'सम-विषम योजनेचे यश हा सरकारचा नाही तर दिल्लीकरांचा विजय आहे'

0

अंध भक्त आणि प्रचाराकांचे तोंड काही दिवसांसाठी बंद झालेत, याची मला पूर्ण खात्री आहे. दिल्लीतलं आम आदमी ( आप) सरकार हे केवळ धरणे आणि प्रदर्शन करण्याच्याच लायकीचे आहे. राज्यकारभार चालवण्यासाठी पात्र नाही, हे सिद्ध करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना धक्का देत आप सरकारनं सार्वजनिक हिताची सर्वात महत्त्वकांक्षी योजना नुकतीच लागू केली. दिल्लीमधल्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सम-विषम योजना लागू करण्याचा निर्णय आप सरकारनं घेतला. त्यावेळी दिल्लीकर या योजनेला इतकी समर्थ साथ देतील असं आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. गेल्या काही दिवसात मेट्रोनं प्रवास करताना मी वेगवेगळ्या लोकांना भेटलो. ही सारी मंडळी दिल्ली सरकारनं हे साहसी पाऊल उचललं म्हणून खूश आहेत. त्यापैकी काही जणांनी तर उघडपणे याचं कौतूक केलंच, शिवाय मला धन्यवादही दिले. पण हे सर्व दिल्लीकर जनतेच्या स्वयंस्फूर्त पाठिंब्याशिवाय अजिबात शक्य नव्हते, हे मला सांगितलेच पाहिजे. त्यासाठी मी दिल्लीकरांचा मनापासून आभारी आहे.

दिल्ली हे गॅस चेंबर बनलंय, या शब्दात उच्च न्यायालयानं शहरातल्या वाढत्या प्रदूषणावर नाराजी व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाच्या या ताशे-यानंतर दिल्लीला प्रदूषणमुक्त करण्याची जबाबदारी दिल्ली सरकारनं आपल्या खांद्यावर घेतली. खरं तर दिल्लीकरांमध्ये याबद्दल जागृती व्हावी यासाठी दिल्ली सरकार पूर्वीपासूनच प्रयत्न करतंय. याच प्रयत्नांचा भाग म्हणून दर महिन्याच्या २२ तारखेला दिल्ली सरकारकडून ‘कार फ्री डे’साजरा केला जातो. पण ही आणिबाणीची परिस्थिती होती. याचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारला कठोर पाऊलं उचलणं आवश्यक होतं. खरं तर या गोष्टीवर मवाळ धोरण स्वीकारणं हा देखील पर्याय आमच्यासमोर होता. पण हे मवाळ धोरण म्हणजे दिल्लीकरांच्या जीवाशी खेळ होता. भावी पिढीचा तो विश्वासघात ठरला असता. त्यामुळे आम्ही खडतर मार्ग निवडला. दिल्लीत सम-विषम योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. सम-विषम योजनेची घोषणा म्हणजे विस्तवाशी खेळ आहे, असं मत माझ्या अनेक हितचिंतकांनी व्यक्त केलं होतं. ही जर योजना अपयशी झाली तर सूशासनाच्या आमच्या दाव्याला मोठा धक्का बसेल याची जाणीव त्यांनी मला करुन दिली. पण आम्हाला आमच्या आणि आमच्या पक्षाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता.लोकांची साथ मिळाली तर ही योजना नक्कीच यशस्वी होईल याची आम्हाला खात्री होती.

सम-विषम योजनेनं अनेक पूर्वापार समजूती मोडल्या. त्याचबरोबर सरकारच्या कारभाराचे काही मापदंडही प्रस्थापित केले. अशा प्रकारचे साहसी धोरण राबवण्याची बौद्धीक क्षमता आप सरकारमध्ये आहे हे या योजनेनं सिद्ध केलं.तसंच ही विशाल योजना सरकार अतिशय उत्तम नियोजन करुन राबवू शकते आणि यशस्वी पूर्ण करु शकते हे देखील यावेळी दिसले. योजनेची प्रभावी अमंलबजावणी करणे ही स्वातंत्र्योत्तर काळातली मोठी समस्या आहे. वेगवेगळ्या सरकारनं यापूर्वी अनेकदा चांगल्या योजना बनवल्या आहेत. पण प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे या योजना अपयशी ठरल्या. सम-विषम योजनेनं हा अथडळाही पार केला. ही योजना राबवण्यासाठी वेगवेगळ्या घटकांमुळे उत्तम समन्वय आवश्यक आहे. याची सर्वांनाच कल्पना होती. सरकारने अशा सर्व घटकांना आपल्या सोबत घेतले. त्यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या. याचा परिणाम लगेच दिसला. या प्रत्येक संस्थेनं सकारात्मक मानसिकतेनं एक टीम म्हणून यामध्ये काम केलं.

लोकसहभागाशिवाय ही योजना यशस्वी होणं शक्यच नव्हतं. सम-विषम योजना ही लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहे, हे त्यांना समजावणे आवश्यक होतं. केवळं त्यांचं आरोग्य नाही तर त्यांची मुलं-बाळं आणि येणा-या पिढीच्या आरोग्यासाठीही ही योजना राबवणे आवश्यक होते. प्रदूषणाचा त्रास प्रत्येकालाच होत होता. तरुण, वृद्ध, महिला, पुरुष अशा प्रत्येक वर्गातल्या लोकांमध्ये प्रदुषणामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढले होते. एखादा व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब तो प्रदूषणामुळे तितकाच त्रस्त होता. हा संदेश दिल्लीत सर्वदूर पोहचवल्याबद्दल माध्यमांचे आभार. सम-विषम योजने संदर्भातली कोणतीही बाब ही राष्ट्रीय चर्चेचा भाग बनली. प्रत्येक व्यक्ती याच विषयावर बोलत होता. या योजनेतल्या प्रत्येक छोट्या पैलूवरही विस्तारानं चर्चा झाली आहे.

