चहा पिण्याच्या छंदापायी परदेशातील नोकरी सोडून सुरू केले चहाचे दुकान!

1

चहा पिण्याचे वेड कुणाला त्यापायी कुठे घेवून जावू शकते? तुम्ही सांगू शकाल. दिवसाला वीस कप चहा पिणारे हे महाभाग अभियंता पंकज शर्मा आणि व्यापारी आशिष चहाच्या वेडापायी याच्याही पलिकडे जावून पोहोचले आहेत. त्यांच्या या वेडाने त्यांनी चहाचे दुकान उघडले आहे. 

ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल तरी हेच सत्य आहे की, दोघा चहा प्रेमींनी विदेशातील डॉलर्स कमावून देणारी नोकरी सोडून आपले शहर चंदिगढ मध्ये चहाचे दुकान सुरू केले आहे. आणि हे दुकान देखील असे ज्याने शहरभरच्या चहाप्रेमींना वेड लावलं आहे, दुकानाचे नाव आहे ‘चायबब्बल’! चाय बब्बल’ जसे नाव तसाच येथील चहा देखील! वाफाळता, सुगंध भारीत. पण येथे केवळ एकच नाही दोनशे पेक्षा जास्त प्रकारच्या चहाची चव चाखता येते आणि त्यांच्या तेवढ्याच वेगळ्या चवी देखील अनुभवता येतात.


चाय बब्बलमध्ये चहा सोबत जेवणाच्या वेगवेगळ्या रेसिपीज देखील उपलब्ध आहेत, ज्या पंकज आणि आशिष यांनी स्वत: तयार केल्या आहेत. चायबब्बलच्या मागची कहाणी देखील तेवढीच चविष्ट आहे. चहाच्या वेडाची कहाणी आहे. पंकज शर्मा तसे पाहता अभियंता आहेत, पंरतू हा व्यवसाय त्यांना फार काळ मानवला नाही. मग काही काळ त्यांनी कपड्यांचे कामही केले, पण त्यातही मन लागेना. त्यांना असे काही तरी करावेसे वाटत होते, जे त्यांच्या मनात अनेक वर्ष साचले होते. ते सांगतात की, महाविद्यालयीन काळात त्यांना शेफ व्हायचे होते पण पालकांच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही आणि अभियांत्रिकीला प्रवेश घ्यावाच लागला. 

मागील पंधरा वर्षापासून पंकज शर्मा देश- विदेशात योग शिकवतात आणि योगी पंकज या नावाने जगभर ओळखले जातात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, यूरोप, जपान सह अनेक देशांत पंकज शर्मा यांना योग शिक्षणासाठी निमंत्रित केले जाते. पण ही योग्यता मिळवून देखील त्यांच्या मनात  असलेल्या चहाच्या छंदासाठी काहीतरी करण्याची आस कायम राहिली. तीन वर्षापूर्वी त्यांनी त्यांचे मित्र आशिष यांच्याशी याबाबत वाच्यता केली, आशिष देखील चहाचे शौकीन आहेत.


पंकज शर्मा
पंकज शर्मा

आशिष यांच्या कुटूंबियांचे सर्जिकल उपकरण आणि साहित्य तयार करण्याचे काम चालते. ते युनीसेफ आणि जागतिक आरोग्य संघटना यांना हे साहित्य पूरविण्याचा व्यवसाय करतात, नंतर त्यांनी हा व्यवसाय बंद केला आणि अमेरिकेत रवाना झाले. अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथे त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.

फिलाडेल्फिया येथे आशिष यांनी काही गॅस स्टेशन खरेदी केले. तीन वर्षापूर्वी ते भारतात आले असता पंकज यांनी त्यांना चहाच्या वेडा बद्दल सांगितले. त्याचा परिणाम असा झाला की दोघांनी मिळून एक चहाचे अत्याधुनिक दुकान सुरू करण्याचे ठरविले. मग सुरू झाली चहावर चर्चा आणि संशोधन! चहाच्या प्रकारापासून त्यांच्या औषधी गुणत्त्वा पर्यंत माहिती घेण्यात आली. अन्य देशात चहा बनविण्याच्या आणि पिण्याच्या पध्दती आणि त्यासंबंधी विश्वास यांची माहिती घेण्यात आली. त्यानंतर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात चायबब्बलचा पहिला आऊटलेट चंदिगढच्या सेक्टर दहा मध्ये सुरू झाला.


आशीष
आशीष

पंकज यांचे म्हणणे आहे की, त्यांना हे तर माहिती होते की शहरात चहाचे शौकीन खूप आहेत, परंतू चायबब्बल बाबत लोकांच्या मनात इतके प्रेम उफाळून येईल हा अंदाज नव्हता. चहावेड्यांनी या कल्पनेला डोक्यावर घेतले आहे.

चायबब्बलमध्ये भारतामधील कांगडा आणि आसाम चहाशिवाय नेपाळ, श्रीलंका आणि जपान येथून आयात केलेल्या चहाचा स्वादही घेता येतो. चाय बब्बलमध्ये चहा सोबतच जेवणाच्या खास पाककृतीं देखील उपलब्ध आहेत, ज्या पंकज आणि आशिष यांनी स्वत: तयार केल्या आहेत. चायबब्बल मध्ये चहाचा आस्वाद घेता घेता आपणास हवेतर चहाचे पॅकिंग देखील करता येते. यासाठी खास प्रकारचे फ्लास्क आहेत ज्यात चहा दीड तासापर्यंत गरम राहतो. या शिवाय चहात बुडवून खाण्यासाठी टायगर बिस्कीट देखील दिले जाते. लहान मुलांसाठी खास प्रकारे दुधवाला चहा देखील उपलब्ध आहे.

आशिष म्हणतात की, संध्याकाळ झाली की आजकालचे तरूण दारू पिवू लागतात, अशा काळात तरुणांना येथे चहा पिताना पाहणे चांगले वाटते, किमान ते नशेपासून दूर आहेत. पंकज यांचे म्हणणे आहे की, चाय बब्बल चा प्रतिसाद पाहून लवकरच अन्य शहरातून आऊटलेट सुरू करण्याच्या योजनेवर ते काम करत आहेत.

लेखक: रवि शर्मा
अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील