खाँसाहेबांची भुमिका हा अभिनय कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा - सचिन पिळगांवकर

0

२०१५ हे वर्ष सरता सरता एक मोठा ऐतिहासिक मराठी सिनेमा प्रेक्षकांना भेट मिळाला. हा सिनेमा आहे 'कट्यार काळजात घुसली'. चाळीस-पंचेचाळीस वर्षापुर्वीचे हे संगीतनाटक आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करुन आहे हे या सिनेमाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. कट्यार..सिनेमातनं प्रत्येक व्यक्तिरेखा या मनस्वी आणि तेवढ्याच प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर आल्या. यापैकीच महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे सचिन पिळगांवकर यांनी साकारलेले खाँसाहेब.

सचिनजींनीही ही भूमिका अविस्मरणीय असल्याची कबुली यावेळी बोलताना दिली. “जेव्हा सुबोध माझ्याकडे खाँसाहेबांची भूमिका घेऊन आला होता तेव्हा ती ऐकूनच मी सुन्न झालो होतो. खाँसाहेब एक घरंदाज मुस्लिम गायक असतात. जे पंडीतजींसारख्या दिलखुलास कलाकाराला भेटतात, त्यांच्यात मैत्रीचे बंध निर्माण होतात आणि पहिल्याच भेटीत पंडितजी त्यांना विश्रामपुरमध्ये यायचे आमंत्रण देतात. मात्र विश्रामपुरला आल्यानंतर मात्र खाँसाहेब पंडितजींशी स्पर्धा करु लागतात. ते स्वतःच्या गायकीबद्दल घराण्याबद्दल खुप भावुक असतात. या दोघांमधले मतमतांतर सिनेमात दिसते पण ते धार्मिक किंवा जातीय नसते तर संगीताच्या प्रेमाबद्दल असते हे लक्षात घ्यायला हवे.”

खाँसाहेब साकारताना सचिनजींसाठी सर्वात आनंदाची गोष्ट होती ती म्हणजे उर्दुमधले त्यांचे संवाद. कर्मठ मुस्लिम घराण्यातले गायक खाँसाहेब सिनेमात उर्दुमध्ये बोलताना दिसतायत.

ज्याबद्दल सचिनजी सांगतात की “मराठीनंतर उर्दू ही माझ्या अत्यंत मनाजवळची भाषा आहे. मीना कुमारी सारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्रीने मला उर्दू भाषा शिकवलीये. मला खूप आनंद आहे की संपूर्ण सिनेमा मी फक्त आणि फक्त उर्दू मध्येच बोलतो, गातो आणि वावरतोही. यात माझा लूक माझे पोशाखही वेगळे आहेत. मला यात वयस्कर दिसायचे होते...हेहेहे खरेतर मला ही दैवी देणगी आहे की मी माझ्या वयापेक्षा जास्त लहान दिसतो त्यामुळे सिनेमात वयस्कर दिसणे हे तसे माझ्यासाठी कठीण होते. पण थँक्स टू विक्रम गायकवाड त्यांनी केलेल्या मेकअपने मी या भूमिकेला साजेसे दिसलोय.”

खाँसाहेबांची व्यक्तिरेखा ही सिनेमात काहीशी नकारात्मक पद्धतीने येते मात्र तरीही खाँसाहेबांबद्दल चीड निर्माण होत नाही उलट त्यांच्याबद्दल सहानूभूतीच वाटत रहाते. आणि हेच या व्यक्तिरेखेचे वेगळेपण असल्याचे सचिनजी सांगतात. “सुरुवातीला बायकोच्या दडपणामुळे खाँसाहेब पंडितजींना राजगायकाच्या पदासाठी गायनाचे आव्हान देतात, सुरुवातीला ते अपयशी होतात ज्यामुळे ते पंडितजींना आपला स्पर्धक मानू लागतात, आणि जेव्हा ते यशस्वी होतात तेव्हा पंडितजींच्या गायकीचे अस्तित्व मिटवण्याचा भाबडा प्रयत्न करतात, या सर्वात त्यांची असुरक्षितता अधिक दिसते ज्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेक्षकांना तिटकारा वाटत नाही उलट अजूनही त्यांच्यात एक प्रामाणिक कलाकार दडलेला असल्याची जाणीव होत रहाते.”

सचिनजींच्या मते खाँसाहेब हे आजच्या अनेक महत्वाकांक्षी तरुणांचे प्रतिनिधित्व करतात ज्यांना यशस्वी व्हायचे आणि त्याची कुठलीही किंमत मोजायला ते तयार असतात पण म्हणून त्यांचा आत्मा मेलेला नसतो तर त्यांच्यातल्या महत्वाकांक्षेने त्याची जागा घेतली असते.

सचिनजी सांगतात की “कट्यार...च्या निमित्ताने खूप वर्षांनी मला आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळाली. २० वर्षांपुर्वी ही भूमिका भूमिका नाटकामधून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक वसंतराव देशपांडे यांनी साकारली होती. गेली ५३ वर्षे मी या कलाक्षेत्रात एक कलाकार म्हणून वावरतोय. यादरम्यान मी अनेक भूमिका साकारल्या, हिंदी तसेच मराठी मनोरंजन क्षेत्रात बालकलाकार ते अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, गायक, नृत्यातले महागुरु अशा अनेक जबाबदाऱ्या मी पार पाडल्यात. पण कट्यार..मध्ये खाँसाहेब साकारणे हा एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी संपूर्णरित्या नावीन्यपूर्ण अनुभव होता. माझ्या अभिनय कारकिर्दीत खाँसाहेबांची व्यक्तिरेखा ही नेहमीच अविस्मरणीय राहील हे नक्की... ”