मीना बिंद्रा: ८ हजार रूपयांना ५०० कोटींमध्ये बदलणारी ‘बीबा’

घरात वेळ जात नाही म्हणून टाईमपाससाठी आपल्या घरातूनच कपड्यांची विक्री करणारी महिला आज वर्षाला ५०० कोटी रूपयांचं उत्पन्न मिळवते आहे. आश्चर्यानं तोंडात बोट घालायला लावणारा हा प्रवास आहे ‘बीबा’च्या निर्मात्या मीना बिंद्रा यांचा.

0

ही कहाणी तब्बल ३३ वर्षांपूर्वीची आहे. दोन मुलांची आई असलेल्या एका गृहिणीला जेव्हा घरातलं सगळं काम उऱकल्यानंतर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडलेला असायचा. याच रिकाम्या वेळेनं त्या महिलेला काही करण्यासाठी प्रवृत्त केलं. महिलांसाठी रेडिमेड कपडे तयार करून ते विकण्यापासून मग सुरूवात झाली. पण आजचा त्यांचा हा छंद करोडोच्या व्यवसायात परावर्तीत झालेला आहे. बँकेक़डून आठ हजार रूपयांचं कर्ज काढून सुरू केलेल्या या व्यवसायाला एका झपाटलेल्या महिलेनं आज एका ब्रँडचं रूप दिलय. विशेष म्हणजे या ब्रँडनं देश-विदेशातील नागरिकांना एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.


आपण बोलत आहोत महिलांसाठी कपडे तयार करणा-या ब्रँड “ बीबा” बद्दल आणि त्याची संस्थापिका मीना बिंद्रांबद्दल. दिल्लीमध्ये एका व्यावसायिक कुटुंबात मीना यांचा जन्म झाला. मात्र त्या नऊ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. मीनानी दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठित मिरांडा हाऊस महाविद्यालयातून इतिहास या विषयात पदवी मिळवली आणि १९ व्या वर्षी एका नौदलातल्या अधिका-यासोबत त्यांचा विवाह झाला.

'बीबा' अर्थात मीना बिंद्रा
'बीबा' अर्थात मीना बिंद्रा

लग्नानंतर मीना पुढची २० वर्षं घर आणि मुलांची देखभाल करण्यातच व्यस्त होत्या. पण पुढे मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना मोकळा वेळ मिळू लागला. हा रिकामा वेळ त्यांना खाऊ लागला. मीना सांगतात की त्या शिक्षण घेत होत्या तेव्हा पासूनच त्यांना कपड्यांच्या डिझाईनिंगमध्ये रूची होती. त्यांना रंग आणि प्रिंट संदर्भात सुद्धा थोडीबहुत माहिती होती. परंतु त्या कधी याचं व्यवसायिक प्रशिक्षण घेऊ शकल्या नव्हत्या.

त्या पुढे सांगतात की त्याच दिवसांमध्ये त्यांची भेट ब्लॉक प्रिंटींगचा व्यवसाय करणा-या देवेशबरोबर झाली. “ मी दररोज देवेशच्या कारखान्यात जाणं सुरू केलं आणि तिथेच प्रिंटींग आणि कपड्यांना चढवण्यात येणा-या वेगवेगळ्या रंगांचे संयोजन कसे करावे हे सूक्ष्मपणे शिकले. त्यानंतर मी व्यवसाय सुरू करण्य़ाबाबत माझ्या पतींसोबत बोलले. त्यांनी मला सिंडिकेट बँकेकडून ८ हजार रूपयांचं कर्ज मिळवून दिलं आणि माझं काम सुरू करण्यात मला मदत केली.

आपल्या यशाच्या पहिल्या पावलाविषयी पुढे बोलताना त्या म्हणतात की बँकेकडून कर्जाच्या रूपात मिळालेल्या रकमेद्वारे त्यांनी महिलांसाठी २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे आकर्षक सलवार-सूटचे ४० सेट तयार केले आणि घरीच त्यांची विक्री सुरू केली. “ माझ्या आजुबाजूला राहणा-या महिलांनी हा माल हातोहात खरेदी केला आणि बघता बघता सपूर्ण कलेक्शन विकलं गेलं. या विक्रिमुळं मला जवळजवळ ३ हजार रूपयांचा नफा झाला.” मीना पुढे सांगतात की महिलांना खात्री होती की जर त्यांना कपडे पसंत पडले नाहीत तर त्या परत करू शकतात आणि कदाचित याच विश्वासानं त्यांना यश मिळालं.

मीना पुढं म्हणतात, “ नफ्याच्या रूपात मिळालेल्या पैशानं मी आणखी कपडे खरेदी केले आणि मी तयार केलेले सूट याखेपेला सुद्धा पटापट विकले गेले. वर्षभरातच मी तयार केलेले कपडे आजुबाजुच्या परिसरात लोकप्रिय झाले आणि आलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी मला तीन कारागिर ठेवावे लागले. या व्यतिरिक्त शितल आणि बँजरसारखे कपड्यांचे ठोक विक्रेतेसुद्धा मी तयार केलेल्या कपड्यांमध्ये रूची दाखवू लागले.”

