जुने चप्पल-बूट एकत्र करून गरजूंपर्यंत पोहोचविणाऱ्या सिमरनला बदलायचं आहे जग

जुने चप्पल-बूट एकत्र करून गरजूंपर्यंत पोहोचविणाऱ्या सिमरनला बदलायचं आहे जग

Tuesday November 17, 2015,

3 min Read

हसण्याखेळण्याच्या, मस्ती करण्याच्या वयात एक १७ वर्षांची मुलगी तिच्या वयाला न शोभणारं असं एक अनपेक्षित काम करतीये...दुबईत राहणारी सिमरन वेदव्यास जुने बूट-चप्पल एकत्र करते.अगदी जगावेगळा असा हा तिचा छंद आहे. पण त्यामागे खूप उदात्त कारण आहे.

अभ्यासात नेहमीच अव्वल असणाऱ्या सिमरनला तिच्या अलौकिक अशा बुद्धिमत्तेसाठी ‘हार्ट ऑफ गोल्ड’ आणि ‘प्रिन्सेस डायना इंटरनॅशनल अवॉर्ड’नं गौरवण्यात आलं आहे. सिमरन सिनर्जी ५ , दारिद्र्य आणि भूकेचं निर्मूलन, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, शिक्षण, आरोग्य आणि सर्वांसाठी मूलभूत सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करते. त्याशिवाय शांतता, पर्यावरण, युवा सक्षमीकरण, लैंगिक समानता, आणि सर्वांसाठी समान शिक्षण हे तिचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.


image


अगदी ७ वर्षांची असल्यापासून सिमरन उत्तर प्रदेशातल्या लखनऊमधल्या मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या केंद्रात तिच्या आजीसोबत जायची. तिच्यावर तिच्या आजीच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव आहे. सुरुवातीला तिथल्या रुग्णांसोबत तिला बोलता यायचं नाही...पण तरीही ती तिथे जात राहिली. सलग आठ वर्ष सिमरन या केंद्राला न चुकता भेट देत आहे. त्यामुळे तिथली काही मुलं तिला आता छान ओळखायला लागली आहेत.

त्याचदरम्यान तिच्या आजी-आजोबांच्या फार्महाऊसमुळे तिला पर्यावरणाचीही गोडी लागली. तिला रोपांची, झाडांची खूप आवड आहे. तिनं घराच्या आवारातच कागद, जुने डबे आणि अशाच अन्य काही सामानावर पुनर्प्रक्रिया करायला सुरुवात केली. अशा रिसायकल केलेल्या वस्तू ती विविध संस्थांना भेट द्यायची.


image


आतापर्यंत सिमरनने जवळपास ६० पेक्षांही जास्त अभियानांचं नेतृत्व केलं आहे. याचाच एक मोठा भाग म्हणजे संयुक्त रब अमिरातमध्ये विविध शाळा आणि संस्थांमध्ये शिकत असलेल्या ३०० पेक्षा जास्त मुलांच्या मदतीनं तिनं दोन हजारांपेक्षाही जास्त झाडं लावली आहेत.

२०१२ पासून सिमरननं सिनर्जीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं रोग्य, पर्यावरण, शिक्षण या क्षेत्रांत काम केलं आहे. सिनर्जी ही भारतातल्या कॉस्मो फाऊंडेशनच्या अंतर्गत काम करते आणि दुबईपर्यंत या संस्थेचा विस्तार आहे.

सिमरननं एका महिन्यापेक्षाही कमी काळात जवळपास ३ हजार बूट- चप्पल गोळा केल्या आणि त्यानंतर त्या आफ्रिकेच्या युगांडा आणि केनियामध्ये AMPATH या संस्थेच्या सहाय्यानं वितरित केल्या.

एबॉट डायबिटीस केअर कॉन्सफरन्सच्या दरम्यान सिमरनच्या वडिलांची ओळख अफ्रिकेतील रुग्णांसाठी बूट गोळा करणाऱ्या लू नावाच्या एका महिलेशी झाली होती. सिमरनच्या वडिलांनीची तिचीही लूशी ओळख करून दिली. या कॉन्फरन्सनंतर दोन दिवसांनंतर घरी जात असताना लूचा मधुमेहामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. सिमरन लू ला कधी भेटली नव्हती. पण तिनं लूचं हे काम पुढे नेण्याचं ठरवलं. सिमरनंन या कार्यासाठी सोशल मिडियाचीही मदत घेतली. त्याचदरम्यान गल्फ न्यूजनं तिचं हे काम घराघरापर्यंत पोहोचवलं. आणि संपर्कासाठी तिचा इमेलही दिला. इमेल दिल्यानंतर मदत करू इच्छिणाऱ्या लोकांनी पाठवलेल्या मेलनं सिमरनचा मेल बॉक्स पूर्ण भरून गेला. अगदी थोड्या वेळात तिनं बूट-चप्पल एकत्र करून आफ्रिकेत पाठवून दिले.

तरुणांकडे शक्ती आहे, प्रेरणा आहे आणि जग बदलण्याची ताकदही, असं सिमरन मानते. स्वप्न पाहणारी महत्त्वाकांक्षी ध्येयवेडी सिमरन आजच्या तरूण पिढीची प्रतिनिधी आहे. रोज कमीत कमी एका माणसावर तरी आपल्या कार्याचा सकारात्मक परिणाम झाला पाहिजे, असं ती मानते. २०१२ मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकची मशाल हाती घेण्याची संधी तिला मिळाली. हा दिवस ती आपल्या आयुष्यातला सुवर्णक्षण मानते.


image


सिमरनला आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत चित्रपट पहायला, मॉलमध्ये फिरायला जायला खूप आवडतं...पण याच मित्र-मैत्रिणींना तिनं आपल्या कामामध्येही सहभागी केलं आहे.

सिमरनला आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या समस्यांची चांगलीच जाणीव आहे. पुढच्या पाच वर्षांत तिला सर्जिकल सायन्सचा अभ्यास करायचा आहे. या क्षेत्रात दररोज नवंनवं काही येतंय आणि मला त्याचा अभ्यास करून लोकांच्या उपयोगी पडायचं आहे, असं सिमरनचं म्हणणं आहे.

तिला आता अमिरातीच्या यंग अॅचिवर्स अवॉर्डसाठी नामांकित करण्यात आलं आहे. तिला आशा आहे ती नक्की विजेती होणार.