आपण यापुढे जाऊन आणखी मोठा प्रक्रियादार, निर्यातदार व्हायचे आहे याचे भान असते”. आज २०० जणांना रोजगार देणा-या या उद्योगातून त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात काही चांगले होताना दिसते त्यावेळी आपल्या या धोका स्विकारण्याच्या निर्णयाबाबत समाधान वाटते असे ते म्हणाले. 

या पुढच्या काळात किमान पाचशे जणांना रोजगार देता यावा इतका विस्तार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ऋषीकेश आणि समृध्दी परांजपे यांच्या या उद्यमतेची माहिती घेऊन अनेकांना आपणही काही करावे यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते,पण तुमचे या सा-या मेहनती मागचे प्रेरणास्थान कोण आहे असे विचारता ते म्हणाले की, खूप जणांचा हातभार या कार्याला लागला ते सगळेच प्रेरणा आहेत, पण सचीन तेंडुलकर यांनी एकदा येथे यावे आणि हे काम पाहून कौतुक करावे असे वाटते कारण त्याच्या व्यक्तीमत्वाची पहिल्यापासून ओढ वाटते आणि लाखो चाहत्यांनी त्यांना देवत्व दिल्याने त्यांच्यासारखे आपल्या क्षेत्रातही काहीतरी भव्य करावे ही प्रेरणा मिळते असे परांजपे म्हणाले.

उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी ही उक्ती ‘परांजपे उद्योगाने अक्षरश: खरी करून दाखविली आहे. ज्या कोकणातल्या छोट्याशा गावात कोट्यावधीच्या समृध्द उद्योगाचा पाया त्यांनी घातला आणि समर्थपणाने अगदी तरूणवयातच हा उद्योग विस्तारत जगभरातून त्याला लोकमान्यता मिळवून दिली त्याला तोड नाही, त्यांच्या या कार्याला युअर स्टोरीच्या शुभेच्छा! 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

    Share on
    close