ताशी ११४ किमी चालणारी सायकल बनवून सायकलला नवसंजीवनी देणारे पाच मित्र

ताशी ११४ किमी चालणारी सायकल बनवून सायकलला नवसंजीवनी देणारे पाच मित्र

Thursday April 28, 2016,

6 min Read

हाय स्पीड क्रूजर बाइक्सविषयी तुम्ही बरेच वाचले आणि ऐकले असेल. शक्य आहे, आपल्यापैकी अनेकांनी अशी बाईक पाहिली असेल किंवा कदाचित ती चालविण्याचा आनंद घेतला असेल. क्षणार्धात हवेशी गुजगोष्टी केल्याची जाणीव करुन देणाऱ्या अशा प्रकारच्या बाईक्स वेगवेड्यांना खूप आवडतात. तथापि तिच्या भरमसाठ किंमतीमुळे ती प्रत्येकालाच विकत घेणे शक्य नसते. जेव्हा कुणी उमदा तरुण हाय स्पीड बाईकचा जोर जोरात आवाज करत समोरुन जातो, तेव्हा आपल्यापैकी अनेक जण मनात खंत करत राहतात. मात्र जर तुम्हाला खूपच कमी दरात सायकलमध्येच बाईक सारखा वेग मिळाला तर? तोसुद्धा केवळ पँडल मारुन. कुठलेही इंधन किंवा ऊर्जा खर्च न करता. खिसा रिकामा न करता एकाचवेळी वेग, रोमांच आणि फिटनेसचा तडका. अशी एखादी सायकल असू शकते यावर विश्वास नाही बसणार. मात्र हे शंभर टक्के सत्य आहे. भोपाळमधील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाच हुशार विद्यार्थ्यांनी हे सत्यात आणून दाखविले आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या सायकलचे मास प्रोडक्शन यशस्वी झाले, तर देशात पुन्हा एकदा सायकलस्वारीचा अंदाज बदलेल. सायकल पुन्हा एकदा शानदार सवारी होईल. याच्या खरेदीची स्पर्धा लागेल. देशात आणि संपूर्ण जगात इंधनाचा वाढता वापर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय मिळेल. महानगरांपासून शहरांपर्यंत ट्रॅफिकच्या वाढत्या समस्येपासून सुटकारा मिळेल.

image


भोपाळच्या गांधीनगर भागामध्ये असणाऱ्या सागर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजीच्या मॅकॅनिकल शाखेत पाच मित्र शिकत आहेत, प्रिंस सिंह, सिराज हुसैन, सय्यद मुशब्बिर, सय्यद इलाफ आणि आमिर सिद्दिकी. यामधील काही बीईच्या तिसऱ्या वर्षाचे तर काही शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. पाचही विद्यार्थ्यांच्या डोक्यात काहीतरी हटके करण्याचे वेड आहे. पाच जणांनी मिळून एक अशी सायकल डिझाईन केली आहे, जिचा टॉप स्पीड ताशी ११४ किमी आहे. क्षणार्धात हवेशी स्पर्धा करणाऱ्या या सायकलला एरोडायनॅमिक डिझाईननुसार बनविण्यात आले आहे. सायकलमध्ये एकूण पाच स्पीड गियर आहेत. फर्स्ट गियरवर सायकलचा वेग काही मिनीटातच ताशी ५५ ते ६० किमीवर पोहचतो. दुसऱ्या गियरवर वेग ताशी ६० ते ७० आणि तिसऱ्या गियरवर वेग ७० च्या वर पोहचतो. चौथ्या गियरवर जिथे तिचा वेग ८० ते ९० असतो, तिथे पाचव्या गियरवर तिचा सर्वाधिक वेग ताशी ११४ किमी पर्यंत मोजण्यात आला आहे. तथापि, या प्रोजेक्टला हाताळणारा विद्यार्थी सिराज हुसैन सांगतो,“सायकलचा आदर्श वेग सध्या ताशी ६० ते ७० किमी ठेवण्यात आला आहे. वेग मर्यादा निश्चित करण्यामागे तर्क आहे की सध्या सायकलला जे टायर लावण्यात आले आहेत, ते जास्तीत जास्त ताशी ६० ते ७० किमी चालू शकतात. वेग मर्यादा वाढविण्यासाठी अजून सायकलला आणखी चांगल्या दर्जाचे टायर लावले जायचे आहेत. जर सध्या त्याला सर्वाधिक वेगावर चालवण्यात आलं तर टायर फुटून चालकाचे संतुलन बिघडण्याची आणि दुर्घटना होण्याची शक्यता आहे.”

image


सायकलमध्ये स्पीडोमीटरही लावण्यात आला आहे. जो सायकल चालवताना वेग मर्यादा दर्शवतो. सायकलचा वेग लक्षात घेऊन बाईकप्रमाणे पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक लावण्यात आला आहे. यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेग असतानाही याच्या इफेक्टिव्ह वर्किंग सिस्टीमचा वापर करुन सायकलला अचानक थांबवू शकता.

image


सायकलचे डिझाईन काहीसे असे बनवले आहे की तुम्हाला दूरवर प्रवास केल्यानंतरही थकवा जाणवणार नाही. सायकलच्या सीट पासून पँडल आणि हँडल बारचे अंतर एरोडायनामिक पोझिशनवर सेट करण्यात आले आहे. यामुळे चालकाला सायकल चालवताना खूप आरामदायी वाटते. पँडल अशा पद्धतीने डिझाईन केले आहे की एकदा पँडल मारल्यावर सामान्य सायकलच्या दहा पँडलची शक्ती एकाच वेळी निर्माण होते, जी सायकलची गती वाढवते आणि चालकाची भरपूर ऊर्जा खर्च करते. गियर पिनियन मागच्या आणि पुढच्या दोन्ही चाकात लावण्यात आले आहे. सायकल चेनवरच चालते. फक्त जुन्या बॉल बेअरिंगच्या जागी प्रिसिसन केज्ड सिस्टीमचा वापर केला गेला आहे, जो चाकाच्या हालचालीला अधिक सोपे बनवतो. सायकलचे एकूण वजनसुद्धा सामान्य सायकल एवढेच ठेवण्यात आले आहे.

image


सिराज सांगतो, “सध्या आम्ही या सायकलमध्ये मार्केटमधून खरेदी केलेल्या घटकांचा वापर केला आहे, ज्याला जवळपास सात ते आठ हजार रुपये खर्च आला आहे. मात्र सायकलचा स्पीड पाहता याची संपूर्ण घडण आणि वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू गुणवत्तापूर्ण असायला पाहिजे. जेणेकरुन वेगात असताना लागणाऱ्या झटक्यांना सायकल सहज सहन करु शकेल. मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्यावर खरेदीची किंमतही कमी केली जाऊ शकते. ही सायकल ग्राहकांने ऑन रोड १५ ते १६ हजारापर्यंत उपलब्ध होऊ शकते.”

image


सिराजचे म्हणणे आहे की जर त्यांना सरकारी स्तरावर ही सायकल बनविण्यासाठी काही मदत मिळाली तर ते याची किंमत आणखी कमी करु शकतात. सध्या त्यांनी या सायकलचे पेटंट मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. पेटंट मिळाल्यावर आणि त्यांची इंजिनिअरिंगची परीक्षा संपल्यावर लगेचच ते याचे उत्पादन घेण्याच्या दिशेने कामाला सुरुवात करतील.

image


सिराज हुसैनचे म्हणणे आहे की या सायकलच्या माध्यमातून त्यांनी अनेक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिली समस्या आहे ऊर्जा संकटाची. म्हणजे ज्या प्रकारे देशात आणि जगभरात पेट्रोल आणि डिझेल सारख्या नैसर्गिक इंधनांचा साठा कमी होत चालला आहे आणि भविष्यात गंभीर ऊर्जा संकट निर्माण होईल अशी परिस्थिती तयार होत आहे, अशात या दिशेने त्यांचे हे पाऊल सार्थ ठरेल. दुसरी समस्या आहे प्रदूषणाची. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. जेव्हा की सायकलपासून मात्र अशा प्रकारचा कुठलाही धोका नाही. याशिवाय वाहनांचा वाढता वापर आणि त्यावर अवलंबून असल्यामुळे लोकांना चालण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत आहे. सायकलिंग हा एक चांगला व्यायाम आहे. याच्या वापरामुळे एकीकडे चालवणाऱ्याचा फिटनेस कायम राहिल आणि त्याचे पैसेही वाचतील. अशा प्रकारे सायकलिंगमुळे एकाच वेळी प्रदूषण नियंत्रण, पैशांची बचत आणि आरोग्य राखणे सोपे होऊ शकते. सिराज सांगतो की आज सायकल यासाठी आऊट डेटेड झाली आहे, कारण लोकांकडे वेळ नाही आहे. प्रत्येकाला आपल्या मार्गावर पोहचण्याची घाई असते. त्यामुळे त्याला कितीही वाटले तरी तो सायकल ऐवजी बाईक किंवा कारने आपल्या इच्छित स्थळी जाऊ इच्छितो. गेल्या १०० वर्षात सायकलचा वेग वाढवण्याच्या दिशेने कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे सायकल दैनंदिन जीवनातून बाहेर फेकली गेली आहे. मात्र आम्ही याचा वेग वाढवून याला पुन्हा एकदा दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

सिराज हुसैन सांगतो की त्याला लहानपणापासूनच अशी मोटरसायकल पसंत होती ज्यामध्ये गरजेनुसार बदल केलेला असेल. तो स्वतःच्या बाईकलाही अशाच प्रकारे तयार करु इच्छित होता. पण त्याच्या घरच्यांनी त्याला याची परवानगी नाही दिली. त्याच्या घरच्यांनी त्याला सांगितले की काहीतरी असे कर ज्यामुळे लोकांची एखादी समस्या दूर होऊ शकेल. बाईकमध्ये बदल घडवून नवी बाईक तयार करणाऱ्यांनी तर भोपाळ शहर भरलेले आहे. तू सायकलमध्ये बदल घडव. तिला अधिक चांगले बनविण्यासाठी काही करु शकत असशील तर कर. सिराज सांगतो की त्याला इथूनच सायकलला अधिक चांगले बनविण्याची प्रेरणा मिळाली. पहिल्यांदा त्याने २०११ मध्ये या सायकलचे पहिले वर्जन तयार केले. तेव्हा तो अकरावीत शिकत होता. मात्र त्यावेळी सायकलचा वेग एवढा नव्हता आणि तिला चालवल्यावर पाठीत दुखायचेही. नंतर त्याने इन्जिनिअरिंगला प्रवेश घेतला, जिथे त्याला या मित्रांचे सहकार्य मिळाले, ज्यांनी सायकलला आज या स्टेजपर्यंत पोहचविण्यात त्याला साथ दिली आहे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

फळविक्रेत्यानं बनवली सोलार कार

युरोपिअन बाजारात भारतीय त्रिमूर्ती उतरवणार ‘मेकींग इन इंडिया’

१६ वर्षाच्या मुलाने पर्यावरण रक्षणासाठी सुरु केले स्वतःचे स्टार्टअप ‘टायरलेसली’

लेखक – हुसैन ताबिश

अनुवाद – अनुज्ञा निकम