हळूहळू काम वाढलं आणि त्यामुळं ऑर्डर-बुक आणि बिल-बुकची मागणी होऊ लागली. आणि यासाठी मग मला नावाची गरज भासू लागली. पंजाबमध्ये मुलींना प्रेमानं “बीबा” म्हणतात आणि म्हणून मग मी माझ्या ब्रँडचं नाव हेच ठेवलं. लवकरच रेडिमेड कपड्याच्या दुनियेत हे नाव चमकू लागलं.

“ मी तयार केलेल्या कपड्यांची मला कधी जाहिरात करावी लागली नाही. मला वाटतं की ज्यावेळी रेडिमेड कपड्यांची मागणी वाढली आणि बाजारात असे कपडे खरेदी करणारे येऊ लागले अशा वेळीच नेमका मी माझा रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. मी तयार केलेल्या कपड्यांची फिटींग आणि दर्जामुळे ग्राहक माझे चाहते बनले.” मीना पुढं सागतात की काही काळानंतर मग मी घरी तयार केलेलं तात्पुरत्या स्वरूपातलं बुटीक मला कमी पडू लागलं आणि त्याला कँप कॉर्नर विभागात स्थलांतरीत करावं लागलं.

याच काळात मीना यांचे मोठे पुत्र संजय यांनी बी.कॉमचा आपला अभ्यास पूर्ण केला आणि आपल्या आईच्या कामात मदत करणं सुरू केलं. लवकरच आई-मुलाच्या या जोडीनं एक आणि एक अकरा कसे होतात हे जगाला दाखवून दिलं. “ संजय सोबत आल्यामुळं माझ्या जबाबदा-या थोड्याशा विभागल्या गेल्या आणि मी माझं संपूर्ण लक्ष डिझाईन्सवर केंद्रीत करायला लागले. १९९३ हे वर्ष येण्याच्या तोंडावर आम्ही पारंपारिक पोषाखाच्या क्षेत्रात भारतातले सर्वात मोठे ठोक व्यापारी म्हणून पुढे आलो. या काळात आम्ही दर महिन्याला २००० हून अधिक पीस तयार करून विकत होतो.

याच काळात म्हणजे ९०च्या दशकाच्या मध्यात शॉपर्स स्टॉपनं बाजाराचे दरवाजे ठोठावले. देशात सुरू होणारं ते पहिलं मल्टिसिटी डिपार्टमेंटल स्टोअर होतं. त्यांना सुद्धा स्टोअरमध्ये विकण्यासाठी महिलांच्या पारंपारिक पोषाखाची गरज होती. त्यासाठी ते “बीबा”कडेच आले. शॉपर्स स्टॉप सोबत काम करत असताना मी दर्जासोबत जराही तडजोड न करता स्वस्त दरात माल तयार करू लागले. शिवाय हे काम वेळेत पूर्ण करून ऑर्डर वेळेत पोचती करू लागले. यात मी कायम मागणी-पुरवठा सिद्धांत अवलंबला आणि कदाचित हेच माझ्या यशाचं गमक होतं.

२००२ मध्ये मीना यांच्या धाकट्या मुलानं हार्वर्ड विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर त्यांच्या व्यवसायात प्रवेश केला. यानंतर त्यांचा हा ब्रँड लवकरच संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाला. “ सिद्धार्थ सुरूवाती पासूनच आपला आऊटलेट सुरू करण्याच्या बाजूचा होता.” त्यांच्या सांगण्यावरूनच ‘बीबा’नं २००४ मध्ये मुंबईत दोन ठिकाणी आपले आऊटलेट सुरू केले आणि त्यापासून मिळालेलं यश आश्चर्यचकित करणारं ठरलं. दोन्ही आऊटलेटना मोठी सफलता मिळाली आणि ‘बीबा’च्या मासिक विक्रीनं २० लाख रूपयांचा आकडा पार केला.

यानंतर आम्ही आमच्या नीतीमध्ये काही बदल केले आणि त्यानुसार नव्यानं उघडणा-या शॉपिंग मॉलमध्ये आम्ही आमचं आऊटलेट उघडू लागलो. आत्ताच्या घडीला देशात आमचे ९० हून अधिक आऊटलेट आहेत आणि आमच्या वार्षिक उत्पन्नानं ५०० कोटींचा आकडा पार केलेला आहे.

अशा प्रकारे कामावर असलेली निष्ठा आणि परिश्रमाच्या आधारावर एका महिलेनं टाईमपाससाठी सुरू केलेल्या आपल्या व्यवसायाचं रूपांतर एका ‘ग्लोबल ब्रँड’मध्ये केलेलं आहे. प्रत्येक महिलेमध्ये काहीही करून दाखवण्याची क्षमता आणि पात्रता आहे, केवळ तिला आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे इतकंच. मीना बिंद्रा याचच एक जिवंत उदाहरण आहे.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe