सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा श्री गणेशा करणारी पहिली महिला शहनाईवादक 'नम्रता गायकवाड'

0

देशातील सर्वात लहान आणि बोटावर मोजण्याइतपत असणाऱ्या महिला शहनाईवादकांपैकी एक असणारी नम्रता गायकवाड हिला कालच सुरु झालेल्या ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा श्री गणेशा करण्याची संधी मिळाली. प्रथेनुसार मंगल वाद्याने महोत्सवाचा प्रारंभ करण्याचा मान यंदा नम्रताच्या सुरेल शहनाईवादनाला मिळाला. महोत्सवाच्या स्वरमंचावरुन शहनाईवादन करणारी पहिली महिला असा मान शिरचेपात रोवणाऱ्या नम्रता हिच्याशी युवर स्टोरीने साधलेल्या संवादातून तिच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले.


वयवर्ष २१ असलेली नम्रता सर्वसामान्य युवतीप्रमाणेच वावरताना दिसते, पण एकविसाव्या शतकातली ही तरुणी जेव्हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि शहनाईवादनाबद्दल जेव्हा आपले विचार मांडते तेव्हा तिच्यात एक वेगळीच चमक असल्याचे जाणवते.

नम्रता सांगते की, लहानपणापासूनच तिला शहनाईवादनाचा वारसा लाभला. वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच तिला शास्त्रीय संगीताची गोडी लागली. “माझी आई सांगते की, कैक वेळा मी झोपावे म्हणून पंडित जसराजजींचा बागेश्री लावला जाई तर कधी तानपुऱ्याचा मधुर आवाज ऐकला की मला गुंगी यायची,". ज्या महोत्सवात मी बालपणापासून येत आहे, त्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात कला सादर करण्याची मला मिळालेली संधी हा माझा भाग्य योगच आहे”.

शहनाईवादनाची परंपरा लाभलेल्या गायकवाड घराण्यातील नम्रता ही पाचव्या पिढीची, तर सवाई स्वरमंचावरुन कलाविष्कार सादर करणारी चौथ्या पिढीची कलाकार ठरली आहे. सनईसम्राट शंकरराव गायकवाड, प्रभाशंकर गायकवाड आणि प्रमोद गायकवाड यांच्यानंतर केवळ २१व्या वर्षीच नम्रता हिला सवाईच्या स्वरमंचावरून स्वतंत्र कलाविष्कार सादर करण्याची संधी लाभली. पुण्याच्या भारती विद्यापीठातून शहनाई हा विषय घेऊन नम्रताने पदवी संपादन केली आहे. तिची पहिली गुरु म्हणजे तिची आई सीमा गायकवाड असल्याचं नम्रता सांगते, “ माझ्या आईनेच मला वाद्याची गोडी लावली. माझे आजोबा पंडित अनंतलाल यांच्याकडून मी शहनाईवादनाचे शिक्षण घेतले.


आतापर्यंत देशविदेशात अनेक संगीत महोत्सवात आपले सादरीकरण करणारी नम्रता तिच्या बालपणीच्या आठवणी सांगते, तिला आठवतंय की ती सहा वर्षाची असताना दिल्लीला तिच्या आजोळी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जात असे. ती म्हणते की, "जरी तिच्या प्रथम गुरुस्थानी तिची आई सीमा गायकवाड आणि सुप्रसिद्ध सनईवादक प्रमोद गायकवाड असलेत तरी वाद्य संगीताची परखड तालीम तिला तिचे आजोबा ( आईचे वडील) पंडित अनंतलालजी आणि मामा पंडित दयाशंकरजी यांच्याकडून लाभली आहे.  शहनाई हे संगीतातील महत्वपूर्ण वाद्य आहे. हे वाद्य वाजविणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. या वाद्याचे वादन करताना मोठा दमसास (दमश्वास) लागतो. त्यात नम्रता एक मुलगी. म्हणजे तसे पाहिले तर तिच्या फुफ्फुसाची क्षमता कमी, म्हणून माझं शहनाईवादनाचं प्रशिक्षण खूप गमतीदार आणि कठीण होतं”. तिच्या आजोबांकडे असलेल्या जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजावर किंवा घरातील एअर कन्डीशनच्या घोंघावत्या आवाजावर, ४५डिग्री तापमान असलेल्या खोलीत आणि अश्या कैक कसोटींवर तिला सनईचा सूर लावावा लागे. या सगळ्या गोंधळी आवाजाच्या प्रमाणाहून अधिक सुर तिला लावायला सांगितला जायचा, जेणेकरून तिचा दमसास वाढेल, असे तिच्या आजोबांचे मत होते. त्यामुळे तिच्या शारीरिक क्षमतेची कसोटी तिथे लागायची.

संगीत प्रशिक्षणाबद्दल नम्रताचे काही ठोस विचार आहेत. जे कदाचित पारंपारिक नसतीलही. नम्रता म्हणते की, “संख्यात्मक प्रशिक्षणापेक्षा ती गुणात्मक प्रशिक्षणाला महत्व देते. म्हणजे जे कलाकार म्हणतात ना की ते दहा ते बारा तास रियाज करतात ते धादांत खोटे बोलतात असे तिला वाटते. खरं तर शहनाई वादनाचा तुम्ही विचार केला तर त्यात तुमचा दमसास राखणे ही खूप मोठी गोष्ट असते, त्यासाठी तुम्हाला कठोर साधना आवश्यक असते. दमसासाबरोबरच तुमच्या बुद्धीची तल्लखता देखील पणाला लागते. तुम्ही जो रियाज करता त्याचप्रमाणे सादरीकरण करता येईल, असे ठरवता येत नाही. सनईवादन हे तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असते. संगीत म्हणजे तुमच्या अंतर्मनातून प्रकटलेल्या भावना असतात. माझ्या वादनात मी तुम्हाला कधी एक सहा वर्षाची चिमुकली दिसेल, तर कधी एक तरुणी, तर कधी कधी एक प्रौढ स्त्री,” नम्रता काहीशी कौतुकाने सांगते.

एकंदरीतच शहनाई वादनाला, वाद्य-संगीतात मिळणाऱ्या स्थानाबद्दल नम्रता खूप नाराज असल्याचं सांगते. शहनाई वादनात एक दुसरे दिग्गज कलाकार सोडले तर या वादनाला फारसे महत्व दिले जात नाही. शहनाई हे मंगल तसेच दुःखाच्या प्रसंगी वाजविले जाणारे वाद्य आहे ही कल्पनाच मुळी तिला खोडून काढायची आहे. “जेव्हा एखाद्या लग्नात मी एका कोपऱ्यात बसून शहनाई वादन करते आणि आजूबाजूचे लोक हसतात, खानपान करतात थोडक्यात शहनाई वादनाकडे फारसे गांभीर्याने घेत नाही, तेव्हा खूप क्लेशदायक वाटते. हे कुठेतरी थांबायला पाहिजे.” असे तिला वाटते.

शहनाई वादनाला साथ देणारे तबलावादक हे उत्तम दर्जाचे असावेत. तिच्या मते बरेचदा तिला कनिष्ठ तबलावादक साथीला लाभतात. शहनाई वादकाला नेहमीच अनुभवी तबलावादक लाभत नाही, याबाबतीत अनेकदा भेदभाव झाल्याने सुन्न व्हायला होते, असे मत नम्रता नाराजीच्या सुराने व्यक्त करते. मात्र याबाबत नुसतेच मुग गिळून गप्प बसण्यात अर्थ नाही असेही ती ठणकावून सांगते.

शहनाई वादनाबद्दल हल्लीच्या तरुण पिढीत जागरूकता निर्माण करण्याचा नम्रताचा मानस आहे. या वाद्याचा प्रसार व्हावा म्हणून काही डेमो लेक्चर्स घेण्याचा तिचा विचार आहे. तसेच या वाद्याच्या प्रचारा आणि प्रसाराकरिता सरकारी योगदान मिळावे अशी अपेक्षाही ती बाळगते.

सनई हे माझे आयुष्य असून अजूनही मला या प्रवासात भरपूर काही शिकायचे आहे अशी भावना नम्रता व्यक्त करते. तिच्या यशस्वी वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा !


Related Stories

Stories by Rupa Chapalgaonkar-Borude