भारतीय संदर्भातल्या प्रतिमांसाठी फक्त Pickapic.in

0

प्रतिमांचे आपल्या व्यवसायात किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, ही बाब माध्यमे किवा प्रकाशन उद्योगाशी संलग्न असलेल्या मंडळींना चांगलीच माहिती असते. ‘हजार शब्दांपेक्षा एक छायाचित्र अधिक परिणामकारक असते’, ही उक्ती इतर व्यवसायांतून कदाचितच इतकी औचित्यपूर्ण ठरावी. गेट्टी इमेजेस Getty Images आणि शटरस्टॉक Shutterstock या समग्र प्रतिमांच्या साइट्‌स आम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहेत. आंतरराष्ट्रीय प्रतिमांच्या बाबतीत तर या साइट्‌सना तोड नाही. पण जर तुम्ही भारतीय प्रतिमा या साइट्‌सवर शोधू पाहाल तर तुमचं काही खरं नाही. कारण या साइट्सवर भारतीय प्रतिमा शोधणे म्हणजे उकिरड्यात सुई शोधण्याहून वेगळे नाहीच.

भारतातील छायाचित्रांसाठी ‘इमेजेस्‌बाजार’ Imagesbazaar हा एक पर्याय आहे आणि आता Pickapic.in कडूनही ग्राहकांना चित्रे, व्हेक्टर्स, प्रतिमा उपलब्ध करून दिल्या जातात. समीर शिंदे हे या अभिनव व्यावसायिक उपक्रमाचे संस्थापक आहेत. न्युक्लिअस कम्युनिकेशन्स या कंपनीच्या कामकाजादरम्यान एका प्रसंगात या साइटची कल्पना समीर यांच्या डोक्यात शिरली. समीर हेच न्युक्लिअस कम्युनिकेशन्सचेही संचालक आहेत. समीर सांगतात, ‘‘दर्जेदार प्रतिमांची मारामार हे माझ्यासाठी रोजचे संकट होते. भारतीय शैलीत, भारतीय संदर्भात चित्रे किवा व्हेक्टर्स मिळतच नसत. भारतीय वाचकांशी संबंधित तर यातले काही मिळणे दुरापास्तच. अस्तित्वात असलेले सगळे प्लेटफॉर्म उपयुक्तततेच्या तसेच दरांच्या संदर्भातही काही बरोबर नव्हते. खूप मर्यादा त्यांना होत्या. यातूनच भारतीय संदर्भ असलेली चित्रे, व्हेक्टर्स, प्रतिमा, छायाचित्रे असे सगळे उपलब्ध करून देणाऱ्या प्लेटफॉर्मचा विचार डोक्यात आला. अधिक तपशिलात शिरल्यानंतर आमच्या लक्षात आले, व्हेक्टर्स श्रेणीतील चित्रांची मागणी जगभरातच वाढलेली आहे आणि म्हणून अशा सूचक चित्रांची, इल्युस्ट्रेशन्सची भारतीय संदर्भातली उपलब्धता भारतीय माध्यमांनाही सहज व्हावी म्हणून एक नेटका प्लेटफॉर्म सुरू करायला आपल्याला मोठा वाव आहे.’’

महत्त्वाकांक्षी समीर शिंदे

आपले ‘स्टार्टअप’ सुरू करण्यापूर्वी संगणक अभियांत्रिकी विषयातील पदवीनंतर समीर यांनी साडेचार वर्षे भारती एअरटेलमध्ये नोकरी केली. समीर यांची ही दुसरी व्यावसायिक भरारी म्हणा. समीर यांच्या मते भारतातील दृश्य आशयाचा बाजार जवळपास १२०० कोटींचा असेल. आणि एक दिवस या बाजाराचे नेतृत्व Pickapic कडे असेल.

सरत्या वर्षी जानेवारीतच Pickapic ची मुहूर्तमेढ झाली. एस्टिम एजन्सिज्‌ प्रायव्हेट लिमिटेडकडून या स्टार्टअपला १.५ दशलक्ष रुपयांची अँजल गुंतवणूकही प्राप्त झाली. पहिल्या महिन्यातच ३५० ग्राहकांची नोंदणी झाली. ७५ हजार रुपयांचे काम झाले. सुरवात समीर यांना प्रोत्साहन देणारी होती. जबाबदारी वाढवणारीही होती. अत्यंत विश्वासाने ते सांगतात, ‘‘चित्रांच्या श्रेणीत मोडणारे सर्व काही या एका छताखाली उपलब्ध होईल, असा प्लेटफॉर्म आम्हाला साकारायचा आहे. गुणवत्तेच्या बळावर पुढल्या दोन वर्षांत आम्ही सात टक्के बाजार काबिज केलेला असेल.’’

‘शटरस्टॉक’चाच कित्ता एका वेगळ्या अर्थाने गिरवलेला असला तरी ‘पिकॅपिक’ने आपले आगळे अस्तित्व राखलेले आहे. Pickapic केवळ इल्युस्ट्रेशन्स आणि व्हेक्टर्स पुरवते. ‘पिकॅपिक’कडे स्वत:चे ‘ग्राफिक आर्टिस्ट’ आहेत. अपेक्षित मजकूर आणि ताजा घटना घडामोडींवर आधारित रुपक चित्रे, संकल्प चित्रे, काल्पनिक चित्रे, प्रतीकचित्रे या सगळ्याच प्रकारांत या कलावंतांचा हातखंडा आहे. इतर ग्राफिक आर्टिस्ट, डिझायनर्स आणि इल्युस्ट्रेटर्सकडून हे ते कलाकृती आमंत्रित करतात आणि या सगळ्या कलाकृती या कलावंतांच्या अधिकारात आपल्या प्लेटफॉर्मवरून प्रदर्शित करतात.

समीर सांगतात, ‘‘पुढे जाऊन आम्हाला आशयात अर्थातच वैविध्य आणायचे आहे. स्थिर प्रतिमा, अॅनिमेटेड प्रतिमा आणि व्हिडियोवरही आमचा पुढे भर असेल. हो एक गोष्ट मात्र पक्की हे सगळे वैविध्यही भारतावरच भर देणारे असेल. भारतीय घटना-घडामोडी, भारतीय सांस्कृतिक उत्सव यांचा स्पर्श त्याला असेल. ग्राहकाला एखादेच व्हेक्टर खरेदी करावयाचे असल्यास त्याला तशी सोय उपलब्ध आहे. पॅकेजचीही सुविधा आहे. ५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचे पॅकेजेस्‌ आहेत. ग्राफिक डिझाइन एजन्सिज्‌’, ‘ॲअॅडव्हर्टायझिंग एजन्सिज्‌’ हे आमच्या व्यवसायाचे लक्ष्य. डिजिटल मार्केटिंगही अर्थात यात आलेच.’’

सध्याच्या परिस्थितीत स्वत:च्या ‘मार्केटिंग’साठी ‘पिकॅपिक’ ‘सोशल मिडिया’चा वापर करते. ‘डिजिटल प्लेटफॉर्म’ही वापरते. ‘फेसबुक’, ‘ट्विटर’ आणि ‘गुगल अॅडवर्डस्‌’चा त्यात समावेश आहे. ‘स्टार्टअप’कडे अकरा जणांचा चमू आहे. डिझाइन, बिझनेस डेव्हलपमेंट, सोशल आणि डिजिटल मिडिया व्यवस्थापन आणि CRM सदस्य म्हणून अशी सगळी जबाबदारी या अकरा लोकांमध्ये वाटलेली आहे.

व्यवसाय, आशय या सगळ्यांचाच विस्तार करत असताना आगामी काळात दिल्ली, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरूत कार्यालय आणि व्यापक कामकाजाच्या स्वरूपात आपले भौतिक अस्तित्व असावे, त्या दृष्टीने आमच्या हालचाली चाललेल्या आहेत, असेही समीर सांगतात.

‘पिकपॅक’ सुरू होण्यात सर्वाधिक तापदायक काही ठरले असेल तर ते समीर यांच्या मते फंडिंग मिळवणे.

‘‘स्टार्टअपला आर्थिक पाठबळ देताना भारतातील खासगी बँका दहावेळा विचार करतात. व्यवसायात नव्याने उतरणाऱ्यांबाबत खासगी बँका कमालीच्या नकारात्मक आहेत. पण आमच्या सुदैवाने आम्हाला एक अँजल गुंतवणूकदार देवदुतासारखा लाभला. व्यवसायाचा गाडा सुरू करण्यासाठी सुरवातीच्या काळात लागणाऱ्या भांडवलाचे त्यामुळेच भागले आणि आता गाडा सुरू झालेला आहे.’’ ही व्यथा मांडताना अर्थातच इतर ‘स्टार्टअप’बद्दलची काळजी समीर यांनी वाहिलेली असते. खासगी बँकांनी स्टार्टअपना पाठबळ दिले पाहिजे, ही अपेक्षा दडलेली असते.

भारतीय परिप्रेक्ष्यातील प्रतिमांसाठीची अन्य एखादी साइट तुम्हाला माहिती आहे? असेल तर आम्हाला त्याबाबत नक्की कळवा…

लेखिका : प्रीती चमिकुट्टी

अनुवाद : चंद्रकांत यादव

Related Stories