कर्करोग पिडीतांसाठी मुंबईच्या लोकलट्रेनमध्ये गिटार वाजवितात सौरभ निंबकर!

0

काही लोक असे असतात, ज्यांना दुस-यांच्या चेह-यावर हास्य खुलविण्यात आनंद मिळतो. त्रासलेल्या जीवनाला कंटाळलेल्या लोकांच्या आयुष्यात थोडे हास्य खुलवून त्यांना संतुष्टी मिळते. हे करणे कठीण असले तरी, येथे सर्व शक्य आहे. दुस-यांच्या चेह-यावर हास्य खुलविणारे एक नाव आहे, सौरभ निंबकर. मुंबईच्या डोंबिवली येथे राहणारे सौरभ निंबकर आपल्या गिटारासोबत अनेकदा अंबरनाथ ते दादर दरम्यान चालणा-या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसतात. सौरभ लोकांना त्यांच्या आवडीची गाणी एकवितात आणि त्याच्या बदल्यात प्रवासी त्यांना पैसे देतात. जे पैसे सौरभ यांना मिळतात, त्या पैशांनी ते गरीब कर्करोग पिडीत आणि त्यांच्या कुटुंबाची मदत करतात.

लहानपणापासूनच लोकांचे मनोरंजन करण्याची आहे आवड

२३ वर्षीय सौरभ सांगतात की, “मला लहानपणापासूनच लोकांचे मनोरंजन करणे आवडत होते. महाविद्यालयीन दिवसात मी आणि माझे मित्र लोकल ट्रेन मध्ये गिटार वाजवत असू आणि सोबतच गाणी देखील गात असू.” सौरभने बायोटेक या विषयात पदवी घेतली आहे आणि ‘बायो-एनालिटीकल साइंसेज’मध्ये देखील पदवी घेतली आहे आणि सध्या एक फार्मा कंपनी इंवेंटीया हेल्थकेयर प्रायवेट लिमिटेड मध्ये काम करत आहे. आपल्या कारकीर्दीच्या या नाजूक वळणावर सौरभ अनेक महिन्यांपासून सलग आठवड्यात तीन दिवस लोकल ट्रेनच्या गर्दीत गाणे गातात.

महाविद्यालयीन दिवसात सौरभने गिटारचे काही नोट्स शिकले होते, मात्र संगीत या कलेसाठी असलेल्या प्रेमामुळे त्यांना एका गुरुंपर्यंत देखील पोहोचविले होते. त्यांचा आवाज कधीच इतका चांगला नव्हता की, त्यांना मंचावर गाण्याची संधी मिळेल. वर्ष २०१३मध्ये सौरभ यांच्या आईला कर्करोगामुळे किंग एडवर्ड मेमोरियल(केईएम) रुग्णालयात दाखल करावे लागले. सौरभ यांनी सांगितले की, “जेव्हा माझी आई रुग्णालयात होती तेव्हा एके दिवशी मी तेथे आपला गिटार घेऊन गेलो. मी जेव्हा गिटार वाजविणे सुरु केले, तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांना खूप शांतता जाणवली. याच जाणिवेने मला पुढेदेखील लोकांसाठी गिटार वाजविण्यासाठी प्रेरणा दिली. त्यानंतर मी अनेकदा तेथे जात असे आणि लोकांसाठी गिटार वाजवत असे. याबाबत मी जेव्हा माझ्या आईला सांगितले, तेव्हा ती खूप खुश झाली होती.”

नवे वळण

रुग्णालयात दाखल केल्याच्या एका वर्षांनंतर सौरभ यांच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यांनी रुग्णालयात जाणे सोडले, मात्र त्या दरम्यान ते कर्करोग पिडीत आणि त्यांच्या नातेवाईकांना होणा-या त्रासाला चांगल्या प्रकारे ओळखत होते.

सौरभ सांगतात की, “आमचा समाज सर्व ठिकाणी गरीब आणि श्रीमंत यांच्यात भेदभाव करतो. मात्र दुर्देवाने कर्करोग पीडितांचा उपचार करताना जेव्हा बिल घेण्याची वेळ येते, तेंव्हा असा भेद्भाव केला जात नाही, उलट यातच त्याची सर्वात अधिक गरज असते. रुग्णांच्या उपचारा दरम्यान लागणा-या मोठ्या रकमेमुळे या गरीब कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत असे. अनेक संस्था कर्करोग पीडितांच्या उपचाराचा खर्च स्वस्त करतात, मात्र कुटुंबाच्या अनेक गरजा असल्याने त्यांचे कंबरडे मोडत असे. कर्करोग पीडितांच्या उपचारात जवळपास ३ते४लाख रुपयांचा खर्च येतो, मात्र कुटुंबातील लोकांसोबत राहिल्यामुळे हा खर्च २ते३लाख रुपयांनी वाढतो. मोठा प्रश्न हा आहे की, अशा कुटुंबियांची मदत कोण करेल?”

चांगले कपडे आणि गिटारसोबत भिखारी

सौरभ सांगतात की, मी निश्चय केला आहे की, मला तेच काम केले पाहिजे, जे मी आपल्या महाविद्यालयीन दिवसात करत होतो, लोकलट्रेनमध्ये गिटारने लोकांचे मनोरंजन करणे. यावेळी मी त्यांच्याकडून दान देखील घेईन. मला माहित होते की, मी मदत करु इच्छितो, मात्र माझ्यासमोर अनेक प्रश्न होते. लोक माझ्यावर विश्वास करतील? मी कसे त्यांना आपले खरे सिद्ध करून दाखवू? या सर्व समस्यांचा अंदाज लावत सौरभ यांनी एका स्वयंसेवी संस्थेसोबत सामिल होण्याचा निर्णय घेतला. या स्वयंसेवी संस्थेसोबत सौरभ यांनी ट्रेनमध्ये लोकांचे मनोरंजन करणे सुरु केले.

हळू हळू सौरभ यांच्या प्रयत्नात सामान्यलोक देखील सामिल व्हायला लागले. काही प्रवासी तर, त्यांना आपल्या आवडीची गाणी देखील म्हणण्यास सांगायला लागले, तर काही लोक त्यांच्यावर टीका देखील करत असत. सौरभ सांगतात की, अनेकांसाठी मी चांगले कपडे घालणारा आणि गिटार वाजविणारा भिकारी आहे, मात्र अधिकाधिक लोकांना मी आवडतो. अनेकदा जेव्हा कुणी प्रवासी माझे गाणे बंद करण्यासाठी सांगतात, तेव्हा दुसरे प्रवासी असे करण्यापासून थांबविण्यासोबतच मला गाणे गाण्यासाठी सांगत असे.

सौरभ सांगतात की, चांगला दिवस गेला की, मला ८००ते१०००रुपयापर्यंत देणगी मिळत असते. लोक मला १०रुपयांपासून ५००रुपयापर्यंत देणगी देतात. या पैशांनी कर्करोगपिडीत कुटुंबियांची मदत केली जाते. सौरभ यांच्या मते, ते लोकल ट्रेन बघून चढतात. जास्त गर्दी असणा-या ट्रेनमध्ये चढत नाही, कारण गिटार वाजविण्यासाठी जागेची गरज असते. त्याव्यतिरिक्त अत्यंत खाली ट्रेन मध्ये देखील प्रवास करणे आवडत नाही. कारण तेथे देणगी देणारे कमी लोक असतात.

सर्व मिळून काहीतरी करू शकतात

सौरभ सांगतात की, प्रत्येकाकडे काहीतरी कला असते. मला संगीताचे खूपच कमी ज्ञान आहे. मात्र त्याचा प्रयोग मला ओळख करून देतो. विचार करा की, लोक खूपशा कल्पनेने समोर आले तर, काय परिस्थिती असेल. हे योग्य होणार नाही का? जर नाही तर, मला वाटते की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मानधनाचा एक टक्के भाग त्यांच्या भागातील अशा संस्थेला द्यायला हवा, जी समाजासाठी काहीतरी काम करत असेल. हे प्रत्यक्षात आणणे कठीण तर आहे, मात्र अशक्य नाही. सौरभ यांच्या कामावर लोक लक्ष देत आहेत आणि त्यांच्या सोबतच त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सल्ला देखील देत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, त्यांना पैसे जमा करण्यासाठी एक बॅण्ड तयार केला पाहिजे. मात्र मी लोकांना एका व्यक्तीच्या शक्तीचे ज्ञान करू देऊ इच्छित आहे. माझे काम बघून लोक विचार करायला लागले की, तेही काहीतरी करू शकतात.

लेखक : अनमोल

अनुवाद : किशोर आपटे.