यशाचा झणझणीत स्वाद!

0

‘शंभर पुरुष एकत्र राहू शकतात, पण दोन स्त्रिया एकत्र आल्या की वादाला सुरुवात झालीच म्हणून समजा’ हा अगदी पूर्वापार समज आहे. (किंबहुना पुरुषांनीच तो निर्माण करून दिला असावा) तथापि स्त्रीशक्ती एकवटली की किती मोठी ताकद उभी राहू शकते याचेच उदाहरण ‘जागृती महिला बचत गटा’च्या महिलांनी दाखवून दिलेे. अनेक वर्षे उराशी बाळगलेलं स्वप्न बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण होण्याचा आनंद कल्याणच्या मोहने येथील जागृती महिला बचत गटातील महिलांनी अनुभवला. या बचत गटाच्या महिलांच्या यशाचा झणझणीत सुवास फक्त कल्याणपुरताच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत आहे.

कल्याणच्या मोहने परिसरातील जास्तीत जास्त घरे ही तेथील एनआरसी कंपनीतून मिळाणार्‍या मोबादल्यातून चालत असे. पण अचानक ही कंपनी बंद पडल्याने मोहने परिसरातील अनेक घरांमध्ये दोन वेळचे जेवण मिळणे कठीण होऊ लागले होते. अशा परिस्थितीत मोठ्या धैर्याने या संकटाला महिलांनी सामोरे जावे यासाठी त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे धाडस नंदा जाधव यांनी दाखवून दिले. हालाखीच्या परिस्थितीत दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर राबविले आणि येथूनच जागृती बचत गटातील निराधार महिलांना एक आशेचा किरण मिळाला. या महिला बचत गटातील महिलांनी दिवस-रात्र एक करून अनेक ठिकाणाहून लग्न, पार्टी, शाळा, हॉस्पिटल्स, सामुहिक समारंभ अशा मिळेत त्या ऑर्डर स्वीकारून आपल्या मसाले पदार्थांची विक्री दूरदूर पर्यंत करण्यास सुरुवात केली. गेल्या दोन वर्षात या बचत गटातून तयार करण्यात आलेल्या मसाल्याची लोकप्रियता केवळ मोहनेच नाही तर आजूबाजूकडील शहाड, ठाणे, जव्हार, पालघर, नाशिक, पुणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणापर्यंत वाढलेली दिसून येत आहे.

जागृती बचत गटांतील महिलांनी घरात खाण्यास अन्न नसताना देखील दुसर्‍यांच्या घरातील अन्न चविष्ट करण्यासाठी घरघरांत उपयुक्त मसाला पोहचविला. या महिलांची बचत गटातून मिळविलेली २०,००० रूपयांची पहिली कमाई जरी आठवली की त्यांच्या डोळ्यांतून आपसुक आनंदाश्रु टपकतात...जणू ते आनंदाश्रू त्यांनी केलेल्या कर्तव्याला सलाम करीत असतात.

कल्याणच्या मोहने येथील जागृती बचत गट गेली दोन तीन वर्षापासून आपल्या प्रसिद्ध आगरी कोळी मसाल्याने ठिकठिकाणच्या परिवारांना अतिशय चविष्ट जेवण तयार करून देत आहेत. आपल्या अन्नपूर्णा कलेच्या जोरावर उन्हाळी कुर्डया, पापड, लोणचे, पाव भाजी मसाला, चहा मसाला, शाही पुलाव मसाला, आदी चविष्ट पदार्थांची देखील विक्री या बचत गटांच्या माध्यमातून केली जात आहे.

या बचत गटातील महिलांच्या माध्यमातून जागृती बचत गटातील महिलांमार्फत वस्तीपातळीवर विविध कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये जाणीव जागृती कार्यक्रम, स्वच्छता मोहीम, महिला अत्याचार विरोधी मोहीम अशा उपक्रमांचा समावेश असतो. या बचत गटामध्ये साधारणपणे १८ महिला आहेत. वर्षभर त्यांचे विविध कार्यक्रम सुरू असतात.

या नारीशक्तीची व्यापकता केवळ फक्त मसाला पदार्थ बनविण्यापर्यंतच न राहता या महिलांनी त्यांच्या गावात असलेले कच्चे रस्ते महापालिकेकडून पक्के रस्ते बनवून घेतले. तर त्यांच्या मोहने परिसरात घंटागाडी येत नसल्याने त्यांनी तीही मागवली. तर तसेच अनेकांच्या घरी सिलेंडर-गॅस येत नसल्याने अनेकांच्या घरी मातीच्या चुली पेटल्या जात असत. पण आता जागृती महिला बचत गटाच्या प्रयत्नाने अनेक घरातील मातीच्या चुली नाहीश्या होऊन आता लोक सिलेंडर-गॅसवर अन्न शिजवू लागले आहेत.

या महिलांनी एक स्वप्न पाहिलं आणि ते साकार झालं. स्त्रियांनी आपलं घर, मुलंबाळं यामध्येच रमावं असा अद्यापही आपल्या समाजव्यवस्थेचा अलिखित नियम आहे. या नियमाची चौकट मोडून, एक मोठं स्वप्न पाहून ते पूर्ण करणार्‍या महिला पाहिल्या की आशेचा एक किरण कुठेतरी दिसायला लागतो. या सर्व महिलांना, त्यांच्या स्वप्नांना आणि ती पूर्ण करण्याच्या जिद्दीला सलाम! त्यांचं स्वप्न साकार करणार्‍या जागृती बचत गटाच्या खजिनदार नंदा जाधव यांनाही मानाचा मुजारा!

जीवनात यश मिळविण्यासाठी माणसाने सतत धडपडणे गरजेचे आहे. जो माणूस जीवनात जेवढा मोठा संघर्ष करतो त्याला तेवढे मोठे यश मिळते.

Related Stories