बारा वर्षाच्या क्षिरजाने साकारलेल्या बाहुल्यांचा अनेकांना मदतीचा हात

बारा वर्षाच्या क्षिरजाने साकारलेल्या बाहुल्यांचा अनेकांना मदतीचा हात

Friday October 23, 2015,

4 min Read

‘लहान माझी बाहुली मोठी तिची सावली’ म्हणत असो वा ‘माय वॉकी टॉकी डॉल इज बिगर दॅन मी’ म्हणत, चिमुरड्या मुली आपल्या बाहुलीबरोबर अशा काही रमतात की त्यांना आसपासच्या जगाचा विसर पडतो. आपल्या बाहुलीबरोबर लुटुपुटुचा भातुकलीचा संसार मांडून आपले असे एक निरागस विश्व त्या निर्माण करतात. क्षिरजाही अशीच बाहुल्यांमध्ये रमणारी चिमुरडी. मात्र ती रमते आपल्या बाहुल्या आणि त्यांचे विश्व स्वतः निर्माण करण्यामध्ये. आजपर्यंत तिने निरनिराळ्या प्रकारच्या १७० बाहुल्या तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्या या बाहुल्यांचा वापर ती समाजकार्यासाठी करित आहे.

image


याची सुरुवात झाली तिच्या शाळेत बनवायला सांगितलेल्या दिवाळी कंदिलापासून. “तिची आर्ट ऍण्ड क्राफ्टची आवड आम्ही ओळखली होती. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये शाळेतच घेतल्या जाणाऱ्या अशा एक्स्ट्रा क्लासला मी तिला आवर्जून पाठवायचे,” क्षिरजाची आई उज्ज्वला राजे सांगतात. इयत्ता तिसरीत असताना क्षिरजाने बनविलेल्या दिवाळी कंदिलाला एक्सलंट मार्क मिळाला. तिने ही बातमी तिच्या बाबांना सांगितली आणि या दिवाळीला आपण हाच कंदील लावायचा म्हणाली. “या कंदिलामागची तिची मेहनत मला माहिती होती. आम्हालाही त्याचं कौतुक होतं. तेव्हा आम्हीही लगेच हो म्हणालो. मात्र त्यानंतर ती जे बोलली ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिने बाबांना प्रश्न विचारला की यासाठी किती खर्च आला आपल्याला? ते म्हणाले असेल ४-५ रुपये. तर ती म्हणाली, “बाबा आपण असे कंदील बनवून विकले तर ? म्हणजे १० रुपयाला विकला तर ५ रुपयाचा फायदा, होय ना? आणि ते ५-५ रुपये जमवून आपण अनाथाश्रमाला खाऊ, खेळणी देऊया”, ८ वर्षांची क्षिरजा एवढं समाजभान जागृत ठेवून बोलत होती यातच मला भरुन पावल्यासारखं वाटलं,” क्षिरजाची आई अभिमानाने सांगते. क्षिरजाने त्यावर्षी म्हटल्याप्रमाणे पणत्या रंगविल्या, कंदील बनविले आणि नातेवाईकांना भेट दिले. तिच्या आजोबांनी आणि मामाने तिला कौतुकाने काही पैसे दिले. ही क्षिरजाची पहिली कमाई ठरली जी त्यांनी उज्जवला यांच्या ऑफीसतर्फे अनाथाश्रमाला खाऊ, खेळण्यांसाठी दिली.

