एका सामान्य विद्यार्थ्याचा असामान्य अविष्कार !

1

शिक्षण हे फक्त पुस्तकांमध्ये बंदिस्त न राहता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे आणि शाळेपासूनच विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण मिळालं तर विद्यार्थी कल्पकतेने नवीन आविष्कार घडवू शकतात, असं मत व्यक्त केलंय स्वत:च्या नावावर दोन पेटंट असलेल्या एम. सी. जयकांत यांनी. अभियांत्रिकीतील पेटंट मिळाल्यानंतर जयकांत यांच्या मनात विचार आला की इतर विद्यार्थी असं नवीन काही का नाही करत? संशोधनानंतर त्यांच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान मिळतं, म्हणूनच मग व्यावहारिक पातळीवर त्या ज्ञानाचा अनुभव करुन देण्याचा निर्णय जयकांत यांनी घेतला. त्यांनी आपल्या मित्रांनाही ही कल्पना सांगितली आणि तेही त्यात सहभागी होण्यासाठी तयार झाले. अखेर १५ सप्टेंबर २०१३ रोजी जयकांत यांनी त्यांचे मित्र हरीश यांच्या सहाय्यानं अभियंता दिनाला ‘इन्फिनीट इंजिनीअर’ या संस्थेची स्थापना केली. व्यावहारीक पातळीवरील विज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देऊन विद्यार्थ्यांना नवीन आणि रचनातमक आविष्कार घडवण्याची प्रेरणा देण्याचं काम इन्फिनीट इंजिनीअर करतं. याद्वारे विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स,मेकॅनिकल, एरोमॉडेलिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि जैव तंत्रज्ञान यासारख्या विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं.

एम.सी.जयकांत हे शाळेत एक सामान्य विद्यार्थी होते, जवळपास सर्वच विषयांमध्ये ते नापास झाले होते .पण बोर्डाच्या परीक्षेत ते कसेतरी पास झाले आणि अभियांत्रिकीला त्यांना प्रवेशही मिळाला. काही तरी वेगळं करण्याच्या महत्त्वांकाक्षेने त्यांनी तिसऱ्या वर्षाला असताना डिझाईन आणि फॅब्रीकेशन या संकल्पनेअंतर्गत पंखविरहीत पवनचक्की तयार केली. त्यांचं हे संशोधन जगासमोर येण्यास एक घटना कारणीभूत ठरल्याचं जयकांत सांगतात. एके दिवशी महाविद्यालयातल्या सभागृहात एक सादरीकरण सुरू होतं, सभागृह एसी असल्याने तिथं काहीवेळ बसायचं म्हणून जयकांत आणि त्यांचे मित्र हरीश शेवटच्या रांगेत जाऊन बसले. पण त्याचवेळी त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्याने त्यांना पकडलं, त्याला काहीतरी सांगायचं म्हणून जयकांत यांनी आम्हालाही इथं सादरीकरण करता येईल का असं विचारलं आणि आश्चर्याची बाब म्हणजे १० मिनिटात त्या कर्मचाऱ्याने आम्हाला व्यासपीठावर सादरीकरण करण्यास सांगितलं, जयकांत सांगतात, “ मी कसंतरी धाडस करुन व्यासपीठावर गेलो आणि ५ मिनिटं माझ्या संशोधनाबद्दल बोलून तिथून पळ काढला. आठवडाभरानंतर त्या स्पर्धेत माझ्या सादरीकरणाला प्रथम पारितोषिक मिळाल्याचं मला कळलं. माझ्या जीवनातील ते पहिलं यश होतं.” त्यानंतर त्यांनी विविध महाविद्यालयांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. एकदा असंच गोव्याहून परतत असताना त्यांनी भविष्याबद्दल विचार केला आणि चेन्नईला परत आल्यानंतर तातडीनं आपल्या दोन संशोधनांच्या पेटंटकरता अर्ज केला. पेटंट मिळाल्यानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं आणि लोक माझ्याकडे आदराने पाहू लागले, असं जयकांत सांगतात.


जयकांत आणि हरीश यांच्याशिवाय एस.जयविघ्नेश, ए.किशोर बालगुरू आणि एन अमरिश हे इन्फनिट इंजीनिअर्सचे सह संस्थापक आहेत. सध्या काही प्रशिक्षण केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि एरो मॉडेलिंगचं प्रशिक्षण दिलं जातं, पण, “ शालेय शिक्षण परिपूर्ण होण्यासाठी अभ्यासक्रमात व्यावहारीक शिक्षणाचा समावेश करण्याचा आमचा उद्देश आहे,” असं जयकांत सांगतात.

आतापर्यंत कंपनीनं चेन्नईमधील दोन शाळांमध्ये प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. लवकरच ते आपली एक विज्ञान संशोधन संस्था सुरू करणार आहेत ज्यात कोणत्याही शाळेचे विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपलं संशोधन व्यावहारिक पातळीवर उपयोगात आणण्यात मदत होऊ शकते.

“ आमच्या एका प्राध्यापकांनी आम्हाला हे संशोधन व्यवहार्य नसून यात वेळ घालवण्यापेक्षा आयटीमध्ये नोकरी करा असा सल्ला दिला होता. पण ही टीका आम्ही सकारात्मक पद्धतीने घेतली आणि आमचा निर्धार आणखी भक्कम केला. विद्यार्थ्यांना शिकवण्याची पात्रता तुमच्यात आहे का असाही प्रश्न मला विचारला गेला, पण विद्यार्थ्यांना झोप न येऊ देता कसं शिकवायचं हे शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्यालाच जास्त कळतं, ” असं उत्तर दिल्याचं जयकांत सांगतात. विज्ञान सोप्या आणि व्यावहारीक पद्धतीने शिकवण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक बॅक बेंचर्सचं नशीब पालटू शकतं हे मात्र नक्की.