इंदूरच्या वानरसेनेची कमाल : शिट्टी वाजवून बंद पाडली उघड्यावर शौचालयास जाण्याची प्रथा !

0

उघड्यावर शौचालयास जाणे हा या देशामधला एक सामाजिक रोग आहे. हा रोग बरा व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले. इंदूरमधल्या पाच ते बारा वर्षांच्या मुलांच्या वानर सेनेनंही या अभियानापासून प्रेरणा घेतलीय. या वानर सेनेच्या प्रयत्नामधून मध्य प्रदेशातल्या इंदूरमधले चार गावं या रोगातून मुक्त झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये देशवासीय वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी होत आहेत. तसेच दुस-यांनाही यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करत आहेत. प्रत्येकालाच स्वच्छ राहायचे आहे. तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा अडथळा नाही.पण मध्यप्रदेशातल्या इंदूर जिल्ह्यातल्या १० हजार मुलांच्या वानर सेनेची गोष्ट वेगळीच आहे. या छोट्या मुलांच्या सेनेनं गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी अनोखी मोहीम राबवली आहे.

या मुलांच्या प्रयत्नामधून देपालपूर परिसरातले चार गावं हागणदारी मुक्त झाली आहेत. दौरचे जिल्हाधिकारी पी. नरहरी या मुलांबद्दल ‘युअर स्टोरी’ ला सांगतात,

ही गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी पाच ते १२ वर्षांच्या मुलांच्या या टोळीचं महत्वाचं योगदान आहे. या टोळीमध्ये जवळपास दहा हजार मुलांचा समावेश आहे.आपल्या खोडकरपणामुळे ही मुलं वानर सेना म्हणून ओळखली जातात. या मुलांनी जिल्ह्यातल्या 20 ते 30 गावांमध्ये आपली टोळी तयार केली आहे. या सर्व टोळ्या वानर सेनेशी जोडलेल्या आहेत. गावात ज्या ठिकाणी गावकरी उघड्यावर शौचालयासाठी जातात अशी ठिकाणं या मुलांनी सर्वप्रथम हेरली. या ठिकाणी येण्या –जाण्याच्या मार्गावर या टोळीतले सदस्य उभे राहायचे. उघड्यावर शौचालयासाठी जाणा-या गावक-यांना पाहून ही मुलं सारखी शिट्टी वाजवत. मुलांच्या या शिट्टी वाजवण्यामुळे या लोकांना लाज वाटू लागली. त्यांनी पक्क्या शौचालयामध्ये जाण्यास सुरुवात केली.

वानर सेनेतली काही खोडकर मुलं उघड्यावर शौचालयासाठी जाणा-या व्यक्तीच्या हातामधून डबा हिसकावून घेत. त्यानंतर ते पाणी खाली सांडत असत त्यामुळे या लोकांना पाणी भरण्यासाठी पुन्हा एकदा गावात जावे लागत असे. ”असेही जिल्हाधिकारी पी. नरहरी यांनी सांगितले. जिल्ह्यातल्या ३०० पंचायतीमधल्या ६१० गावांमध्ये जवळपास प्रत्येक घरांमध्ये आता पक्क्या शौचालयाचा वापर सुरु झाला आहे, असे नरहरी यांनी स्पष्ट केले.

उघड्यावर शौचालयासाठी जाणा-या या मंडळींना सुरुवातीला वानरसेनेच्या खोड्या विचित्र वाटत. पण ही मुलं आपल्या निरोगी आरोग्यासाठी हे करत आहेत हे त्यांना हळू हळू समजू लागले. त्यानंतर आपलं कृत्य चुकीचं असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे हळू हळू उघड्यावर शौचालयास जाणा-यांची संख्या कमी झाली. आज संपूर्ण इंदूर जिल्ह्यामध्ये याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. इंदूर लवकरच हगणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित केला जाण्याची शक्यता आहे.

उघड्यावर शौचालयास जाणा-या या लोकांना वानर सेनेनं शिट्टी वाजवून अडवले की लोकं विचारत, ‘मग कुठे जाऊ सांगा?’ कारण त्यांच्या घरामध्ये पक्की शौचालये नव्हती. अशा वेळी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला. त्यांनी या लोकांना शौचालये बांधण्यासाठी अनुदान दिले. लोकांना अनुदान मिळत असल्यानं जिल्हा प्रशासनाच्या सोबत सुरु असलेली वानर सेनेची मोहीम यशस्वी होऊ लागली. पाहता-पाहता मागच्या चार महिन्यांमध्ये जिल्ह्यातल्या २५ हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये या अनुदानामधून शौचालयं बांधण्यात आली आहेत. तर १५ हजार शौचालय अन्य व्यक्तींच्या मदतीनं बांधण्यात आली आहेत.

लोकांना एखादी गोष्ट उशिरा समजते. पण त्यामुळे न कंटाळता त्यांना समजेल अशा पद्धतीनं प्रयत्न करणे आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर पर्याय उपलब्ध करणे आवश्यक आहे. इंदूरच्या वानरसेनेनं वाजवलेल्या शिट्टीमुळे उघड्यावर शौचालयास जाणा-यांचे प्रमाण कमी झाले आहे. स्वच्छ भारत हे अभियान यशस्वी होण्यासाठी अशाच प्रकारच्या उपायांची आवश्यकता आहे.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

स्वच्छ व सुंदर भारताचे आशास्थान “बंच ऑफ फूल्स’’

सर्व काही स्वच्छ-सुंदर तुळजापूरसाठी

अंधाऱ्या गावांना प्रकाशाने उजळून टाकणारे ʻसौर सैनिकʼ कनिका खन्ना यांचा ʻसंकल्पʼ


लेखक - रुबी सिंह

अनुवाद - डी. ओंकार