टोकियो ऑलिम्पिक तयारीसाठी राज्याकडून तीन कोटींचा निधी

0

टोकियो (जपान) येथे 2020 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून निवडण्यात आलेल्या राज्यातील 61 खेळाडूंची तयारी करुन घेण्यासह त्यांना इतर सुविधा देण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजूर केला. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वित्त मंत्र्यांनी ऑलिम्पिक अभियानासाठी 3 कोटी निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा निधी उपलब्ध करुन देण्यास आज  फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मंजुरी दिली आहे.


टोकियो (जपान) येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने कृती आराखडा तयार करुन त्याबाबतची अंमलबजावणी करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीस 16 ऑक्टोबर 2015 रोजी शासनाने मान्यता दिली होती. या कार्यकारी समितीने आगामी टोकियो ऑलिम्पिक अभियानाकरीता 16 खेळ प्रकारांमध्ये एकूण 61 खेळाडूंची निवड केली आहे.

या निधीमधून ऑलिम्पिक अभियान अंतर्गत स्पोर्टस् सायन्स सेंटरचे नूतनीकरणासाठी 38 लाख 71 हजार, त्यामधील साहित्य दुरुस्तीकरीता 4 लाख 81 हजार, या सेंटरमध्ये क्रीडा वैद्यक शास्त्रातील कुशल आणि तज्ज्ञ व्यक्तींची मानधन तत्त्वावर नियुक्तीकरीता 37 लाख 8 हजार, जिम्नॅस्टीक साहित्याच्या खरेदीसाठी 76 लाख 68 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसह कार्यकारी समितीने निवडलेल्या 61 अतिउत्कृष्ट गुणवत्ताधारक खेळाडूंना त्यांच्या गरजांनुसार ऑलिम्पिक तयारीसाठी अर्थसहाय्य म्हणून 1 कोटी 42 लाख रुपये देखील देण्यात येणार आहेत.