हिरवळ फुलविणारे ‘मिलापनगर’

हिरवळ फुलविणारे ‘मिलापनगर’

Tuesday November 17, 2015,

3 min Read

एकीकडे उंचच उंच इमारती उभारण्यासाठी झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. परंतु डोंबिवलीतील मिलापनगर परिसरातील रस्ता याला अपवाद आहे. हिरवाई दृष्टीस पडणेही दुरापास्त झालेले असताना मिलापनगरच्या रहिवाशांनी मात्र आपल्या वसाहतीत हिरवाई फुलवली आहे. त्यामुळे डोंबिवली शहरात सिमेंटच्या जंगलात एक हिरवाईचे बेट अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी आकारास आले आहे. आरोग्याला घातक ठरण्याइतका प्रदूषणाचा स्तर गाठलेल्या डोंबिवली एमआयडीसी परिसरात हिरवाई फुलविण्याचे आव्हान पूर्ण करणारे ‘मिलापनगर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन’ सर्व नागरिकांसाठी एक आदर्श ठरले आहे.

डोंबिवली स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर मिलापनगर वसाहत वसलेली आहे. १९८५ मध्ये एमआयडीसीने १६८ प्लॉट्सची ‘मिलापनगर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन’ या नावाने एक वसाहत विकसित केली होती. एमआयडीसीने रहिवाशांशी प्लॉटसाठी करार करताना प्रत्येकाने आपापल्या घरासमोर ५ झाडे लावावीत, अशी अट घातली होती. बंगल्यालगत व समोर ५ फुटांपर्यंत परिसरात झाडे लावण्याची परवानगी देण्यात आली. मिलापनगर परिसरातील आजुबाजूला विविध कारखाने मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत. डोंबिवलीतील प्रदूषणाच्या समस्येकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाले व त्यामुळे देशात १४ वे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून डोंबिवली ओळखले जाऊ लागले. प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे लागेल, याची जाणीव तेथील रहिवाशांना झाली. म्हणूनच नंतर फक्त ५ झाडांवर न थांबता मिलापनगर येथील प्रत्येक कुटुंबाने आपापल्या आवडीनुसार वेगवेगळी झाडे घराभोवती लावण्यास सुरुवात केली आणि बघता बघता सगळा मिलापनगर परिसर हिरव्यागार वृक्षांनी बहरून गेला.


image


झाडांची संख्या वाढविण्याचा ध्यास घेत मिलापनगर परिसरातील नागरिकांनी वृंदावनच निर्माण केले आहे. आज येथे कडुनिंब, बेल, बहावा, बूच, गोरखचिंच, गुंज, सुबाभूळ, चाफा असे वेगवेगळे वृक्ष येथे पहायला मिळत आहेत. मिलापनगरवासी सकाळ- संध्याकाळ त्यांच्या परिसरातील झाडांची निगा राखतात. येथील अनेक कुटूंबातील त्यांची मुले ही परगावी राहत असल्याने त्यांनी उभारलेले वृंदावनच आपला आधार आहे, असे समजून त्यांच्यावर अतोनात प्रेम करताना दिसतात. या वनराईमुळे वेगवेगळ्या झाडांची मैफील सजलेली असतेच, पण या झाडांवर नानाविध पक्षी आनंदाने नांदताना दिसतात त्यामुळे मिलापनगर परिसराच्या सौंदर्यात आणखीन भर पडते. यामुळेच अनेक पक्षीतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी, फोटोग्राफर, सायकलस्वार हे सकाळी फिरण्यासाठी मिलापनगर परिसर गाठतात. या कामांत महिलांनीही मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन झाडांसाठी विशेष मिलापनगर रेसिडेन्सी महिला मंडळ स्थापित करण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्ष वर्षा महाडिक असून त्यांच्यासोबत महिलांची टीमही वसाहतीचे काम पाहते. येथील मिलापनगर रेसिडेन्सी महिला मंडळातर्फे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम, सणवार यांसह पावसाळ्यापूर्वी निरनिराळ्या रोपांचे वाटप करण्यात येते. मिलापनगर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन व महिला मंडळ एकत्रितपणे येथील पर्यावरणाची सुरेल देखभाल करतात. आता येथील दुर्मिळ वृक्षांवर नावे लिहिण्याची योजनाही उदयास आली आहे.

येथील रहिवाशांनी एमआयडीसीकडे सातत्याने पाठपुरावा करून शिळ रस्त्यालगतच्या एका मोकळ्या प्लॉटवर बगीचा करवून घेण्यातही यश मिळवले आहे. त्यांची निगाही इथले नागरिक आपापल्या परीने आनंदाने राखतात. ‘मिलापनगर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशन’ हे त्यांच्या अप्रतिम कार्यामूळे डोंबिवलीकरांसाठी एक आदर्शच ठरले आहे. सर्वच निवासी वसाहतींनी या वसाहतीचा कित्ता गिरवल्यास मुंबई परिसरात निश्चितच हिरवी बेटे उदयास येतील, असे म्हणायला काही हरकत नाही