महोगनीच्या लागवडीतून आर्थिक स्वातंत्र्य....

2

भारतात व्यापारी वृक्षांच्या लागवटीबाबत उदासीनता दिसून येते. आता याबाबत जागृती निर्माण करण्यात येत आहे. सागवानसारखी झाडं मोठ्या प्रमाणात जंगलात वाढतात. पण एक व्यवसाय म्हणून या वृक्षांच्या लागवडीकडे पाहण्याबाबत गांभीर्य दिसून येत नाही. पण सततच्या जनजागृती मोहिमेमुळं आता लोकांमध्ये याबाबत माहिती पसरवण्यात मदत होत आहे. जगभरात व्यापारी वृक्षांच्या लागवडीत मोठे प्रयोग होत आहेत. महाराष्ट्रात महोगनी वृक्ष खाया नावाने ओळखला जातो. महोगनी हे नाव दक्षिण अफ्रिकन आहे. मेक्सिको, ब्राझील, नायजेरिया, क्युबा, फिलिपाईन्स अशा देशात मोठ्या प्रमाणावर या वृक्षाच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात दिसून येतात. महाराष्टातल्या सचिन निळकंठ, भरत पिसे, अशोक सुरवसे, किशोर लोंढे आणि घनश्याम या चार मित्रांनी एकत्र येऊन या बिगव्हिजन कंपनीतर्फे महोगनी वृक्षाच्या लागवडीसाठी जनजागृती आणि त्यातून व्यापारी वृक्षांच्या लागवडीसाठी प्रयत्न सुरु केलेत. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना यशही येऊ लागलं आहे.

जगातील उष्ण कटी बंध परिसरात हे महोगनी हे वृक्ष आढळतात. त्याचे आयुष्यमान १२२ वर्षे मानले जाते. वार्षिक पर्जन्यमान ८०० मिमीच्या पुढे असलेल्या भागात हा चांगला वाढतो. भारतात काझीरंगा, जिम कोर्बेट नॅशनल पार्क, कोकण आदी जंगलात हा वृक्ष आढळतो. याच्या लागवडीचे प्रयोग केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात मध्ये गेल्या ७/८ वर्षापासून सुरु आहेत. आता महाराष्ट्रात ते वाढण्यासाठी सचिन आणि त्याचे सहकारी प्रयत्न करत आहेत.

वृक्ष पूर्ण वाढण्यासाठी ३० बाय ३० फुट जागा लागते. या झाडाची वाढ सरळ होते आणि सुमारे दोन वर्षांत झाडाची उंची २० ते २५ फुट वाढते. कृषी उन्नतीचे सभासद, अभ्यासक व माजी वन अधिकारी यांच्या मते प्रारंभी घन लागवड केली तरी पुढे विरळणी करावी लागते. विरळणी न केल्यास वाढ खुंटते. व्यावसाईक लागवड केल्यास आठवड्यातून एक वेळ पाणी, वर्षातून दोन वेळा शेणखत आणि रासायनिक खत द्यावे लागते. लागवड करताना मिळणारी रोपे कोणत्या प्रजातीची, त्यांची दर्जात्मक खात्री करून घ्यावी लागते. दुष्काळात हे झाड जगू शकते, मात्र वेगाने वाढू शकत नाही. बऱ्यापैकी पाणी लागत असल्याने या झाडाच्या लागवडीबाबत उदासीनता दिसत असल्याचं भरत पिसे यांनी सांगितलं. पण त्यांनी अजून प्रयत्न सोडलेले नाहीत. आजवर १६ एकर पेक्षा जास्त जमिनीवर झाडाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी संमती दर्शवली आहे. हे क्षेत्रफळ वाढत आहे.

या वृक्षाच्या लाकडास फर्निचरसाठी मागणी असते. या झाडाचे लाकूड फ्लोरींग आणि वाद्य बनवण्यासाठीही वापरले जाते. तसेच जहाजे आणि बोटींसाठीही वापरात येते. आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे या लाकडाची किंमत साधारण २००० ते २५०० क्युबिक फुट आहे. यामुळं शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. हे झाड पर्यावरणासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या झाडाची लागवड करावी यासाठी विगव्हीजन कंपनी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांबरोबर १५ वर्षांपर्यंतचा करार केला जातोय. शिवाय कंपनी बाय बॅक करारही करते. तसंच औषधीसाठी वापरली जाणारे सेंद्रीय खतांची उपलब्धता करुन देते.

सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्याचा या वृक्षाच्या लागवडीसाठी अनेक प्रश्न असले तरी येत्या काळात पाऊस चांगला झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असे भरत पिसे यांना वाटते आहे.