‘डिजीटल इंडिया’च्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर ठरेल

‘डिजीटल इंडिया’च्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर ठरेल

Thursday October 13, 2016,

3 min Read

डिजिटल नेटवर्कमुळे दुर्गम भागातही गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्याच्या उत्तम सुविधा पुरविणे शक्य होते आणि शहर व गाव यातील दरी मिटून सर्वांना सुविधा मिळतात. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्कील इंडियाची घोषणा केली. याच अंतर्गत शासनाशी ‘सिस्को’चे सहकार्य हे विकासाच्या नव्या संधींचे दालन उघडेल. शासनाचे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव नेटवर्कने जोडण्याचे नियोजन असून, महाराष्ट्र हे ‘डिजीटल इंडिया’च्या अंमलबजावणीत अग्रेसर राज्य ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

image


‘सिस्को’तर्फे हॉटेल ताज येथे आयोजित 'एनॅबलिंग डिजीटल इंडिया अँड मेक इन इंडिया- इन पार्टनरशिप विथ महाराष्ट्र' या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सिस्को’च्या पुणे येथील प्रकल्पाचे व्हर्च्युअली उद्घाटन यावेळी झाले. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन, सिस्को सिस्टीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स, सिस्को इंडियाचे अध्यक्ष दिनेश मलकानी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्याच्या उत्तम सुविधा खेड्यापाड्यापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांना डिजीटल नेटवर्कशी जोडून घेणे आवश्यक होते. ‘स्मार्ट सिटी’प्रमाणे ‘स्मार्ट व्हिलेज’ही आकारास यावेत, या प्रयत्नांतून ‘डिजीटल इंडिया’ व ‘डिजीटल महाराष्ट्र’च्या माध्यमातून ‘सिस्को’प्रमाणेच इतरही अनेक उद्योजक, तंत्रज्ञ, संस्थांच्या सहकार्याने अनेक प्रकल्प आकारास येत आहेत.

image


मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा सहजपणे मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा डिजीटल करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे, आता राज्यातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात येतील. त्यामुळे शहराप्रमाणेच खेड्यातही आरोग्य व शिक्षणाच्या उत्तम सुविधा मिळतील. राज्यातील 29 हजार गावे डिजिटली जोडणे हे आव्हान असले तरी ते आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू. गावोगावी वीज पोहोचवणारी वीज मंडळासारख्या भक्कम यंत्रणेचे उदाहरण आपल्याकडे आहे. त्याच धर्तीवर सर्व गावे नेटवर्कशी जोडण्यात येतील. भारत नेटच्या धर्तीवर ‘महानेट’ही सुरु करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद

डिजिटल सुविधांमुळे आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांतील विकासाला गती कशी मिळते, याचे प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आले. त्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर जिल्ह्यातील फेटरी व धारावी येथील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली. फेटरी येथील अंकिता या सातवीच्या विद्यार्थिनीच्या 'उच्च पदावर जाण्यासाठी काय करावे', या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जे काही कराल, ते संपूर्ण आत्मविश्वासाने संपूर्ण शक्तिनिशी करा. ज्ञानाचा उपयोग स्वतःबरोबरच समाजासाठीही करा. धारावी येथील विद्यार्थ्यांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ निवडक शाळांतच नव्हे, राज्यातील सर्व शाळांमध्ये डिजीटल नेटवर्क यंत्रणा उभारायची आहे.

image


महाराष्ट्राची भूमी व नेतृत्व वाखाखण्यासारखे : कांत

कांत म्हणाले की, महाराष्ट्र ही भूमी व येथील नेतृत्व वाखाखण्यासारखे आहे. त्यामुळे येथे विकासाच्या शक्यता सर्वात जास्त आहेत. भारतासारख्या प्रचंड मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य भविष्यातही निश्चितच आघाडी टिकवून ठेवेल. भारतात होऊ घातलेल्या डिजीटल क्रांतीमुळे व्यवहार पेपरलेस व कॅशलेस होत जातील व ती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व गतिमान होईल.

‘सिस्को’च्या सहकार्याने डिजीटल विकासाला गती मिळेल व नवनवीन उद्योजकांचा भारतात ओघ वाढेल, असे श्रीमती सुंदरराजन यांनी सांगितले. शहरातील डॉक्टरांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्णाला उपचाराबाबत सल्ला देण्याचे प्रात्यक्षिकही यावेळी झाले. त्यात फेटरी येथील रुग्णाला डॉ. संजय कपोते व डॉ. भन्साली यांनी वैद्यकीय सल्ला दिला.

‘सिस्को’चे विविध प्रकल्प

‘डिजिटल धारावी'अंतर्गत तेथील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळवून देणे, उद्योजकता वाढविणे, राज्यभर २५ सिस्को नेटवर्क अकॅडमीची उभारणी, ब्रॉडबॅन्ड सुविधांची निर्मिती, नागपूर येथे स्मार्ट सिटी प्रकल्पास सहकार्य व फेटरी या गावात वायफाय, स्मार्ट एज्युकेशन व स्मार्ट हेल्थकेअर सुविधा उभारणे आदी बाबींसाठी सिस्को सहकार्य करणार आहे.    (सौजन्य : महान्यूज)