बनवारीलाल पुरोहित यांचा सत्कार म्हणजे एका पारदर्शी व्यक्तीमत्वाचा गौरव 

0

बनवारीलाल पुरोहित यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कधीही तत्त्वांशी तडजोड न करता आपल्या विचाराशी नेहमीच पारदर्शक राहून सामाजातील गरिब लोकांशी बाधिलकी जपत कायम संघर्ष केला. सामाजिक जीवनात पारदर्शकता हा मंत्र जपलेल्या व्यक्तीची आसामच्या राज्यपालपदी निवड होणे हा नागपूरसह विदर्भाचा गौरव आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाचा लाभ आसाम या राज्याला होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूरचे सुपुत्र माजी मंत्री व नागपूर नगरीचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची आसामच्या राज्यपालपदी नेमणूक झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करताना बोलत होते.

 विचारांशी नेहमीच पारदर्शक राहिलेल्या बनवारीलाल पुरोहित यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्यामुळे सामाजिक, राजकीय  तसेच शैक्षणिक  क्षेत्रात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य दिल्यामुळे भारतीय विद्या भवनच्या माध्यमातून उच्च परंपरा निर्माण करतांना अभियांत्रिकी क्षेत्रातही सर्वोच्च संस्था स्थापन केली असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले, बाबुजींनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रात पारदर्शता जपली. प्रसंगी त्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यांचे जीवन संघर्षशिल आहे. ते कोणालाही घाबरले नाही. जे काम हातात घेतले त्याला न्याय दिला. कोळसा हा देशातील कंपन्यांनाच मिळावा यासाठी केलेल्या संघर्षामुळे दोन लाख कोटी रूपये देशाला कोळश्याच्या पारदर्शक लिलावातून मिळू शकले. तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान करतांना पेपर ट्रेलच्या माध्यमातून आपले मत योग्य पडले असा विश्वास त्यांनी मतदारांना मिळवून दिला आहे.

राजकीय जीवनाची सुरूवात बाबुजींकडून शिकायला मिळाली असल्याचा गौरवपूर्ण  उल्लेख करतांना मुख्यमंत्री म्हणाले, चांगले काम करण्याचा विश्वास तसेच सकारात्मता ही मुल्य त्यांच्याकडून मिळाली तसेच त्यांनी माझ्यावर कायम प्रेम केले आहे. नागपूरच्या तीस वर्षांचा इतिहास बनवारीलाल पुरोहित यांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड काम करून आपले वेगळे स्थान निर्माण केल्यामुळे या सत्काराला वेगळे महत्त्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूरसह विदर्भाच्या विकासासाठी नेहमीच आग्रही राहिलेल्या बनवारीलाल पुरोहित यांची आसामच्या राज्यपालपदी निवड झाली असून ते जनतेच्या विकासासाठी कामे करतील. आसाममध्ये सामाजिक व आर्थिक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी त्यांची मदत होणार असून आसाम या राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तीस हजार कोटी रुपयांची कामे सुरू असून पूर्वउत्तर राज्याच्या विकासाला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळू शकली त्यासाठी बाबूजी सात दिवस कारावासात होते. कोलब्लॉकच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढील चाळीस वर्षे पुरेल एवढा कोळसा मंजूर करण्यासाठी बनवारीलाल पुरोहित यांचा संघर्ष असल्याचेही त्यांनी सागितले.

यावेळी सर्वोच्य न्यायालयाचे माजी न्यायाधिश विकास सिरपूकर, खासदार अजय संचेती, स्वागताध्यक्ष महापौर प्रविण दटके यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी नागरी सत्कार समारोह समितीतर्फे केद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा स्मृतीचिंन्ह, मानपत्र देऊन जाहीर सत्कार केला.

सत्काराला उत्तर देतांना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित म्हणाले, नागपूर नगरवासियांच्या प्रेमामुळे राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. सत्कार हा माझा नसून नागपूर नगरीचा हा सन्मान आहे. आसामच्या जनतेची सेवा निस्पृहपणे करतांना नागपूरचे नाव उंचावले असेच कार्य करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला. सर्वपक्षांनी एकत्र येऊन सत्कार आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त करतांना आपले सर्वांचे प्रेम घेऊन आसामला जात असल्याचे भावपूर्ण उद्गार व्यक्त केले.