यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहचण्यासाठी जी.ई. कम्युनिकेशन्सच्या गरिमा वर्मांनी दिलेले दोन गुरुमंत्र

यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहचण्यासाठी जी.ई. कम्युनिकेशन्सच्या गरिमा वर्मांनी दिलेले दोन गुरुमंत्र

Thursday December 10, 2015,

4 min Read

image


जी.ई. कम्युनिकेशन्समध्ये गरिमा वर्मा मार्च २०११ ला रुजू झाल्या. तेंव्हापासून त्या जॉन एफ्. वेल्च टेक्नॉलॉजी सेंटर येथील, जी.ई. च्या पहिल्या-वहिल्या आणि सर्वात मोठ्या अशा सर्वसमावेशक व बहुआयामी संशोधन आणि विकास केंद्राची आघाडी सांभाळत आहेत. जेथे ४५०० पेक्षा जास्त शास्त्रज्ञ व अभियंते काम करत आहेत.

त्यांना सामुहिक संचार, ब्रँड निर्मिती, विपणन, परिवर्तन व्यवस्थापन, विविधांगी व सामुदायिक सामाजिक जबाबदारी, अशा वेगवेगळ्या आणि व्यापक प्रकारच्या सर्वसमावेशक संचार क्षेत्रातील नेतृत्वाचा २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी त्यांचे सामुहिक संचार क्षेत्रातले लोकनेतेपदाचे कौशल्य औद्योगिक विकास घडवणे, कर्मचारी प्रतिबद्धता वाढवणे आणि जागतिक स्तरावरील कार्यक्षेत्रातल्या वातावरणात सांस्कृतिक परिवर्तन आणण्यासाठी उपयोगात आणले आहे.

जे.एफ्.डब्ल्यू.टी.सी. येथे त्या सर्व प्रकारच्या अंतर्गत व बाह्य संचार, कार्यक्रम, संचार नेतृत्व आणि कर्मचारी प्रतिबद्धता अशा विविध विभागांची जबाबदारी पेलतात. त्यांच्या इतर भूमिकांव्यतिरिक्त त्या जी.ई. च्या सामुहिक कल्याण कार्यक्रम ‘हेल्थअहेड’ च्या प्रमुख आहेत.

जी.ई. कम्युनिकेशन्समध्ये काम करण्याआधी त्या फिडेलीटी इनवेस्टमेंट, माइक्रोलँड आणि सन माइक्रोसिस्टम्स येथे संचार कार्यालयात प्रमुख पदावर कार्यरत होत्या. त्या जैवविविधयुक्त पर्यावरणाच्या सक्रीय समर्थक आहेत. त्यांच्याकडे बिट्स पिलानी विद्यालयाची संगणक शास्त्राची स्नातक पदवी आहे आणि त्यांनी मुंबई येथील झेवियर्स इंस्टीट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समधून जाहिरात व लोक संचार अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 

आम्ही, युअरस्टोरीच्या टीमने, गरिमा वर्मांसोबत बंगलोर येथील जी.ई. कम्युनिकेशन्सच्या आवारात एक दुपार व्यतीत केली आणि त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील अशा दोन घटनांबाबत जाणून घेतले, ज्या त्यांना यशाच्या अत्युच्च शिखरापर्यंत पोहचवण्यास कारणीभूत ठरल्या.

येथे त्या सांगत आहेत की कशाप्रकारे ह्या दोन अनुभवांमुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन आकारास आला आणि अशा बदललेल्या नवीन वृत्तीमुळे त्या कशाप्रकारे जी.ई. कम्युनिकेशन्समध्ये सर्वात मोठ्या हुद्द्यापर्यंत पोहचू शकल्या.

‘तुम्ही कोठून आला आहात, ते कधीच विसरू नका’

मी २००४ मध्ये फिडेलीटी इनवेस्टमेंट बरोबर काम करत होते. त्यांचे मुख्यालय जरी बोस्टन येथे होते तरी त्यांची एक टीम भारतात मुंबई येथे कार्यरत होती. मला आठवतंय बोस्टन येथील माझ्या एका सहकाऱ्याने मला विचारले होते की, भारतामध्ये अजूनसुद्धा आपण दळणवळणासाठी हत्तीचा वापर करतो का! यावरून एक गोष्ट उघड होती की आम्हाला आमच्या दोन्ही देशांतील संघासाठी सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढवणे अतिशय आवश्यक होते. म्हणून आम्ही बोस्टन येथील मुख्यालयात भारतीय दिवस (India day) आयोजित करायचे ठरवले. 

मला आठवतंय् की मी माझे सगळे पाश्चिमात्य पोशाख बॅगेत भरले. माझ्या आईच्या हे लक्षात आले आणि तिने मला काही साड्यासुद्धा सोबत नेण्याचा सल्ला दिला. तिच्या मते साडी सारखा भारतीय पेहराव मला माझी देशी ओळख पाश्चिमी सहकाऱ्यांच्या मनामध्ये ठसवायला मदत करेल. मी काही साड्या माझ्या सामानात भरल्या, पण मला खात्री नव्हती की मी बोस्टन येथील सोहळ्यामध्ये साडी परिधान करेन की नाही.

मात्र एकदा बोस्टन येथे पोहचल्यानंतर मी माझा विचार बदलला आणि कार्यक्रमासाठी साडीच नेसले. त्या कार्यक्रमात मी खूपच अस्वस्थ होते कारण भारतीय पोषाखात असणारी मी एकमेव व्यक्ती होते. पण खरोखर, त्यामुळे १७५ लोकांच्या गर्दीत मी उठून दिसले. 

त्या कार्यक्रमानंतर, फिडीलीटी इनवेस्टमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेड जॉन्सन, जे जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत, यांनी माझ्या सोबत मेजवानीच्या पंक्तीत ४५ मिनिटं व्यतित केली. अशी संधी मिळवण्यासाठी कोणीही जीवाचं रान करेल. आमच्या संभाषणाची सुरुवात त्यांच्या एका प्रश्नाने झाली. त्यांनी मला विचारले, “तु परिधान केलेला पोषाख काय आहे?”. मी त्यांना साडीबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही भारतातील कापड उद्योग ते भारताचा संपन्न सांस्कृतिक वारसा, अशा विविध विषयांवर चर्चा केली. मी त्यांना साडी कशा पद्धतीने नेसली जाते, ह्याबद्दल देखील सांगितले. त्यांनी मला विनंती केली की ते जेंव्हा भारतात येतील तेंव्हा मी त्यांना माझा देश फिरायला मदत करावी आणि त्यांना साड्या खरेदी करायलाही घेऊन जावे. मला हे सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की ते जेंव्हा भारतात आले तेंव्हा मी त्यांच्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. 

कधी-कधी एखादी संधी मिळण्यासाठी तुम्ही आहात तसे दिसणे-वागणे आणि तुमच्या मूळ मातीबद्दल अभिमान बाळगण्याइतकी साधीशी गोष्ट उपयोगी पडते. त्या दिवसानंतर मी माझे भारतीयत्व जेथे जाईन तेथे आत्मविश्वासापूर्ण अभिमानाने मिरवते.

माझ्या आईने मला दिलेल्या सल्ल्याबद्दल मी तिची अत्यंत आभारी आहे. 

‘तुम्ही एखाद्याला भेटल्यावर पहिल्या सात सेकंदांमध्ये काय कराल?’

काही वर्षांपूर्वी, माझ्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत, अजून एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याबरोबर आलेला माझा अनुभव सांगण्यासारखा आहे पण तो अनुभव माझ्या फजितीमध्ये रुपांतरीत झाला होता. मी ज्या संस्थेसाठी काम करत होते तेथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याबरोबर मी एकदा इमारतीच्या लिफ्ट मध्ये समोरासमोर आले. आम्ही सातव्या मजल्यावरून तळ मजल्याला जात होतो. त्यांनी मला विचारले की मी काय करते पण त्यांना उत्तर देण्याऐवजी मी घाबरून अस्वस्थ झाले आणि दातखिळी बसल्यासारखी गप्प बसले. मी एक शब्दही बोलू शकले नाही. 

तो अनुभव मला धडा शिकवणारा ठरला. त्या दिवसांनतर, मी नेहमीच लिफ्टमध्ये ये-जा करताना छोटेखानी संभाषणासाठी तयार असते. तुम्हाला माहित नसते की लिफ्ट मधून जाता-येता तुमची कधी कुणाशी गाठभेट होईल! 

बहुतेक लोक एखाद्याला भेटल्यावर पहिल्या सात सेकंदांमध्ये दुसऱ्याबद्दलचे आपले मत तयार करतात. जर पहिल्या सात सेकंदात तुमचा प्रभाव वाईट पडला असेल, तर त्यानंतर तुम्ही किती चांगले वागता याने काहीच फरक पडत नाही.

मी व्यावसायिकांना हाच सल्ला देते, खासकरून तरुण व्यावसायिकांना की त्यांनी त्यांच्या वैयक्तिक पण छोटेखानी प्रारंभिक संभाषणावर मेहनत घ्यावी. तुम्ही किती आणि काय काय करू शकता ह्याबद्दल आत्मविश्वासाने थोड्क्यात पण खुसखुशीत भाषेत सांगता येण्याचे तुमचे कौशल्य तुम्हाला कारकीर्दीत फार उंचीवर घेऊन जाईल. 


 लेखक : वर्षा अडुसुमिल्ली

अनुवाद : ज्योतिबाला भास्कर गांगुर्डे

    Share on
    close