मेक इन इंडिया 'हवाईजादा'

मेक इन इंडिया 'हवाईजादा'

Sunday February 14, 2016,

4 min Read

सध्या कॅप्टन अमोल यादव यांचा दिवस मीडियाच्या गराड्यात जातोय. दिवसभर मीडियातल्या रिपोर्टर्सना मुलाखती देणं. हिंदी, इंग्रजी आणि मराठी तीनही भाषेतल्या टेलिविजन चॅनल्सवर अमोलची मुलाखत झळकतेय. एमएमआरडीए ग्राऊंडवरच्या मेक इन इंडियाच्या गेट नंबर तीन मधून आत गेलं की कॅप्टन आनंद यादव यांनी बनवलेलं छोटेखानी विमान दिसतं आणि या विमानाच्या भोवती जमलेल्या गर्दीत दिसतात कॅप्टन अमोल यादव. गर्दीतल्या रिपोर्टर्सना मुलाखती देताना, आलेल्या लोकांना आपल्या या विमानाची माहिती देताना, त्यांच्याबरोबर फोटो काढताना. हे सर्व करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा जाणवत नाही. काल परवापर्यंत अमोल फक्त हवाई सेवा कंपनीतले डेप्युटी चीफ पायलट होते. आज अमोल यादव यांचं नाव जगभरात पोचलंय. अचानक त्यांच्याभोवती मीडिय़ाचा गराडा झाला आणि ते सेलिब्रेटी बनले. मेक इन इंडिया या मुंबईतल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उभं असलेलं त्यांनी बनवलेलं हे सहा आसनी विमान मेक इन इंडियातलं एक महत्वाचं आकर्षण बनलंय.


image


अमोल सांगतात,” इथं आलेला प्रत्येक जण आमच्या या विमानाकडे आपलं विमान म्हणून पाहतो. त्या समोर उभा राहून फोटो काढतो, ते ही अगदी अभिमानाने. मला याचंच जास्त कौतुक वाटतंय. गेल्या दोन दिवसांत मला आठवत नाही की मी किती जणांना मुलाखती दिल्या. किती जणांनी माझ्याबरोबर फोटो काढले, विमानासमोर फोटो काढले, सेल्फी काढले. पण एक गोष्ट जाणवली की भारतात बनलेल्या या छोटेखानी विमानाबद्दल लोकांना उत्सुकता आहे. गेल्या १७ वर्षात घेतलेल्या मेहनतीचं आता कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटलं. मेक इन इंडीयातलं हे माझं विमान आता लवकरच उडेल याची मला खात्री वाटते आहे. ”

image


मेक इंन इंडियाचं खास आकर्षण बनलेल्या या विमानाला भेट देण्यासाठी सचिन जिंदालसारखे मोठे उद्योजकही येत आहेत. शिवाय ऱाजकीय नेत्यांसाठी ते खास आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. अनेकांनी या विमानातून एकदा आकाश सफऱ करण्याची इच्छा बोलून दाखवली. “ अऩेक जण येऊन या विमानाची माहिती घेत आहेत. आम्हाला या प्रदर्शनाचा चांगलाच फायदा झालाय. हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचं विमान आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून यावर काम करतो आहोत. आम्हाला हवाई सफऱ करण्याची परवानगी लवकरच मिऴेल असा विश्वास त्यांनी व्यक केला. संबंधित सरकारी विभागाशी आमची चर्चा सुरु आहे. तो सर्व प्रक्रियेचा भाग आहे, पण आज तर आम्ही खूप आनंदी आहोत की आम्ही जे१७ वर्षांपासून जे स्वप्न पाहिलं ते आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.” अमोल सांगत होते.

image


यह सफर बडा कठिण था लेकीन....

अमोल हे पायलट आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते जेट एयरवेजमध्ये काम करतायत. हवेत उडण्याचं लहानपणापासूनचं त्याचं स्वप्न, पण त्याच बरोबर आणखी एक स्वप्न त्यांनी पाहिलं. स्वताहून बनवलेल्या विमानात हवाई सफर करण्याचं. ते ही सतरा वर्षांपूर्वी. १९९५ मध्ये अमेरिकेत प्रशिक्षणासाठी गेलेले असताना हवाई सफरीसाठी अनेकजण अश्या छोट्या विमानांचा वापर करत असल्याचं अमोल यांच्या लक्षात आलं. त्यावेळी भारतातही अशाप्रकारे छोटी विमानं बनवू शकतो असं त्यांच्या मनात आलं आणि एका ध्यासपर्वाला सुरुवात झाली. विमानाचा एक भाग तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली. डिजाईन काय असेल, कसं असेल याचे आराखडे तयार होऊ लागले. १९९८ मध्ये तसा प्रयत्नही झाला. विमान बनवण्याच्या ध्यासानं झोप उडाली होती. पण ते प्रयत्न तेवढे यशस्वी झाले नाहीत. पण ते निराश झाले नाहीत. नव्यानं कामाला लागले. २००९ मध्ये पुन्हा विमान बांधणीला सुरुवात झाली. चारकोप इथं राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवरच ही बांधणी होत होती आणि गेल्या पाच वर्षांत हे विमान आता परिपूर्ण आकाराला आलंय. यातलं सर्व साहित्य लाखो रुपये खर्च करुन आणण्यात आलं आहे. आज हे विमान प्रति मिनिट १५ हजार फूटाचं अंतर या वेगानं १३००० फूट उंचीवर उडू शकतं. १८५ नॉटीकल माईल्स प्रति तास या वेगानं २००० किलोमीटरपर्यंतचं अंतर गाठू शकतं. या विमानाचं वजन १४५० इतकं आहे. ज्यात एल्युमिनियमचा वापर करण्यात आलाय. या विमानाला नाव देण्यात आलंय TAC003. या विमानाला भारतीय हवाई उड्डान मंत्रालयाकडून उडवण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला आहे. हिंदूस्तान एरोनॅटीक्स लिमिटेडनं या विमानाला सर्टीफिकेशन दिलं आहे. यामुळं आता लवकरच या विमानाला प्रत्यक्षात उडवण्याची संधी मिळेल असा विश्वास अमोल यादव यांना वाटतोय.

image


सातारा ते मेक इन इंडिया.

अमोल मुळचे साताऱ्याचे. वडील शिक्षक, घरची परिस्थिती अगदी सर्वसामान्य. पायलट बनावं हे वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. पण तिथपर्यंतच मर्यादित न राहता पुढे स्वत:ची विमानं बनवण्याची कंपनी सुरु करण्याची त्याची इच्छा आता पूर्ण होताना दिसतेय. विमानात लावलेलं इंजिन आणि नेवीगेशन सिस्टम बसवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार होता. त्यासाठी कुटुंबियांनी घरातले दागिने विकले. “ माझ्या या प्रयत्नात कुटुंब आणि मित्रांचा फार महत्वाचा वाटा आहे. एक वेळ अशी होती की मला वाटलं आता हे काय आपल्याला जमत नाही. त्यावेळी परिवाराने, मित्रांनी मानसिक आधार दिला. प्रोत्साहन दिलं. हे सर्व यश त्याचं आहे. आणि ज्यांनी हे बनण्यासाठी मार्गदर्शन केलं त्या एयर मार्शल मुरली सुंदरम याचं देखील आहे".

image


अमोल आणि त्यांच्या मित्रांनी मिळून थर्स्ट एय़रक्राफ्ट कंपनी सुरु केलीय. ही कंपनी भारतात छोटेखानी विमान बनवणारी पहिलीच कंपनी आहे. डिडीसीएकडून परवानगी मिळाल्यानंतर या विमानाचं उड्डान होईल त्यानंतर कंपनीनं अनेक आराखडे आखलेत. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातल्या कंपन्यांबरोबर करार करण्याचा त्यांचा विचार आहे. शिवाय अऩेकांना वैयक्तिक वापरासाठी हे वापरता येईल का याची विचारणा केलेली आहे. पण ते डीजीसीएच्या चाचणीनंतरच शक्य आहे. अमोल सांगतात “ ही तर सुरुवात आहे. पण हे विमान उडणार. आणि मीच ते उडवणार” हा विश्वास १७ वर्षांच्या कठोर मेहनतीतून आलेला आहे. सध्या मेक इन इंडियाचा आकर्षण बनलेलं हे विमान जगाची सफर करण्यासाठी सज्ज झालं आहे. हे मात्र निश्चित.....