रेस्टॉरन्टमध्ये गेल्यावर काय खावे याचे उत्तर देणारे ‘केचअप’

रेस्टॉरन्टमध्ये गेल्यावर काय खावे याचे उत्तर देणारे ‘केचअप’

Saturday March 12, 2016,

6 min Read

फूडटेक, फूड रेकमण्डेशन्स आणि फूड डिलिव्हरी हे सध्या खूप लोकप्रिय असलेले दिसते. या क्षेत्रात अनेकजण आधीपासूनच कार्यरत असले तरीही अजूनही बऱ्याच जणांना या क्षेत्रात वाव आहे. सिरि आणि गुगल नाऊ सारख्या सोशल आणि चॅट प्लॅटफॉर्मवरुन रेकमण्डेशन्स करण्याकडे हे मार्केट सरकताना दिसते आहे. पुणे स्थित ‘क्विन्टो’ आणि नव्याने आलेले गुडगावस्थित ‘केचअप’ यांनी रेकमण्डेशन्स देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

दोन्ही स्टार्टअप्सच्यानुसार जरी मार्केटमध्ये विविध रेस्टॉरन्टची, शेफ्सची, मेन्युच्या क्युरेशनची एकत्र यादी आणि फूड डिलेव्हरी उपलब्ध करुन देणारे अनेक प्लॅटफॉर्म असले, तरी फार थोडे प्लॅटफॉर्म्स ग्राहकांना रेस्टॉरन्टमध्ये पाहिजे असलेले खाद्यपदार्थ मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करतात.

रेस्टॉरन्टमध्ये गेल्यावर काय मागवायचे किंवा हे रेस्टॉरन्ट कुठल्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहे हे ठरवताना अनेकांचा गोंधळ उडतो. ही समस्या सोडवणे हे ‘केचअप’चे लक्ष्य आहे. ‘केचअप’ची टीम म्हणते की केचअप त्याच्या वापरकर्त्यांना कुठेही प्रत्येक वेळी सर्वात्कृष्ट जेवण मिळविण्यास सक्षम करते. याच तत्वावर आधारित इतर रेकमण्डेशन ऍपप्रमाणे केचअपसुद्धा रेस्टॉरण्टमधील खाद्यपदार्थांची सखोल माहिती पुरविण्यासाठी नॅचरल लॅन्ग्वेज प्रोग्रॅमिंग आणि ग्राहकांच्या शिफारशींचा वापर करते.

उपयोगकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक प्राधान्ये, आचरण, हवामान आणि लोकसंख्याशास्त्रानुसार पदार्थ सुचविले जातील असा विविध पदार्थांसाठीचा एक पर्सनलाईज्ड रेकमण्डेशन प्लॅटफॉर्म बनणे हा आमचा दृष्टीकोन असल्याचे टीम सांगते.


केचअपची मुख्य टीम  

केचअपची मुख्य टीम  


नरेंद्र कुमार आणि चिराग तनेजा हे दोघे मित्र होते आणि अनेक मित्रांप्रमाणे ते सुद्धा दिल्लीमधील खाण्यासाठीची विविध ठिकाणे शोधून काढायचे. चिरागची सर्जरी झाली आणि त्याची भूक कमी झाली. खवय्ये असल्यामुळे दोघेही एकत्र असताना काही न काही खात असायचे. अनेकदा वेगवेगळ्या रेस्टॉरन्टमध्ये गेल्यावर काय मागवायचं हा मात्र नेहमीच त्यांच्यासमोरचा प्रश्न असायचा.

झोमॅटोसारख्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर या दोघांना चांगले रेस्टॉरन्ट किंवा चांगल्या रेस्टॉरन्टचे पर्याय सुचविले जायचे, मात्र त्याठिकाणी जाऊन काय खावे हे त्यांना माहिती नसायचे. तेव्हा त्यांनी शहरामध्ये कुठे कुठला पदार्थ चांगला मिळतो याविषयीचे एक पुस्तक लिहायचे ठरवले.

तथापि, त्यांना हे काम खूप वेळखाऊ आणि सहज पूर्ण करता न येणारे वाटले. तेव्हा त्यांनी शहरभरातील लोकांना विविध रेस्टॉरन्टमध्ये जाऊन त्यांच्या तिथल्या अनुभवावरुन तिथल्या पदार्थांबाबतची माहिती सांगण्यासाठी आमंत्रित करायचे ठरवले. त्यांनी केचअप गँग नावाचा एक फेसबुक ग्रुप तयार केला.

“ग्रुपवर लोकांनी विविध रेस्टॉरन्टमधील विविध पदार्थांबाबत त्यांचे अनुभव, मतं आणि त्याबाबतचे विचार शेअर केले. आम्ही विचार केला की ही प्रोसेस ऑटोमेट करुन रिअल टाईम रिझल्ट्स का मिळवू नये आणि त्यामधून मोबाईल ऍप सुरु करण्याची कल्पना अस्तित्वात आली,” असं 30 वर्षांचा चिराग सांगतो. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केलेला, सोशल मीडियाला फॉलो करणारा आणि खाद्यपदार्थांविषयी सखोल ज्ञान असलेला राहुल मक्कर सुरुवातीच्या काळातच त्यांच्याशी जोडला गेला. रेस्टॉरन्ट्सबरोबरची हातमिळवणी आणि इव्हेंट्स सांभाळण्याची जबाबदारी बिपीन तनेजाने स्विकारली.

एक मजबूत टेक्निकल टीम उभारण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी अब्दुल खालीद या आयआयटी दिल्लीच्या माजी विद्यार्थ्याला रुजू करुन घेतले. त्याने धोका पत्करुन केचअपचा सहसंस्थापक म्हणून जोडले जाण्याचा निर्णय घेतला.

“आम्ही सर्व एका सामाईक गोष्टीचा शोध लावत होतो आणि ती म्हणजे ‘इथे चांगले काय मिळते’. जवळपास आम्हा सर्वांनाच वाटतं की एखाद्या व्यक्तीला चांगला पदार्थ कुठला ते समजण्यासाठी त्याला पदार्थ कसे बनवतात हे माहिती असायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये एक शेफ दडलेला असला पाहिजे.”

त्यांच्यातील महात्त्वाच्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांचे खाद्यपदार्थांविषयीचे अभिप्राय एकत्र केले, जे ग्राहकांना त्यांच्या आसपास विविध रेस्टॉरन्टमधून उपलब्ध असलेले सर्वोत्तम पदार्थ शोधायला मदत करतात. अशा प्रकारे जेव्हा कुणी या ऍपला विचारते की ते एखाद्या जागी जाऊन काय खाऊ शकतात, तेव्हा उत्तरादाखल सर्वोत्तम रेकमण्डेशन्स येतात. एक उदाहरण देऊन चिराग सांगतो, जर एखाद्याला त्याच्या विभागामधील सर्वोत्कृष्ट मसाला डोसा खायचा असेल तर ते त्यासाठी विचारणा करु शकतात आणि त्यांना ताबडतोब लोकांच्या रेकमण्डेशन्सवर आधारित त्यांच्या विभागातील मसाला डोसा मिळणाऱ्या सर्वोत्कृष्ट ठिकाणांची यादी मिळते.

‘केचअप’ सर्व सोशल मीडिया फीड्स आणि सोशल ब्लोग्स एकत्र करते, त्याचे विश्लेषण करते आणि झटपट शिफारस तयार करते. या शिफारशीला तुमच्या विश्वासू मित्रांकडूनही बळकटी मिळत असल्याने याची विश्वासार्हता वाढते.

“उदाहरणार्थ, बेरी पुलाव हा सोडा बॉटल ओपनर वालाकडे खाल्लाच पाहिजे असा पदार्थ आहे हा आमच्या अल्गोरिदममधून पुढे आलेला परिणाम आहे. हे ऍप वापरणाऱ्या आणि या पदार्थाची शिफारस केलेल्या तुमच्या मित्रमैत्रीणींच्या नेटवर्ककडून तो सत्यापित केला जातो,” चिराग सांगतो. अशा प्रकारे उदाहरणात सांगितल्याप्रमाणे जर अल्गोरिदमद्वारा बेरी पुलावची शिफारस केली गेली, तर त्याबरोबर वापरकर्त्याला या पदार्थाची शिफारस करणाऱ्या सोशल नेटवर्कवरील त्याच्या मित्रमैत्रीणींची यादीही मिळते.

टीमने त्यांचे ऍण्ड्रॉइड ऍप नोव्हेंबर 2015 मध्ये बाजारात आणले, जे गुडगावमध्ये आजवर एक हजाराहून जास्त वेळा डाऊनलोड केले गेले आहे. ‘केचअप’ लवकरच त्यांचे आयओएस ऍप घेऊन येत आहे. एशियन हॉकर्स मार्केट, पॅलेट फेस्ट 2015 आणि दिल्ली कॉकटेल विक यासारख्या दिल्लीतील सर्व फूड फेस्टिव्हल्समध्ये ‘केचअप’ पार्टनर असल्याचं ते सांगतात. या फेस्टिव्हल्सना त्यांनी मोबाईल आऊटलूक देऊन फेस्टिव्हल्सना भेट देणाऱ्यांना ‘इथे काय चांगले मिळते’ हे ठरविण्यास मदत केल्याचा ते दावा करतात.