मला तुमच्याशी आणखी एक गोष्ट शेअर करायची आहे. मागच्या महिन्याच्या मधल्या पंधरवड्यात सरकारी आधिकारी आणि मंत्र्यांमध्ये झालेल्या एका बैठकीच्या आधीच याबाबतच्या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतू त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ही या विचारांशी असहमत होते. या विषयावर चर्चा आणि वाद होण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या सूचना सरकारपर्यंत येऊ दे योजनेशी अंमलबजावणी करण्याची घाई नको, असे मत त्यावेळी केजरीवाल यांनी मांडले होते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चांमुळेच लोकांमधल्या गैरसमजूती कमी झाल्या. सरकार नागरिकांच्या भल्यासाठी काम करतंय हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. तसेच त्यामुळे सरकारलाही प्रत्येक वर्गाच्या समस्या समजण्यासही मदत झाली. त्यानंतर चौथ्या आठवड्यात ज्यावेळी सरकारनं सम-विषम योजनेचा आराखडा सादर केला त्यावेळी लोकांमध्ये आम सहमती झाली होती. ही योजना स्विकारण्यासाठी ते मानसिकदृष्ट्या सज्ज होते. आता दिल्ली सरकार नाही तर दिल्लीतल्या सामान्य नागरिकांनीच ही योजना यशस्वी करण्याचा विडा उचलला होता. एखादी योजना तयार करताना त्यामध्ये सामान्य जनतेलाही सहभागी करुन घेतले तर कोणतीही महत्त्वकांक्षी योजना साकार होऊ शकते. अन्य राज्यातल्या सरकारनेही या योजनेमधून हा बोध घेणे आवश्यक आहे.

आम आदमी पक्ष जे वचन देतो ते पूर्ण करतो हे देखील सम-विषम योजनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आमचा उद्देश प्रामाणिक होता. आम्ही केवळ लोकांना फसवण्यासाठी खोटी आश्वासनं देत नाही. जे शक्य आहे त्याचंच आम्ही वचन देतो. मला यावेळी तुलना करायची नाही, पण मागच्या वीस महिन्यात मोदी सरकारनं सुरु केलेल्या अनेक योजनांची सध्या काय स्थिती आहे ते या निमित्तानं तपासायला हवे. ‘स्वच्छ भारत’ ही अत्यंत चांगली योजना होती. आम्ही देखील या योजनेचं अंत:करणापासून स्वागत केलं, त्याला पाठिंबा दिला. तरी देखील ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. ही योजना म्हणजे केवळ मीडिया स्टंट बनली आहे. करदात्यांचे कोट्यावधी रुपये कोणताही प्रभाव साधू न शकणा-या जाहिरातींवर खर्च करण्यात आले. लोकांना कसं जोडलं जाऊ शकेल याचा यामध्ये विचारच करण्यात आला नाही. डिजीटल इंडिया किंवा मेक इन इंडिया या योजनेची अवस्था पहा, या योजनेचा प्रवास कसा सुरु आहे,याची कुणालाच कल्पना नाही. लोकांना विश्वासातच घेतले जात नाहीय. त्यामुळे ह्या सा-या योजना म्हणजे निव्वळ भूलथापा वाटू लागल्या आहेत.

मला याची पूर्ण जाणीव आहे, की सुरुवात चांगली झालीय. पण पुढचा मार्ग आणखी खडतर आहे. या मार्गावर आणखी आव्हानं आहेत. आपल्या सगळ्यांना मिळून दिल्ली प्रदूषण मुक्त करायची आहे. दिल्ली सरकार १५ जानेवारीनंतर या योजनेची समीक्षा करेल. त्यानंतर याचे विश्लेषण करण्यात येईल. त्यानंतर गरज वाटली तर चांगल्या आरोग्यासाठी आणखी कठोर निर्णय घेतले जातील. हे निर्णय कदाचित आणखी कठोर असतील. पण चांगल्या समाजासाठी अशा निर्णयाची आवश्यकता आहे. एक असा समाज ज्यामध्ये स्वच्छ हवा दुर्मिळ नसेल, मुलांना श्वास घेण्यात त्रास होणार नाही तसंच वृद्ध व्यक्तींना फुफ्फूसात धूर न घेता मुक्तपणे फिरता येईल. सम-विषम योजना जनतेमध्ये क्रांतीचा संचार करणारे माध्यम आहे. तसंच सरकारच्या एका मॉडेलचा अविष्कारही आहे. सामान्य नागरिक एखाद्या योजनेत सहभागी झाले त्यांना त्या योजनेची खात्री पटली तर कोणतेही अशक्य काम शक्य होऊ शकतं हे या योजनेनं दाखवून दिलंय. आजवर जगातलं सर्वात प्रदूषित शहर अशी दिल्लीची ओळख होती. आता देशातलं पहिलं प्रदूषण मुक्त शहर म्हणून ओळख निर्माण करण्यात दिल्ली यशस्वी होईल. याची मला पूर्ण खात्री आहे.

धन्यवाद दिल्ली


( वरील लेखाचे मूळ लिखाण इंग्रजी भाषेत वरिष्ठ पत्रकार आणि आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष यांनी केलेले आहे. वरील लेखातील विचारांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. मराठी अनुवाद- डी. ओंकार )