प्रगतीच्या वेगाने पुढे जाताना ई-कच-याच्या शास्त्रीय विल्हेवाटीची गरज पूर्ण करणारी ‘ईकोरेको’!

प्रगतीच्या वेगाने पुढे जाताना ई-कच-याच्या शास्त्रीय विल्हेवाटीची गरज पूर्ण करणारी ‘ईकोरेको’!

Monday May 23, 2016,

4 min Read


जगाच्या बरोबरीने भारताला विकास साधायचा असेल तर इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकच्या क्षेत्रात जाण्याला कोणताही पर्याय नाही. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडिया, स्मार्ट सिटी आणि स्किल इंडिया या सारख्या योजनांची घोषणा केली आहे. ई-क्षेत्राच्या या प्रभावाने वेगवान प्रगती होत असताना एक सर्वात मोठा प्रश्न देखील निर्माण होतो आणि तो म्हणजे ई-कच-याचा! या प्रश्नाची सर्वाधिक व्याप्ती आपल्यादेशात जर कुठे असेल तर ती महाराष्ट्रात आहे. या क्षेत्रातही राज्य आघाडीवर आहे!

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यांच्या जोडीला आता भिवंडी, अहमदनगर, सांगली अशा काही शहरातून झपाट्याने नागरीकरण आणि औद्योगिकरण झाले आहे आणि त्यामुळे ई-कच-याचे व्यवस्थापन हा मोठा व्यवसाय आणि काम बनले आहे. इको रिसायकलिंग लि. म्हणजेच ‘इकोरेको’ ही कंपनी यासाठी गेली अनेक वर्षे काम करत आहे. भारतातील पहिली व्यावसायिक आणि सूचीबद्ध कंपनी म्हणून इकोरेकोचा उल्लेख या क्षेत्रात केला जातो. महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरातील ई-कचरा गोळा करणे त्याचे फेरवापरायोग्य सामान बाजुला करणे आणि नष्ट करण्यासाठी असलेल्या सामानाला पर्यावरणाची काळजी घेऊन नष्ट करणे इतका सरळ असा या कंपनीच्या कामाचा प्रकार आहे . मात्र हा सरळ भासत असला तरी नेमके त्यात काय केले जाते हे जाणून घेण्यासाठी युअर स्टोरीने त्याबाबत अधिक माहिती घेतली.

image


त्याबाबत सांगताना कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बि के सोनी म्हणाले की, “ई-वेस्ट बाबत मुंबई आणि परिसरातील जनतेत आता सकारात्मक बदल होताना दिसतो आहे आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. या कच-याचे शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे किती गरजेचे आहे ते लोकांना आता जाणवते आहे. त्यासाठी आम्ही ई-कचरापेट्या लावण्याच्या मोहिमेची सुरुवात केली आणि त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे” ते म्हणाले. महाराष्ट्राच्या इतर शहरातूनही या साठी जाणिव जागृती करण्याची गरज आहे आणि महत्वाच्या सर्व शहरात पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे असं इकोरेकोच्या अध्यक्षांनी सांगितले.

देशातील इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक ई-कचरा तयार होतो. कारण ईलेक्ट्रॉनिक वस्तु किंवा ईलेक्ट्रिकच्या वस्तूंचा सर्वाधिक वापर याच राज्यात होतो. येथील औद्योगिकरणाचा वेगही इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबई पाठोपाठ नाशिक, पुणे, औरंगाबाद यांच्या परिसरातही ई-कचरा वाढत चालला आहे. त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे किंवा पुन्हा वापरायोग्य करणेही ही देखील गरज बनली आहे जेणे करून या परिसरात पर्यावरणाचे नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत. सन २०२०पर्यंत या ई-कच-याचे प्रमाण या परिसरात २०दशलक्ष डॉलर म्हणजेच एक लाख पंचविस हजार कोटी रुपयांच्या उलाढाली इतके होणार आहे. या वाढत्या प्रमाणाचा परिणाम थेट आमच्या सामाजिक-पर्यावरणीय व्यवस्थांवर आणि त्याचवेळी आर्थिक प्रगतीवर होणार आहे. हा कचरा निर्माण होणे ही समस्या नाहीच पण तो योग्य प्रकारे गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे ही खरी समस्या बनली आहे.

image


सध्या ९०टक्के ई-कचरा भंगारवाल्यांच्या माध्यमातून गोळा केला जातो. त्यांना त्याच्या हाताळणीबाबत काहीच ज्ञान नसते आणि केवळ नफा कमाविण्याच्या हेतूने ते हा उद्योग करत असतात. त्यामुळे या ई-कच-यातून अनेक धोकादायक प्रश्न निर्माण होऊ शकतात. या कच-याच्या हाताळणी, प्रक्रिया किंवा वाहतूक करण्याबाबत योग्य ते ज्ञान असलेल्यांच्या मार्फत हा कचरा गोळा करणे आणि त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणेही तितकेच महत्वाचे असते.

अश्या परिस्थितीत ‘इकोरेको’चा सर्वाधिक सुरक्षित पर्याय उद्योग आणि नागरीकांसाठी उपलब्ध असतो. भंगारवाले आणि ई-कचरा निर्माण करणारे यांच्यात योग्य तो समन्वय साधून व्यावसायिक पध्दतीने ‘इकोरेको’ हा कचरा गोळा करण्याचे काम करत आहे. त्यासाठी ई-वेस्ट मुक्त भारत ही संकल्पना राबविली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनला जोडूनच ही संकल्पना राबविण्याचा चांगला परिणाम मिळतो आहे. शहरी भागात या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तुमच्या घरात खराब झालेल्या इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तु जसे की फ्रिज, संगणक, मोबाईल किंवा त्याचे चार्जर अथवा बंद पडलेले बँटरी सेल किंवा हेअर ड्रायर अथवा प्रिंटर यांच्या कच-याचे संकलन करण्यासाठी या ई-कचरपेट्या आता शहरी भागात लावण्यात येत आहेत. त्यासाठी ‘ईकोरेको’ने एकलाख पेक्षा जास्त ठिकाणी या पेट्या बसविल्या असून सुमारे पाच हजार पेक्षा जास्त ठिकाणी संकलन केंद्र सुरू केली आहेत. शाळा महाविद्यालये किंवा अशा जागा जेथे अशा प्रकारच्या कच-याचे संकलन होण्याची शक्यता जास्त असते अशी ही ठिकाणे आहेत. धार्मिक स्थळांच्या ठिकाणीसुध्दा अशा वस्तु दान म्हणून देण्याची सुविधा ‘ईकोरेको’ने आता सुरू केली आहे. या अभियानाला कॉर्पोरेट जगताने प्रायोजित करावे असाही ‘इकोरेको’चा प्रयत्न आहे. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून काही उद्योजक यासाठी आता पुढेही येत आहेत.

image


जग जस जसे प्रगतीच्या दिशेने पुढे जाणार आहे ई-कच-यासारख्या नव्या जगातील समस्याही निर्माण होणारच आहेत मात्र या समस्या आहेत म्हणून मानवी प्रगतीला खिळ न घालता पर्यावरणाच्या संवर्धनाच्या माध्यामतून एकजूट करून आपण त्यावर यशस्वीपणाने मातही करू शकतो हेच ‘ईकोरको’ सारख्या प्रयत्नांचे सांगणे आहे. एकविसाव्या-बाविसाव्या शतकात प्रगतीचे पंख लावून जाताना कोणत्याही प्रकारच्या कच-याला तिथे जराही थारा असणार नाही हेच आपले सर्वांचे ब्रीदवाक्य असायला हवे नाही का?

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

वाराणसीमध्ये ‘द धोबी’ मार्फत रोजगार व गंगा नदीला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणारे तीन तरुण 

दोन क्रिएटीव्ह महिलांनी घेतलाय क्रिएटीव्ह नाशिक बनवण्याचा ध्यास

स्वखर्चाने जनकल्याणाच्या-पर्यावरण रक्षण,पक्षी संवर्धनाचा ध्यास घेणारी कल्याणची ‘ईकोड्राइव्ह फाऊंडेशन’ची तरूण मंडळी!