एज्युटेन्मेंट स्टार्ट-अप कॉन्वजिनियसने एनेबलर्सद्वारा ताज्या फेरीत उभारले दोन कोटी रुपये

0

कॉन्वजिनियस (ConveGenious) या एज्युटेन्मेंट (एज्युकेशन अधिक एन्टरटेन्मेंट अर्थात शिक्षण अधिक रंजन करण्यासाठी काम करणाऱ्या) स्टार्टअपने प्री सिरिज ए राऊंडमधून दोन कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. एनेबलर्स (Enablers) या गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्सना एकत्र आणणाऱ्या आणि निधी उभारणीचा व्यवहार सुलभ करणाऱ्या वेब बेस्ड व्यासपीठाच्या मदतीने त्यांना हा निधी मिळाला आहे.

भारत आणि दक्षिण पूर्व आशियामधील गुंतवणूकदारांकडून उभारलेल्या या भांडवलाचा उपयोग उत्पादन सुधारणेसाठी आणि त्यांच्या तंत्रज्ञान आणि मजकूर एकत्रिकरण टीमच्या विस्तारासाठी करण्यात येणार आहे. भारत आणि सिंगापूरस्थित हे व्यासपीठ आहे.

“ शैक्षणिक सामग्री पुरविणे आणि त्याचबरोबर शिष्यवृत्ती, कारकिर्द समुपदेशन आणि सामान्यांना नोकरी यासारख्या संधी उपलब्ध करुन देणे हे आमचे उद्दीष्ट आहे. त्यादृष्टीने केवळ देशी भाषांवर किंवा आमच्या ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर अवलंबून नसलेली उत्पादने आम्ही तयार करतो.” कॉन्वजिनियसचे सहसंस्थापक जयराज भट्टाचार्य सांगतात.

जयराज भट्टाचार्य आणि शशांक पांडे यांनी २०१३ मध्ये स्थापन केलेल्या कॉन्वजिनियसचे उद्दीष्ट आहे ते म्हणजे शिक्षण अधिक स्वस्त, आनंददायी आणि फायदेशीर बनविण्याचे. गेमिफिकेशन (खेळाच्या माध्यमातून शिक्षण), सुयोग्य विश्लेषण आणि हुशारीने केलेले मजकूराचे एकत्रिकरण या तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल आधारीत शिक्षणावर त्यांच्या उत्पादनांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या उत्पादनांच्या द्वारे गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत पन्नास हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्याचा त्यांचा दावा आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या उपक्रमाने एन्जल राऊंडच्या माध्यमातून १,००.००० अमेरिकी डॉलर्सचा निधी उभा केला आहे.

K-12 (अमेरिका, कॅनेडा इत्यादी देशांमध्ये ही संकल्पना वापरली जाते... महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वीची शैक्षणिक वर्षे ही k-12 म्हणून ओळखली जातात) विभागाला एज्युटेन्मेंटतर्फे प्रामुख्याने सेवा पुरवली जाते. सद्यस्थितीत भारतातील एज्युटेन्मेंट आधारीत उत्पादनांची बाजारपेठ ही सहा बिलियन (अब्ज) वर जाऊन पोहचली आहे. गेल्या काही वर्षांत, एज्युटेन्मेंट उद्योगातील मागण्या पूर्ण करणाऱ्या बऱ्याच स्टार्टअप सुरु झाल्याने या उद्यागाचे पुनरुज्जीवन झाल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात, बहुतेक स्टार्टअप्सने आपले लक्ष इंटरनेटवर केंद्रीत केले असून, मोबाईल आणि खेळाच्या द्वारे ते ग्राहकांना सेवा देत आहेत.

एज्युटेन्मेंट स्टार्टअप्स ही सातत्याने वाढत असलेल्या स्मार्टफोन वापरकर्त्यांवर अवलंबून आहेत. एका पहाणीनुसार पुढील चार वर्षांत भारतात ६५० दशलक्ष (मिलियन) पेक्षा अधिक स्मार्टफोन असतील. हे प्रमाण भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे पन्नास टक्के एवढे आहे. भारतातील सुमारे ७२.२ टक्के लोक हे ग्रामीण भागात रहातात, ही गोष्ट लक्षात घेता, भारताच्या ग्रामीण भागातील २५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येकडे स्मार्टफोन आणि डेटा कनेक्टीव्हिटीद्वारे इंटरनेटही असणार आहे, हे उघड आहे. या परिस्थितीत सहाजिकच या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढीची संधी निर्माण झाली आहे.

लेखक – तौसिफ आलम

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन