‘हनिमून हेवन्स’ला विचारा, कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

‘हनिमून हेवन्स’ला विचारा, कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

Tuesday January 05, 2016,

4 min Read

पर्यटन लहरी, धाडसाचा कैफ चढलेले आणि एक व्यवसाय-उद्यमी अशी चेतन यल्लापुरकर यांची स्वत:शी स्वत:ची ओळख आहे. त्यांना भटकंती आवडते, प्रवास आवडतो, खायला बनवायला आवडते… ते नाचतातही आणि फोटोग्राफीही करतात. आपला ‘स्टार्टअप’… आपला व्यवसाय म्हणजे आपल्या एकुणातील व्यक्तिमत्वातूनच उमटलेला एक पडसाद आहे, एक प्रतिध्वनी आहे असे त्यांना वाटते. चेतन यांना लग्नसमारंभासाठी आणि त्यातही नाच नाच नाचून लग्नाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अत्यंत मस्त अशी ठिकाणे शोधण्याचा नाद आहे. छायाचित्रे काढण्यासाठीची सुंदर स्थळे धुंडाळण्याचाही छंद त्यांना आहेच.

image


बंगळुरूतील ‘एमएसआरआयटी’तून चेतन यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंग केलेय. आयआयएम लखनौतून त्यांनी व्यवस्थापनाचे धडे गिरवलेयत आणि आता त्यांनी ‘हनिमून हेवन’ हा स्टार्टअप सुरू करून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीला सुरवात केलेली आहे आणि चेतन यांच्याच शब्दांत सांगायचे तर हौस भागवायला सुरवात केली आहे.

‘हनिमून हेवन्स’ हा नव्यानेच लग्न झालेल्या जोडप्यांना मधुचंद्रसेवा पुरवणारा तसेच विवाहाचा वाढदिवस साजरा करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना ‘सुहान्या’ सहलीची सेवा पुरवणारा व्यावसायिक उपक्रम आहे. बंगळुरूतील हा स्टार्टअप २०१२ मध्ये स्थापन झाला आणि नुकतीच या उपक्रमाने एक अभिनव सेवा सुरू केलेली आहे. ‘शोधा तुमच्या स्वप्नातील विवाहस्थळ!’ डिसेंबरमध्ये आमची चेतन यांच्याशी भेट झाली होती आणि तेव्हा चेतन यांनी आम्हाला ते एका ‘मोबाईल अॅप डेव्हलपर’च्या शोधात असल्याचे सांगितले होते.

चेतन यांनी ‘मेकमायट्रीप’ आणि ‘यात्रा’समवेत काम केलेले आहे. अर्थात ऑनलाइन ट्रॅव्हल बिझनेस नेमका काय असतो, कसा चालतो, ते पाहणे हेच त्यांचे या नोकऱ्यांमागील उद्दिष्ट होते. आपल्या ‘हनिमून हेवन्स’च्या संदर्भातील वाटचालीबद्दलच्या आपल्या अनुभवांना, भावनांना ‘युवरस्टोरी’च्या माध्यमातून चेतन यांनी वाटा मोकळ्या करून दिल्या… आपल्या आगामी योजनांबद्दलही सांगितले. वैयक्तिक स्वरूपाच्या प्रवास, पर्यटनाच्या विश्वामध्ये आपले एक आगळे महत्त्व, आगळे स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीनेच त्यांच्या या योजनांची आखणीही आहे. चेतन काय म्हणतात ते बघा…

‘‘गेल्या २०१२ मध्ये एका मित्राच्या लग्नात हे सगळे घडून आले. जुळून आले. माझे सगळेच मित्र हे लग्न साजरं करण्यासाठी म्हणून जमलेले होते. लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असलेले अनेक जणही इथेच मला बघायला मिळाले. प्रत्येक जण मला ट्रॅव्हल क्षेत्रातला म्हणून ओळखणारे होते. आणि या सगळ्यांच्या दृष्टीने हनिमूनसाठी एक छान असे ठिकाण सुचवण्यासाठी मीच योग्य अशी व्यक्ती होतो. मला तेव्हाच वाटून गेले होते, की एक रोमँटिक उद्यमी बनण्याची हीच छान वेळ आहे. भारतातले हनिमून मार्केट भलेमोठे आहे आणि व्यावसायिकांची इथे गर्दीही जवळपास नाहीच. म्हणजे मोठाल्या ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सिज् आहेत, पण त्यांच्या व्यवसायाला वैयक्तिक आपलेपणाचा स्पर्शही नाही. वैयक्तिक आस्थेवाइकपणा या क्षेत्रात शून्य असणे, हाच माझ्यासाठी मोठा स्कोप होता आणि मी हा शून्य भेदण्याचे ठरवून टाकले. आम्ही प्रत्येक क्लायंटला वैयक्तिक भेटतो आणि त्यांना काय भावते, त्यांच्या आवडी-निवडी काय आणि काय त्यांच्यासाठी अधिक योग्य हे सगळे समजून घेतो. आपलं म्हणणं ऐकून घ्यायला कुणी आहे, आपल्या सेवेला कुणीतरी हजर आहे, हे नव्या जोडप्याला तर आवर्जून भावतं. अशाप्रकारे आमचा भर ‘कस्टमाइज्ड ट्रिप’वर असतो. सुटी असल्याने सहज म्हणून सहलीवर असलेल्या जोडप्याच्या सुटीचं आम्ही असं सोनं करतो.

‘‘५० हून अधिक ‘हनिमून डेस्टिनेशन्स’ आम्ही ‘ऑफर’ करतो. प्रवासाची वैयक्तिक (जोडपंनिहाय) आखणी, ‘डेस्टिनेशन’निहाय पारदर्शक दर, भरवशाची सेवा, विनामूल्य भेटवस्तू ही सगळी आमची वैशिष्ट्ये आहेत. लग्नसमारंभासाठी मनाजोगे ठिकाण शोधण्याही आम्ही सहाय्य पुरवतो. आम्ही अशा क्लायंटस्‌वर भर देतो, जे दरावर नव्हे तर अनुभवांवर भर देतात. समव्यावसायिकांतील काही भरवशाच्या लोकांच्या मदतीने आम्ही टाइट बजेट असलेल्या आमच्या ग्राहकांसाठीही सेवा उपलब्ध करून देतो. आम्ही ‘कमिशन’ आणि सेवाशुल्काधारित अशा दोन्ही पद्धती राबवतो. आम्ही या व्यवसायाचा जो पाया रचलेला आहे, त्याच्या बळावरच आम्ही या व्यवसायात तरलेलो आहोत.’’

‘‘मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये नोकरी करत असताना मी अनेक गोष्टी अनुभवलेल्या आहेत. कर्मचारी पगारासाठी काम करतात, ग्राहकांच्या समाधानाशी त्यांना फारसे देणेघेणे नसते, हेही मी पाहिलेले आहे. आणि माझ्या लेखी ग्राहकांचे समाधान हे मला मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचे आहे. दरवर्षी ५०० नवी जोडपी आमच्या यादीत समाविष्ट व्हावी आणि आमच्या चमूत काही हनिमून एक्स्पर्ट असावेत, त्यादृष्टीने प्रयत्न चाललेले आहेत.’’

image


‘‘माझ्या या व्यावसायिक मुशाफिरीत काय प्रत्येक वेळेस वाटेवर गुलाबाची फुले अंथरलेली नव्हती. मला बँकेने कर्ज नामंजूर केले होते आणि पुढली तीन वर्षे मी कर्जासाठी अर्ज करण्यासही अपात्र ठरवला गेलो होतो. मी असहाय होतो आणि वेळ काढणे मला जिकिरीचे झालेले होते. कळ काढणे या व्यतिरिक्त काहीही हाती उरलेले नव्हते. उद्यमाच्या रश्शाचा हा पहिला भुरका असा फारच तुरट होता. ‘एकाचे लाख, लाखाचे दहा लाख, दहा लाखांचे कोटी, कोटींचे अब्ज…’ असे स्वत:शीच पुटपुटत मी माझ्याकडे जी काय तोकडी रक्कम होती, तिच्या बळावर व्यवसाय सुरू केला. अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे, हे त्यात मी या सुरवातीच्या काळात विसरून गेलो होतो. काही गोष्टी मर्यादेपलिकडे, क्षमतेपलिकडे जाऊन केल्या. आम्ही फ्लाइट बुकिंग काय करत होतो, व्हिसा असिस्टन्स आणि फॉरेक्स असे काय काय, पण पुढे लक्षात आले, की हे आपल्या कुवतीबाहेरले आहे. आता आम्ही हे सगळे ‘आउटसोर्सिंग’च्या माध्यमातून करतो. योग्य असा सल्लागार ही आता आमच्या दृष्टीने या क्षणाची आवश्यकता आहे.’’

‘‘गतवर्षी ज्या जोडप्यांनी हनिमून हेवन्स ट्रॅव्हल प्लॅनअंतर्गत आपल्या विवाहाचा वाढदिवस साजरा केला होता, ते यंदाही हनिमून हेवन्सच्याच माध्यमातून आपल्या लग्नाचा येणारा वाढदिवस साजरा करणार आहेत. दिवसागणिक आमच्या सेवेचा संदर्भ देणारी तोंडे वाढत आहेत. माझे सगळे ‘प्लॅन’ मला असेच साधेसरळ हवे आहेत आणि याउपर अमृताशी पैजा जिंकणारा प्रवासाचा आनंदानुभव क्लायन्टस्ना देणारे हवे आहेत.’’

‘‘मला दरवर्षी ५०० जोडप्यांना विशेष सहलीवर न्यायचे आहे, हे मी आधीच सांगून झालेले आहे. नवे सांगायचे ते हे, की ही सहल असते महिनाभराची आणि जगभरात प्रेमाच्या धुंद सुगंधाची दरवळ करणारी. ‘अरे हनिमूनला जायचंय का? मग त्यासाठी आधी हनिमून हेवन्सकडे जा’, लोकांना असे म्हणताना ऐकणे हेच माझे स्वप्न आहे.’’

आता तुमच्या स्वप्नातले ‘हनिमून डेस्टिनेशन’ कुठले ते आम्हाला सांगा…

लेखिका : कीर्ती पुनिया

अनुवाद : चंद्रकांत यादव