टीम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यांनी कुटूंबियांकडून व मित्रपरिवाराकडून छोट्या प्रमाणात गुंतवणूक उभी केली आहे. जे मेन्टॉरशीप आणि मार्गदर्शन देऊ शकतात अशा गुंतवणूकदारांकडून निधी उभा करण्याची त्यांची योजना आहे.

शिफासर केल्या जाणाऱ्या पदार्थाचा आकडाही लवकरच 3000 वरुन 15,000 करण्याची टीमची योजना आहे आणि त्यानंतर वर्षभरात हा आकडा 2,00,000 पदार्थांपर्यंत त्यांना वाढवायचा आहे. लवकरच ते उत्तर भारतातील आणखी शहरे आपल्या ऍपवर आणणार आहेत. ज्यामध्ये ते अमृतसर, लुधियाना, चंदिगढ, जम्मू आणि काश्मिर, लखनऊ, सिमला आणि मनाली येथील पदार्थांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. झोमॅटो आणि स्विग्गी यांना पसंती देणाऱ्या पिढीचे नेतृत्व करणारे व्यासपीठ बनण्यासाठीही टीम योजना आखत आहे.

एखाद्या गोष्टीसाठी ‘सिरि’ किंवा ‘गुगल नाऊ’, चॅटवर आधारित आणि इतर रेकमण्डेशन इन्जिन्सची सध्या बाजारात मक्तेदारी आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘मॅजिक टायगर’ या डिलेव्हरी स्टार्टअपने ग्राहकांना चॅटींगच्या माध्यमातून खरेदी करायला मदत करण्याच्या उद्देशाने एआयवर आधारित स्टार्टअप ‘झोयो’ संपादित केले. या संपादनानंतर आता ‘मॅजिक टायगर’ ग्राहकांच्या खाद्यपदार्थ आणि त्यांच्याशी संबंधित उत्पादनांबाबतच्या प्रश्नांवर उत्तर देईल.

पुणे स्थित ‘क्विन्टो’ने ‘फासूस’चा संस्थापक जयदीप बर्मनकडून एक अघोषित रक्कम उभी केली आहे. ‘केचअप’सुद्धा त्यासारखेच शिफारशींवर आधारित मॉडेलनुसार काम करत आहे आणि त्याला सुद्धा अद्याप वार्षिक महसूल निर्माण करायचा आहे. लोकांनी ऍप डाऊनलोड करणे किंवा फेसबुक पेजवरील सदस्य याला ट्रान्झॅक्शनची किंवा विकासाची पद्धत मानली जाऊ शकत नाही. गुंतवणूकदार आणि बाजाराचे जास्तीत जास्त लक्ष हे वार्षिक महसूल निर्माण करणाऱ्या मॉडेलवर असल्यामुळे केचअपने विकास आणि महसूल खेचून आणणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर ‘स्विग्गी’सारखे स्टार्टअप जास्त निधी उभा करत असल्याने ते सुद्धा पर्सनलाइज्ड चॅट रेकमेण्डेशन मॉडेलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे. ते मुळातच त्यांच्या स्वतःच्या विविध सोशल रेकमेण्डेशनच्या विभागात कार्यरत आहेत. या कंपन्यांकडे केवळ खूप पैसाच उपलब्ध नाही, तर त्यांचे आधीच अनेक रेस्टॉरन्टबरोबर टाय-अप आणि भागीदारीही आहे.

याला मागणी आहे – फूड सर्विसेसचे जवळपास 50 अब्ज डॉलरचे मार्केट आहे – मात्र स्केलिंगची समस्या या क्षेत्रासमोरची मोठी अडचण आहे. ‘टायनीआउल’सारख्या कंपन्यांना या समस्येला लवकरात लवकर तोंड कसे द्यायचे हे समजले आहे. त्याचबरोबर ही स्टार्टअप्स विकास साधण्यासाठी त्यांच्या शोध कार्यार्थ गुंतवणूकदारांचा खूप पैसा खर्च करत आहेत. स्टार्टअप्सना कमी कालावधीत फंडिंग कंपन्यांनी वारंवार उपलब्ध करुन दिलेला निधी हा याचा पुरावा आहे.

‘केचअप’ या मोठ्या कंपन्यांना आणि त्यांच्या बरोबरच्या स्पर्धेला तोंड देऊ शकेल की नाही हा प्रश्न आहे.

लेखिका – सिंधु कश्यप

अनुवाद - अनुज्ञा निकम