शिवरायाच्या महाराष्ट्रात गिर्यारोहणाला साहसी खेळाचा दर्जाच नाही, तरीही यशाच्या शिखरांना साद घालत आहेत अरूण सामंत मंडळाचे हे “क्लायंबर्स”!

शिवरायाच्या महाराष्ट्रात गिर्यारोहणाला साहसी खेळाचा दर्जाच नाही, तरीही यशाच्या शिखरांना साद घालत आहेत अरूण सामंत मंडळाचे हे “क्लायंबर्स”!

Monday December 21, 2015,

4 min Read

गेल्या काही वर्षात ‘हि मँन’ ‘स्पायडर मँन’ अशा अचाट हिरोंच्या करामतींना पाहताना आपल्यालाही त्यांच्यासारखे स्टंट करता यावेत असेच अबाल-वृध्दांनाही वाटते. गिर्यारोहण किंवा प्रस्तरारोहण उंच डोंगरकडे सर करण्यात एक साहस आणि कला असते. या खेळात माणसाच्या मन आणि शरीरातील क्षमतांची कसोटी लागते. साहसी खेळांच्या यादीत अग्रेसर असला तरी या खेळाला अधिकृत ओळख सध्या महाराष्ट्रात सरकारदरबारी नाही त्यामुळे तो उपेक्षीत राहिला आहे. अनेक देशी खेळांना व्यावसायिक स्वरुप आणि लौकीक मिळत असताना परंपरेने चालत आलेल्या या मराठमोळ्या खेळाला आणि खेळाडू तसेच त्यासाठी प्रयत्नरत असलेल्यांना किती झगडून त्याच्या अस्तित्वाची झुंज घ्यावी लागते आहे याची जाणीव‘अरूण सामंत प्रस्तरारोहण मंडळा’चे काम पाहिले की येते.

image


मुंबईत सामान्य –मध्यमवर्गीयांच्या, झोपडीत राहणा-या मुलांच्या मनात या खेळाचे वेड आहे. त्यासाठी त्यांना ना पालकांचा पाठिंबा, ना कुणाची मदत मिळते पण म्हणतात ना जिद्द असेल तर सारे काही शक्य आहे, चारुहास जोशी, महेश देसाई, उदय कोळवणकर, राजेश गाडगीळ, नंदू चव्हाण, कै.प.बा सामंत, गिरिश सामंत, सुकन्या सामंत अशा क्रीडाप्रेमींच्या बळावर हीच मुले आज विदेशातील स्पर्धांमध्ये जाऊन या खेळातील प्राविण्याचे प्रदर्शन करताना दिसत आहेत. अनिश्चिततेच्या वातावरणात त्यांना या खेळाचे धडे देणारे राहूल पेंडसे, प्रमोद चव्हाण, स्वप्निल जाधव, आकाश गायकवाड, पुनम कांबळे असे प्रशिक्षक देखील मिळाले आहेत.

जयप्रकाश नगर मधील नंदादीप मराठी शाळेच्या पटांगणावर मुंबईतील सन २००३ मध्ये अस्तित्वात आलेली ही ‘वॉल’ उभी आहे. येथे महापालिकेतील नोकरी सांभाळून गेली अनेक वर्ष प्रशिक्षकाचे काम स्वयंस्फूर्तीने करणा-या राहूल पेंडसे यांची ‘युवर स्टोरी’ने भेट घेतली असता त्यांनी या उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, “कै.अरूण सामंत हे गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील प्रेरणा होते त्यांच्याच स्मरणार्थ सन २००३मध्ये ही वॉल त्यांच्या कुटूंबियानी आणि या खेळावर प्रेम करणाऱ्यांनी उभारण्यास सहकार्य केले.” यामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत स्पोर्टस क्लायंबिंग, आणि माऊंटनिंग. सध्या या ४३फूट उंचीच्या वॉलवर शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो आहे तरी दुनियाभरात या खेळाचा जो विकास झाला आहे त्या तुलनेत आपण वीस वर्षे मागे पडलो आहोत. कारण एकूणच खेळ या विषयाबाबत अनास्था हेच आहे. राहूल म्हणाले की, घरच्यांच्या, पालकांच्या मुला़कडून अपेक्षा असतात त्या त्याने चांगले शिक्षण घ्यावे याबाबत, पण या खेळासाठी येणारे विद्यार्थी बरेचदा वेड म्हणून किंवा आवड म्हणूनच येताना दिसतात. सध्या चाळीस मुले-मुली येथे प्रशिक्षण घेतात ज्यांची घरची आर्थिक स्थिती बेताचीच असते. त्यामुळे त्यांना महिना अडीचशे रुपये शुल्क आणि पन्नास रूपयांचे प्रवेश शुल्क घेऊन शिकवले जाते. साधारण मराठी कुटूंबातील ही मुले आपल्या जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर जागतिक पातळीपर्यत जाऊन देशाचे आणि खेळाचे नांव मोठे करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना यासाठी आर्थिक मदत किंवा मार्गदर्शनासाठी खेळाच्या दात्यांवर आणि नशिबाच्या लहरी सहकार्यावर अवलंबून राहावे लागते. यासाठी ही मुले किती संघर्ष करतात ते पेंडसे यांनी तळमळीने सांगितले. ते म्हणाले की, “कित्येकदा खेळातील राजकारण, अपु-या साधन सुविधा, शिक्षणाचा अभाव, आर्थिक चणचण, खेळाबाबतची सार्वत्रिक उदासिनता अशा अनेक अडचणींचा सामना करत ही मुले देशात-विदेशात जाऊन आपल्या क्रीडानैपुण्याचा प्रभाव दाखवत असतात.” देशात आणि विदेशात जाताना आलेल्या अनुभवांबाबत पेंडसे म्हणाले की, “वॉल क्लाईंबिंगसाठी अडचणींचे डोंगर चढणे आणि तुमच्यातील खेळाडू जिवंत ठेऊन स्पर्धेत प्राविण्य मिळवणे असे दुहेरी दिव्य प्रत्येकवेळी या मुलांना करावे लागते.”

