कलाकृतीवरचा विश्वास हे नटसम्राटच्या यशस्वी निर्मितीमागचे कारण - निर्माता विश्वास जोशी

कलाकृतीवरचा विश्वास हे नटसम्राटच्या यशस्वी निर्मितीमागचे कारण - निर्माता विश्वास जोशी

Saturday January 09, 2016,

4 min Read

सिनेमाच्या प्रदर्शनानंतर पहिल्याच आठवडयात तब्बल दहा कोटींचा व्यवसाय करणाऱ्या नटसम्राटने तिकीट खिडकीवर आणि प्रेक्षकांच्या मनावरही सम्राटपद निर्माण केले. नटसम्राटवर सिनेमा बनवण्याचे स्वप्न दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पाहिले आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले ते या सिनेमाचे निर्माते आणि फिनक्राफ्ट मिडीया अँड एन्टरटेनमेन्टचे सर्वेसर्वो विश्वास जोशी. गेली पंचवीस वर्ष चार्टड अकाऊंटंट म्हणून विविध कंपन्यामध्ये कार्यान्वित राहिलेल्या विश्वास यांची नटसम्राट ही पहिली निर्मिती हे महत्वाचे.

image


२०१३मध्ये विश्वास आणि महेश यांची पहिल्यांदा भेट झाली, पण नटसम्राटसाठी नाही तर आगामी काही प्रोजेक्टसबद्दलची चर्चा त्यावेळी सुरु होती. महेशने सहजच नटसम्राटचे हिंदी स्क्रिप्ट विश्वास यांना वाचायला दिले. खरंतर महेश मांजरेकर हिंदीत नटसम्राट बनवतोय आणि अमिताभ बच्चन त्यात काम करणार अशी हवा त्यापूर्वी माध्यमांमध्ये बनली होती. नटसम्राटचे हिंदी स्क्रिप्ट विश्वासना आवडले पण त्यांना मराठीमध्येच नवी निर्मिती करायची होती. त्यानंतर जवळ जवळ दीड वर्ष या दोघांनी यातल्या कन्टेंटवर चर्चा सुरु ठेवली. अखेर मराठीत नटसम्राट करावा आणि नटसम्राट म्हणून नाना पाटेकर यांना विचारायचे या मतावर दोघांचेही एकमत झाले.

२०१४च्या गणेशोत्सवादरम्यान महेशनी नाना पाटेकर यांना नटसम्राटचे हिंदी स्क्रिप्ट वाचायला दिले, त्यावेळी नाना डॉ.प्रकाश बाबा आमटे सिनेमामध्ये बिझी होते, या सिनेमाच्या प्रिमियरदरम्यान महेश नानांना भेटले, त्यांनी जेव्हा नानांना नटसम्राटच्या स्क्रिप्टबद्दल विचारलं तेव्हा मला स्क्रिप्ट आवडलंय पण तुच पुढे काही बोलला नाहीस असा अस्सल नानास्टाईल जवाब त्यांना मिळाला आणि सुरु झाला नटसम्राट सिनेमाचा प्रवास.

image


सर्वात आधी हिंदी स्क्रिप्ट मराठीत रुपांतरीत करणे महत्वाचे होते म्हणून किरण यज्ञोपवित यांचा टीममध्ये समावेश झाला. २७ फेब्रुवारी २०१५ला कुसुमाग्रज जयंतीला नाशिकमध्ये सिनेमाची आणि यातल्या कलाकारांची अधिकृत घोषणा केली गेली. या घोषणेनंतर वर्षभरात सिनेमा तयार झाला.

विश्वास सांगतात “एखादी व्यक्तिरेखा प्रभावीपणे मांडताना सर्वसाधारणपणे कलाकार तिचा पुर्वार्ध आणि मग उत्तरार्ध साकारतो, पण नटसम्राटचे शुट सुरु झाले तेव्हा नानांची दाढी होती त्यामुळे गणपतराव बेलवलकर यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध आधी शुट झाला. आज पडद्यावर व़डा पाव खातानाचा सीन पाहिला की नानांच्या अभिनय कौशल्याला सलाम करावासा वाटतो तो यासाठी. नानांनी हा संपूर्ण सिनेमा सलग शुट करण्याची विनंती केली होती त्यानूसार सलग ३६ दिवस भोर, कोल्हापूर, पुण्याचे गोखले इन्स्टिट्युट आणि मुंबई फिल्मसिटीमध्ये या सिनेमाचे शुट झाले.”

image


मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये अर्धवट जळलेल्या नाटयनिकेतनचा सेट उभारताना विश्वास यांनी दिलेली माहिती उत्सुकता वाढवणारी आहे. “नाट्यनिकेतनचा सेट फिल्मसिटीमध्ये उभारला गेला तेव्हा स्टेजसमोर अर्धवट जळलेल्या खुर्च्या आम्हाला हव्या होत्या. नवीन खुर्च्या आणून त्या जाळून तिथे ठेवणे हा पर्याय योग्य वाटत नव्हता. याचदरम्यान महेशमुळे आम्हाला कळले की पुण्याच्या सिटीप्राईड थिएटरचे चाफळकर यांचे रत्नागिरीला एक थिएटर आहे ज्याचे त्यांना नूतनीकरण करायचे आहे आणि त्यामुळे तिथले सामान ते काढून टाकतायत. आमचा खुर्च्यांचा प्रश्न आपोआप सुटला. तिथल्या जुन्या खुर्च्या इथे आणून त्याला अर्धवट जाळून त्या थिएटरमध्ये फिक्स केल्या गेल्या.”

विविध क्षेत्रातली तज्ज्ञ माणसं योग्य वेळी योग्य जागी एकत्र येणं या वाक्यात नटसम्राटचे यश सांगता येईल. ज्यात सिंहाचा वाटा हा सिनेमाचा दिग्दर्शक महेशचा असल्याचे विश्वास सांगतात. “महेश जेव्हा दिग्दर्शन करतो तेव्हा त्याच्या डोक्यात सिनेमा आधीपासूनच तयार असतो त्यामुळेच नटसम्राटचे शुटिंग नियोजित पद्धतीने झाले. सहकलाकारांचे उत्तम सहकार्य हे विसरुन चालणार नाही. काही वेळेला शुटिंगची ठरलेली शिफ्ट अचानक वाढवी लागायची पण कुठल्याही कलाकाराने तक्रार केली नाही, हे महेशचेच संचित असल्याचे विश्वास सांगतात. नाना आणि महेश यांच्याशिवाय मी या कलाकृतीचा कधीच विचार केला नसता” ही कबूलीही विश्वास यांनी बोलताना दिली.

“नटसम्राटच्या निमित्ताने मराठीत एक स्वागतार्ह प्रयोग केला गेला. नटसम्राट आधी प्रदर्शित झालेल्या मुंबई पुणे मुंबई २ आणि कट्यार काळजात घुसली या दोनही सिनेमांच्या प्रत्येक स्क्रिनिंगला थिएटरमध्ये नटसम्राटचा टिजर दाखवला जात होता. यानिमित्ताने कट्यार आणि मुंबई पुणे मुंबई २ पहायला येणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रेक्षकवर्गापर्यंत नटसम्राट पोचायला मदत झाल्याचे” विश्वास यांचे मत आहे.

image


प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्याची क्षमता सिनेमामध्ये असायला हवी असं एक निर्माते म्हणून विश्वास यांना वाटतं. “टेलिव्हिजनचा सध्याचा वाढता प्रभाव पहाता सिनेनिर्मात्यांसमोर हे एक आव्हान आहे. पण जर कलाकृती प्रभावी असेल तर प्रेक्षक थिएटरपर्यंत येतात हे यापूर्वीही सिद्ध झालंय. नटसम्राट प्रभावी वाटतो कारण त्याच्या सादरीकरणात कुठलाही अनावश्यक घटक जोडलेला नाही म्हणजे मग सिनेमात सध्या आवर्जुन दिसणारे इन फिल्म ब्रँडिंग असू दे किंवा क्रिएटीव्ह लिबर्टीच्या नावाखाली जबरदस्ती घालण्यात आलेले एखादे गाणे असो. नटसम्राट सिनेमा हा त्या साहीत्यकृतीशी प्रामाणिक रहातो म्हणूनच तो प्रेक्षकांना भावतो,” आणि आपल्या कलाकृतीवरचा हा विश्वासच विश्वास जोशी यांच्या या पहिल्या निर्मितीला यशस्वी बनवू शकलाय.