हळूहळू तिचे आर्ट ऍण्ड क्राफ्ट आणखीनच चांगले होत गेले. अशातच एका प्रदर्शनात तिची ओळख पेपर क्विलिंग आर्टशी झाली. प्रदर्शनातील एका स्टॉलवर पेपर क्विलिंगची फुले लावलेली गिफ्ट पाकीटे तिने पाहिली आणि लागलीच त्या स्टॉलवरच्या महिलांकडे आपल्याला हे शिकता येईल का याबाबत चौकशीही केली. मात्र ‘तू खूप लहान आहेस, तुझ्या आईबाबांना शिकता येईल’ या त्यांच्या उत्तराने ती हिरमुसली. घरी आल्यानंतरही तिचे मन मात्र त्या फुलांपाशीच घुटमळत होते. शेवटी तिने आईकडे पेपर क्विलिंगचे लर्निंग कीट आणून दे असा हट्ट धरला. तिची आवड जाणणाऱ्या आईने तो पूर्णही केला. “त्यावेळी माझ्या मनातही नव्हते की हिच्या हातून या माध्यमातून इतके काही घडेल. एक दिवस तिने मला छानसं फूल तयार करुन दिलं,” उज्ज्वला सांगतात. काहीच दिवसात क्षिरजाला वेगवेगळ्या रंगांची फुले, फोटोफ्रेम उत्तम जमू लागले. मग मित्र-मैत्रीणींच्या वाढदिवसाला स्वतः बनविलेले ग्रिटींग कार्ड द्यायचे आणि त्यांना खूष झालेले पाहून आपणही खूष व्हायचे हा सिलसिला सुरु झाला. एक दिवस तिच्या हातून अजाणतेपणी एक 3D बाहुली बनविली गेली आणि तिच्या मनात बाहुली बनविण्याची आवड निर्माण झाली. तिची आवड पाहून तिच्या वडिलांनी तिला 3D क्विलिंग एक्सपर्ट जेन जेटकींग यांचे पुस्तक आणून दिले आणि क्षिरजाने बाहुल्यांचे विश्व साकारले.

image


क्षिरजाने वारली चित्रकलेतील बाहुल्या, नटलेली नवरी, विदेशी पेहराव घातलेल्या बाहुल्या, टेनिस प्लेअर्स, निरनिराळ्या टोप्या घातलेल्या बाहुल्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या तयार केल्या आहेत. तिने साकारलेल्या बाहुल्या आणि तिच्या संकल्पना पाहून तिचे कौतुक करावे तेवढे थोडे वाटते. मग तिने टी-कोस्टरवर साकारलेले रेस्तराँ असो वा वापरलेले कॅन आणि सीडीवर साकारलेली पेन स्टॅण्ड विथ लायब्ररी ही थीम असो.. प्रत्येक कल्पना हटके... एवढ्याश्या मुलीच्या सर्जनशीलतेबद्दल आश्चर्य व्यक्त करायला लावणारी... शिक्षकदिनानिमित्त तिने एका वापरलेल्या सीडीवर शांतिनिकेतन शाळेची संकल्पना साकारली. ज्यामध्ये झाडाखाली शिकणारे विद्यार्थी आणि शिक्षिका दाखविल्या. तर महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची संस्कृती दाखविणाऱ्या बाहुल्या आणि देखावा उभा केला. एवढेच नाही तर तिने पेपर क्विलिंगच्या माध्यमातून विठ्ठलाची मूर्ती, निरनिराळी वाद्ये, पुणेरी पगडी, केक्स, गुढी अशा अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. तिने साकारलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळी संस्कृती, पेहराव दर्शविणाऱ्या बाहुल्यांमधून तिची निरिक्षण क्षमताही किती अफाट आहे याचा अंदाज येतो.

image


बाहुल्यांच्या विश्वात रमणाऱ्या क्षिरजाला नृत्याचीही आवड आहे. ती कथ्थक हा शास्त्रीय नृत्यप्रकार शिकत आहे. विज्ञान, इतिहास आणि भूगोल हे आवडते विषय असणाऱ्या क्षिरजाला अभ्यास सांभाळून आपल्या बाहुल्यांच्या विश्वात भरपूर काम करायचे आहे आणि त्याद्वारे समाजसेवाही. क्षिरजाच्या या कामात तिच्या आईवडिलांचे तिला नेहमीच प्रोत्साहन आणि सहकार्य लाभत आहे. येत्या बालदिनानिमित्त १४ आणि १५ नोव्हेंबरला सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बोरिवली येथे प्रबोधनकार ठाकरे कलादालन सभागृहात तिच्या बाहुल्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. “या प्रदर्शनामध्ये तिच्या बाहुल्यांचे फोटो असलेले कप, मग, टी-शर्टही मिळू शकणार आहेत. तसेच यासाठीच्या ऑर्डर्सही स्विकारणार आहोत,” असं उज्ज्वला सांगतात. यामधून मिळणारा पैसा अंध मुलांसाठीचे ब्रेल लिपीमध्ये प्रकाशित होणारे पाक्षिक ‘स्पर्शज्ञान’ला तसेच ‘दि पिंक इनिशिएटिव्ह’ या स्तन कॅन्सरच्या रुग्णांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थेला मदत म्हणून देण्यात येणार आहे. चिमुरड्या क्षिरजाचा उद्यमशील विचार आणि सामाजिक भान खरोखरच कौतुकास्पद आहे.

    Share on
    close