ॲसिड पिडीतांसाठी मुंबईत पाच मार्चला ‘कॉन्फिडन्स वॉक’

0

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला आयोग व दिव्यज् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ॲसिड ॲटॅकमुळे  बाधित (ॲसिडपीडीत) व्यक्तींसाठी पुनर्वसन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याचअंतर्गत ॲसिडपिडीत व्यक्तींचा आत्मविश्वास व सन्मान वाढावा या हेतूने मुंबईत 5 मार्च रोजी ‘कॉन्फिडन्स वॉक’ आयोजित करण्यात आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर व श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 


महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि दिव्यज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 मार्चला सायंकाळी 6 वाजता वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया या ठिकाणी ‘कॉन्फिडन्स वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, ॲसिड पीडित व्यक्तींचे मनोधैर्य वाढावे या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, ॲसिड पीडितांकडे समाज दया भावनेने पाहतो किंवा झिडकारतो. सामान्य व्यक्तींप्रमाणे त्यांना स्वीकारले जात नाही. हा भेदभाव दूर व्हावा, त्यांना सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावे, त्यांचे मनोबल वाढावे, त्यांना विनामूल्य वैद्यकीय उपचार मिळावे, त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम व्हावे, नोकरी मिळण्याकरिता त्यांना सहकार्य व्हावे यासाठी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस यांचे बहुमोलाचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. 


यावेळी श्रीमती फडणवीस म्हणाल्या की, समाजातील ॲसिड पीडित व्यक्तींचा आत्मविश्वास वाढावा, त्याना प्रतिष्ठा मिळावी यासाठी ‘कॉन्फिडन्स वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात समाजातील नामांकित व्यक्ती, उद्योजक, कलाकार सहभागी होणार आहेत. या उपक्रमातून ॲसिडपीडितांना धीर आणि समाजाचा पाठींबा मिळेल. (सौजन्य- महान्युज)