तरुणींनो, लक्ष्य गाठण्यासाठी आक्रमक व्हा- प्रसन्ना अनिरेड्डी

तंत्रज्ञान तज्ज्ञ प्रसन्ना अनिरेड्डी... एक अतिशय साधेसरळ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व.... आयुष्यात मिळत गेलेल्या संधींचे सोने करत त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात एक यशस्वी कारकिर्द केली. तंत्रज्ञान या आपल्या जिव्हाळ्याच्या विषयाला केंद्रस्थानी ठेवून, त्यांनी या क्षेत्रात यशाची नवनवीन शिखरे तर गाठलीच पण त्याचबरोबर एक मुलगी, पत्नी आणि आई म्हणूनही आपली भूमिका समर्थपणे पार पाडली... त्यांची यशस्वी कारकिर्द, काम आणि घर यातील समतोल साधण्यात मिळविलेले यश इत्यादी विविध विषयांबाबत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतले.

0
प्रसन्ना अनिरेड्डी.
प्रसन्ना अनिरेड्डी.

वडिलांची भूमिकाः

आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यशस्वी कारकिर्द करणाऱ्या प्रसन्ना अनिरेड्डी जात्याच हुशार असल्या तरी फारशा महत्वाकांक्षी कधीच नव्हत्या. त्यांच्या वडिलांनी मात्र महत्वाकांक्षा ठेवण्यासाठी मुलीला सतत प्रोत्साहन तर दिलेच पण योग्य मार्गदर्शनही केले. त्यांच्यातील या बदलात महत्वाचा टप्पा ठरला तो बिटस् पिलानीसारख्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाल्यानंतर... हैदराबादच्या स्टॅनले कनिष्ठ महाविद्यालयात शिकताना इंटरच्या परीक्षेत राज्यात नंबरात आल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या पर्वाला सुरुवात झाली. “ आज जेंव्हा मी मागे वळून पाहाते, त्यावेळी मला वाटते की मी फारशी महत्वाकांक्षी कधीच नव्हते. मात्र जे करायची ते आवडीने आणि उत्साहाने... खरे तर बिटस् पिलानीसारख्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाल्यानंतरही एवढ्या लांब जाण्याची माझी इच्छाच नव्हती. मला उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेऊन हैदराबादला घरीच रहायचे होते. पण माझ्या वडिलांच्या मते आपण जेंव्हा घरापासून दूर एखाद्या अव्वल शिक्षणसंस्थेत जातो, तेंव्हाच आपल्याला खूप जास्त शिकता येते आणि भविष्य वेगळे वळण घेते. आज जरी गोष्ट मला अगदी पटली असली, तरी त्यावेळी मात्र मी त्याबाबत मुळीच आग्रही नव्हते, ” त्या सांगतात. म्हणूनच त्या बिटस् पिलानीमध्ये प्रवेश घेण्याच्या आपल्या निर्णयाचे सर्व श्रेय आपल्या वडिलांनाच देतात. पिलानीमध्ये शिकण्याचा अनुभव त्यांच्यासाठी खूपच वेगळा आणि महत्वाचा ठरला. त्याबाबत त्या सांगतात, “पिलानीने मला माझ्या स्वतंत्र कोषातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका केली. त्याठिकाणी मला वेगवेगळ्या संस्कृतींचा परिचय तर झालाच पण अनेक मित्रमैत्रिणीही मिळाले.”

पिलानीनंतरचा मोठा टप्पा होतो तो म्हणजे मिशिगन विद्यापीठ.... तेथे शिकत असतानाच त्यांनी टिचिंग असिस्टंट अर्थात अध्यापन सहाय्यक म्हणूनही काम केले. “माझ्या तेथील प्राध्यापकांना माझ्यातील क्षमता जाणवली आणि त्यांनी नेहमीच मला या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच माझ्यातील आत्मविश्वास खूपच वाढला,” त्या सांगतात.

'ऑटोमेशेन टेक्नॉलॉजी इन्क' मध्ये रुजूः

पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षण सुरु असतानाच त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्या आपल्या पतीबरोबर बे एरियामध्ये रहायला गेल्या आणि नोकरीचा शोध सुरु झाला. त्यावेळी अमेरिका मंदीचा सामना करत होती. मात्र सुदैवाने प्रसन्ना यांना ऑटोमेशन टेक्नॉलॉजी इन्क नावाच्या एका स्टार्टअप कंपनीमध्ये काम करण्याची खूपच चांगली संधी मिळाली. “पुढे प्रोग्रेस सॉफ्टवेअरने या कंपनीत मी काम करत असलेला विभाग विकत घेतला. मात्र तोपर्यंत मी तेथे काम करायला लागून सुमारे पंधरा वर्षे झाली होती,” त्या सांगतात. दरम्यान २००० साली त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागे दोन कारणे होती, एक म्हणजे कुटुंबियांबरोबर अधिक वेळ घालविणे आणि दुसरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुलींना आपल्याच देशात वाढविण्याची इच्छा.... “माझे पती हे इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात कार्यरत होते आणि येथे परत येताच त्यांनी हैदराबादमध्ये नॅनो ब्राईट सोलार टेक्नॉलॉजीज ही स्वतःची कंपनी सुरु केली. एक स्वतंत्र व्यवसायिक असल्याने त्यांचे सतत कामात असणे साहाजिकच होते,” त्या सांगतात. पंधरा वर्षे ऑटोमेशनमध्ये काम केल्याने प्रसन्ना यांनाही यादरम्यान नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी मात्र ऑटोमेशनमध्येच राहाण्याचा निर्णय घेतला. “कारण स्टार्टअपमध्ये काम करण्याचा थरारच मला भयंकर आवडतो. त्याचप्रमाणे संस्थापकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि कामात वैविध्यपूर्ण संधी देऊन मला दिलेले प्रोत्साहनही माझ्यासाठी खूपच आवश्यक होते,” त्या सांगतात.

नवे पर्वः इंजिनियरींग डिरेक्टर अर्थात अभियांत्रिकी संचालक

ऑटोमेशन प्रोग्रेस सॉफ्टवेअरकडे गेल्यानंतर, त्या प्रोग्रेसमध्ये रुजू झाल्या. तेथे त्या लवकरच व्यवस्थापकीय विभागाकडे वळल्या... एका नव्या पर्वाला सुरुवात झाली...प्रोग्रेसमध्ये इंजिनियरींग डिरेक्टर अर्थात अभियांत्रिकी संचालक म्हणून त्यांनी काम सुरु केले. त्यांची इंजिनियरींग मॅनेजर्स अर्थात अभियांत्रिकी व्यवस्थापक आणि टीम लिडस् चा समावेश असलेल्या तीस लोकांची टीम तयार झाली. “असे असले तरी तंत्रज्ञान हाच माझा मुख्य आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय होता... त्यामुळे या नव्या भूमिकेत काम करताना मार्केटींग आणि सेल्समधील बऱ्याच जणांशी मला सातत्याने संवाद साधावा लागला, तरीही हृदयात मात्र तंत्रज्ञानच राहिले. मला वेळोवेळी मिळत गेलेल्या नवनवीन कामांच्या संधीचे मी सोने केले. तसेच ही कामे उत्कृष्ठ पद्धतीने आणि वेळेत पूर्णही केली. माझ्या शिस्तबद्ध काम करण्याच्या पद्धतीमुळे मला अधिकाधिक संधी मिळत गेल्या,” त्या अभिमानाने सांगतात.

गुण-दोषः

एवढे यश मिळाल्यानंतर कोणाचेही डोळे खरे तर दिपूनच जातील... अशा वेळी एखादा अवगुण तर सोडाच पण छोटीशी चूकही मानण्यात लोकांना कमीपणा वाटतो. प्रसन्ना मात्र या गोष्टीला अपवादच म्हणाव्या लागतील. कारकिर्दीच्या या टप्प्यावरही त्या स्वतःचे परखड विश्लेषण करतात आणि गुणांप्रमाणेच दोषांवरही नेमके बोट ठेवतात. स्वतःच्या यशाचे रहस्य सांगताना त्या म्हणतात, “ आपले काम सर्वोत्तम प्रकारे करण्याची जबरदस्त आवड, घट्ट नाते प्रस्थापित करण्याची माझी क्षमता आणि माझ्या टिमला सर्वोत्तम कामगिरीसाठी सतत प्रोत्साहीत करण्याची ताकद, हेच माझ्या मते माझ्या यशाचे रहस्य आहे.” तर “ मी फारशी परखड किंवा मोकळी व्यक्ती नाही. पण मी थोडी अधिक तसे बनावे, असे मला वाटते. मी खूप तंत्रज्ञान विषयक गटांचा भाग बनावे, माजी विद्यार्थी मित्रांबरोबर अधिक संपर्कात रहावे, इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत, असेही मला वाटते. अर्थात मी अशी नाही किंवा हे करत नाही, हे सांगताना मला फारसा अभिमान वाटत नाहीये, पण मला वाटते, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असाल तरीही तुम्ही यशस्वी होऊ शकता. किंवा कदाचित मी अधिक मोकळी असते तर मी अधिक यशस्वी ठरले असते,” त्या मोकळेपणाने मान्य करतात.

यशाचे भागीदारः

प्रसन्ना यांच्या मते त्यांच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. “माझे आई-वडील गरजेच्या वेळी नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यांनी नेहमीच मला मदत केली. माझ्या मुली लहान असताना त्यांची काळजीही त्यांनीच घेतली. हाक मारताच ते हजर होत असत. जेंव्हा मुलींना सुट्टी असे किंवा त्या आजारी असत, त्यावेळी ही मदत खूपच आवश्यक असे. घरच्यांकडूनच अनेक गोष्टींची काळजी घेतली गेल्यानेच मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकले. कुटुंबाचा भक्कम आधार निश्चितच महत्वाचा होता,” त्या सांगतात. त्याचबरोबर मुलांना वाढविण्यात आपल्या पतीनेही बरोबरीचा वाटा उचलल्याचे त्या आवर्जून मान्य करतात. “स्वतः एक व्यावसायिक असल्यामुळे अतिशय व्यस्त असूनही माझे यजमान मुलींसाठीही वेळ काढत. त्यांना शाळा-क्लासमध्ये सोडायला जाणे आणि त्यांच्या अभ्यासात मदत करणे, यासाठी ते नेहमीच वेळ देत. कारकिर्दीचं उच्च लक्ष्य ठेवण्यासाठी त्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले,” त्या सांगतात.

आईची भूमिकाः

प्रसन्ना यांना दोन मुली आहेत. अपूर्वा आणि अल्पना.. “लहानपणापासूनच माझ्या दोन्ही मुली स्वतंत्र बाण्याच्या होत्या. मला वाटते नोकरी करणारी आई असल्याचा हा एक फायदाच होता. खरे तर, आज माझ्या मुलीच मला कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. जर मी गृहिणीअसते, तर माझ्या मुलींच्या प्रत्येक गोष्टीत खूप गुंतले असते, पण मी स्वतः काम करत असल्याने, मी बऱ्याचदा त्यांचे निर्णय त्यांना घेण्याचे स्वातंत्र्य देत गेले. माझ्या मते त्यामुळे भविष्यात मुले अधिक प्रगल्भ होतात. माझ्या मुली खूपच जबाबदार आहेत,” त्या कौतुकाने सांगतात.

एका यशस्विनीचा कानमंत्रः

प्रसन्ना यांच्या मते, भारताशी तुलना करता, अमेरिकेत काम करणाऱ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या महिलांची संख्या खूप जास्त आहे. भारतात परिस्थिती थोडी वेगळी आहे. ऑफीसमधून रात्री उशिरा घरी परतणे सुरक्षित नसल्याने ऑफीसमध्ये उशिरापर्यंत न थांबता येणे, यासारख्या अनेक छोट्यामोठ्या समस्या येथील महिलांपुढे असतात आणि त्याचा त्यांच्या कामावर मोठा परिणाम होऊ शकतो. “त्यामुळेच या क्षेत्रातील तरुणींना माझा सल्ला आहे की जर तुम्हाला तुमचे एखादे ध्येय गाठायचे असेल, तर आक्रमकपणे त्याच्या मागे लागा...कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला आता वाटते, की मी देखील सुरुवातीच्या काळात ही आक्रमकता दाखवायला हवी होती,” त्या सांगतात.

आमच्याशी साधलेल्या या मनमोकळ्या संवदाबद्दल प्रसन्ना यांचे खूप आभार... आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा