भालचंद्रचा बनला भाऊ...

भालचंद्रचा बनला भाऊ...

Saturday January 02, 2016,

3 min Read

हिंदी असू दे किंवा मराठी मनोरंजन क्षेत्र विनोदी कलाकार हे नेहमीच चाहत्यांच्या फेवरेट कलाकारांच्या यादीत अग्रगण्य असतात. असंच एक नाव मराठी मनोरंजन क्षेत्रात आघाडीवर आहे आणि हे नाव आहे भालचंद्र कदम म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते भाऊ कदम यांचे. फु बाई फु, चला हवा येऊ द्या या शोजमुळे भाऊ लोकांच्या गळ्याचा ताईत बनले. आणि आता विनोदवीर म्हणून त्यांचे नाव या मनोरंजन क्षेत्रात प्राधान्याने घेतले जातेय.

भालचंद्र हे त्यांचे मुळ नाव पण काम करता करता भालचंद्रचे भाऊ झाले. अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही भाऊ या टोपण नावानं विनोदनिर्मिती होताना दिसते. खुद्द भाऊ या गोष्टीला मिष्कीलपणे पुष्टी देतात. “माझ्या घरात अनेकदा कामानिमित्त फोन येतात तेव्हा बायको फोन उचलते आणि जर मी आजूबाजूला नसेल तर सांगते की भाऊ झोपलेत किंवा भाऊ जरा दुसऱ्या कामात व्यस्त आहेत वगैरे वगैरे तेव्हा वाईट वाटतं, पण त्याहीपेक्षा अधिक वाईट वाटतं जेव्हा माझ्या सहनायिका किंवा एखादी सुंदर चाहती माझ्याशी बोलताना भाऊ आम्हाला तुमचे काम खूपआवडते वगैरे म्हणतात तेव्हा.”

image


खूप कमी जणांना माहितीये की भाऊ अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पानाची गादी चालवायचे, लोकांना पान बनवून खिलवण्याचे काम भाऊ करायचे. अर्थात तेव्हा त्यांना फक्त अभिनयाची आवड होती मात्र या क्षेत्रात त्यांनी काम सुरु केलं नव्हते आणि घऱ चालवण्यासाठी म्हणून ते हे काम करायचे, भाऊ सांगतात “आजही मी ते दिवस आठवतो तेव्हा मला माझा अभिमानच वाटतो, मी मिस करतो ते दिवस कारण ते दिवस जगतानाही मी आनंदीच होतो.

यादरम्यान मी अभिनय करत नसलो तरी येणाऱ्या ग्राहकांकडून मी नवनव्या लकबी शिकत होतो म्हणजे एक ग्राहक यायचा तेव्हा प्रत्येक वेळेला तो काहीही बोलण्याआधी प्लस काय माहितीये..अशीच सुरुवात करायचा तर एक ग्राहक जर मी एखादी गोष्ट पानात जास्त घातली तर जोरात बसबसबसबसबस..असं खूप वेगळ्या पद्धतीने बोलायचा मग मी दुसऱ्यावेळेला मुद्दामुन पुन्हा तेच करायतो मग परत ते बसबसबसबसबस.. बोलायचे. मजा यायची. भाऊ त्यांच्या या ग्राहकांचे आवर्जुन आभार मानतात. त्यांच्या मते या लकबींमधून मी आणि माझा अभिनय घडत गेला, म्हणजे आता जेव्हा एखादं स्क्रिप्ट समोर येतं तेव्हा त्यात अभिनय करताना अॅडिशन म्हणून मी या गोष्टी वापरतो. ”

image


रुढार्थाने भाऊ दिसायला देखणे किंवा सुंदर नाहीत पण तरीही आज फक्त आणि फक्त अभिनयाच्या कौशल्यावर त्यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःची एक जागा बनवलीये. भाऊ सांगतात की “काम करताना अनेकदा स्क्रिप्टमध्ये माझ्या सावळ्या रंगावरून, दिसण्यावरुन विनोद निर्माण करायचा प्रयत्न केला जातो तेव्हा वाईट वाटते, एकदा मी एका प्रथितयश कलाकारासोबत मी नाटक करत होतो तेव्हा नाटकाच्यामध्ये अचानक त्याने माझ्या रंगावरुन विनोदाचा पंच मारला मी गोंधळलोच पण सावरुन घेतलं कारण प्रेक्षक हसले. पण नंतर ही गोष्टी मनाला लागली की त्यांनी का असं केलं असेल, शारीरिक गोष्टीवरुन विनोद निर्माण का करावा लागतो, ही गोष्ट मला नाही पटत.”

आज भाऊ नाटक, रिअॅलिटी शो आणि सिनेमा या तीनही माध्यमात काम करतायत. नुकतंच वाजलाच पाहीजे या मराठी सिनेमात भाऊंनी महत्वपुर्ण भुमिका साकारली होती. इतकंच नाही तर राज्यात पार पडणाऱ्या सार्वजनिक इव्हेंटसमध्ये भाऊंचे नाणं खणखणीत वाजताना दिसतं. पण तरीही एक खंत त्यांना आहेच, की इव्हेंटसमध्ये लोकांसमोर वाजणारं हे नाणं सिनेमात मात्र दुय्यम भुमिकेपर्यंतच सीमीत रहातं तिथे मुख्य भुमिकेसाठी अनेकदा स्टारच घेतला जातो, अर्थात हळूहळू हे चित्र ही बदलेल अशी आशा त्यांना आहे.

image


आज मराठी मनोरंजन क्षेत्र झपाट्याने वाढतंय यात प्रत्येकासाठी काम आहे आणि त्या कामाचा योग्य मोबदला आणि चाहत्यांचे भरभरुन प्रेम त्यांना मिळतंय ज्याबद्दल भाऊ या क्षेत्राचे ॠण मानतात.