image


या खेळात अपार मेहनत आणि प्रचंड मनोबलासोबत साहसी वृत्तीची गरज असते, तरूण वयातील मु लांना या खेळासाठी तयार होतानाच जीवनाच्या संघर्षामध्ये लढण्याचेही मार्गदर्शन होत असते. पण असे असले तरी द-या डोंगरात आपला स्फूर्तीदायक इतिहास असलेल्या महाराष्ट्रात या क्रीडाप्रकाराला शासन दरबारी अजूनही साहसी खेळाचा दर्जा नाही, त्यामुळे त्याच्याकडे उपेक्षीत नजरेने पाहिले जाते. लाखो रुपयांच्या दहीहंड्या मुंबईच्या रस्त्यात उभ्या करणा-या राजकीय मंडळीनी जसा दहीहंडीला बिनशर्त साहसी खेळाचा दर्जा दिला ते भाग्य शिवरायांच्या महाराष्ट्रात या खेळाला अजूनतरी मिळालेले नाही. सरकारच्या दप्तरी अजूनही ‘जीआर’च्या प्रतिक्षेत असलेल्या या साहसवीरांना अजूनही मान्यता मिळाली नाही. त्यांच्या अपेक्षा मात्र खूप आहेत. देशातील काही राज्यांनी या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर तेथील खेळाडूंच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून वॉल क्लायंबींगच्या या साहसी खेळाला प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कामी अनेकांनी सहकार्य केले, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाकडूनही मोलाचे सहकार्य केले जाते, मात्र त्याच्याही काही मर्यादा आहेत. त्यामुळेच दानशूर दात्यांच्या मदतीवर आजवर हा क्रीडाप्रकार जिवंत ठेवता आला,याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख पेंडसे करतात. पण मुंबईसारख्या शहरात वित्तीय चणचणीमुळे कायम अनिश्चित वातावरणात खेळाच्या विकासावर प्रतिकूल परिणाम मात्र होतोच असे पेंडसे म्हणाले. तश्याही परिस्थितीत स्वप्निल जाधव सारखा गरीब घरातील मुलगा राष्ट्रीय पातळीवर चमकतो, सिध्दी मणेरीकर ही मुलगी इटलीत जाऊन स्पर्धा जिंकते, सानीया नरगुडे राष्ट्रीय खेळात प्राविण्य मिळवते,आकाश गायकवाड,ॠतू पेंडसे,आर्या नरगुंडे, पुनम कांबळे अशी मुले-मुली या खेळात या मंडळाच्या स्वप्नांना साकारण्याच्या प्रयत्नात दिसतात. व्हिसा मिळवण्याची, प्रवासखर्चाची, इंग्रजीभाषा बोलण्याची एक ना अनेक अडथळ्यांची मालिकाच पार करत जपान, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, चीन या देशांच्या खेळांडूसोबत ही मुले स्पर्धा करतात आणि जिंकतात ही काही सामान्य बाब नाही.

image


या खेळाच्या भविष्याबाबत आशावाद व्यक्त करताना पेंडसे यांनी त्यांचा दहा वर्षांचा मुलगाही विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडेच धडे घेत असल्याचे सांगितले. ऑलिंपिक्समध्ये या खेळाचा समावेश करण्याचे प्रयत्न अखेरच्या टप्प्यात आहेत ते झाले तर सा-याच देशात या खेळाला चांगले दिवस येतील असे त्यांना वाटते. ते होईल तेंव्हा होईल पण सध्याच्या वॉलचा व्यावसायिक पध्दतीने विकास करावा यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी आराखडा तयार केला आहे. येत्या मे महिन्यात नवी मुंबई मध्ये होणा-या जागतिक स्पर्धेसाठी या मुलांची तयारी सुरू आहे. त्यांना गरज आहे उदार दृष्टिकोन आणि सढळ आर्थिक मदतीची. शिवरायांच्या महाराष्ट्रात उपेक्षित राहिलेल्या या ‘क्लायंबर्स’ना मदत करण्यासाठी आपण या इमेलवर राहूल पेंडसे यांना संपर्क करु शकता. [email protected].

image