सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन कोरफडच्या शेतीतून करोडपती झालेल्या हरिश धनदेव यांची प्रेरक कहाणी!

1

हरिश धनदेव यांच्यासाठी नगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता पदाची नोकरी सोडणे कठीण नव्हते, पण नोकरी सोडून शेतकरी होणे, आणि स्वत:ला शेतकरी म्हणून सिध्द करणे हेच आव्हान होते आणि त्यात त्यांनी यश मिळवले. एकेकाळी जे शेतकरी त्यांना असे न करण्याबाबत सांगत होते तेच शेतकरी आज शुन्यातून करोडपती झालेल्या याच अभियंता शेतक-याच्या कामातून प्रेरणा घेऊन स्वत: देखील कोरफड शेती करत आहेत.

ही कहाणी बदलत्या भारतातील अशा शेतक-याची आहे जो उच्चशिक्षित आहे आणि अस्खलित इंग्रजी देखील बोलू शकतो. इतकेच नाही त्यांनी तर एमबीएच्या शिक्षणासाठी दिल्लीच्या एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता पण कदाचित त्यांचे लक्ष्य काही वेगळेच होते. ही गोष्ट जैसलमेरच्या हरिश धनदेव यांची आहे, ज्यांनी २०१२मध्ये जयपूरमध्ये बीटेक केल्यानंतर एमबीए करण्यासाठी दिल्लीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतू शिक्षण सुरू असतानाच त्यांना सन २०१३मध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी मिळाली त्यामुळे त्यांना दोन वर्षांचा एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. हरिश जैसलमेरच्या नगरपालिकेत कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाले. येथे केवळ दोन महिने  नोकरी केल्यावर त्यांचे लक्ष नोकरीवरून विचलीत झाले. त्यांनी दिवस-रात्र या नोकरीपेक्षा वेगळे काहीतरी करावे असा विचार सुरू केला. काहीतरी वेगळे करण्याची ओढ इतकी वाढली की, ते नोकरी सोडून स्वत:साठी काय करू शकतात यावर संशोधन करू लागले.

कृषी विद्यापीठाने दिली दिशा

आपल्यासाठी काही करायच्या शोधातून हरिश यांची भेट बिकानेर येथील कृषी विद्यापीठातील एका व्यक्तीसोबत झाली. हरिश यांना पारंपारीक राजस्थानी शेती ज्वारी-बाजरी यापेक्षा वेगळे काहीतरी करायचे होते. तेंव्हा चर्चेदरम्यान त्यांना कोरफडच्या शेतीबाबत सल्ला मिळाला. स्वत:साठी काहीतरी करायचे म्हणून हरिश पुन्हा एकदा दिल्लीला आले जेथे त्यांनी शेतीबाबतच्या एका प्रदर्शनात नव्या प्रकारच्या तंत्रातून शेती करण्याबाबतची माहिती घेतली. प्रदर्शनात कोरफडच्या शेतीबाबत माहिती घेऊन त्यांनी कोरफड लागवड करायचा निर्णय घेतला. येथूनच त्यांच्या कथेला वळण मिळाले, आणि नव्या सुरुवातीची दिशा मिळाली. दिल्लीहून हरिश बिकानेरला गेले आणि कोरफडच्या२५ हजार रोपांसह जैसलमेरला गेले.

प्रारंभी अनेकांनी मनाई केली

जेव्हा बिकानेरहून कोरफडची रोपे आली, तेंव्हा ती शेतामध्ये लावण्यादरम्यान अनेक लोकांनी सांगितले की, जैसलमेरमध्ये काही लोकांनी यापूर्वी देखील हा प्रयोग केला होता पण त्या सा-यांना अपयश आले होते. पिक विकत घ्यायला कुणीच आले नाही मग त्या शेतक-यांनी ती रोपे काढून दुसरी शेती सुरू केली. हरिश सांगतात की, “ या गोष्टीने मनात थोड्या शंका नक्कीच आल्या पण माहिती घेतली त्यावेळी समजले की, शेती तर लावण्यात आली होती पण त्यांना खेरदीदारांशी संपर्क करता न आल्याने कुणीच खरेदीला आले नाही. शेवटी हरिश यांना हे समजण्यास वेळ लागला नाही की, येथे त्यांच्या बाजारातील कौशल्याने काम होऊ शकते.

कशी झाली कोरफडच्या शेतीची सुरुवात

हरिश सांगतात की, “ घरात याबाबत काहीच अडचण नव्हती की मी नोकरी सोडून दिली, पण माझ्यासमोर स्वत:ला सिध्द करण्याचे आव्हान होते”. खूप शोध घेतल्यानंतर २०१३मध्ये कोरफडच्या शेतीबाबत सुरुवात झाली. बिकानेर कृषी विद्यापिठातून २५ हजार रोपे आणण्यात आली ती दहा गुंठे जमिनीत लावण्यात आली. आजमितीस हरिश सातशे गुंठे जमिनीत कोरफड लावतात. त्यात त्यांच्या जमिनीशिवाय बाकीची भाडेतत्वावर घेण्यात आली आहे.

बाजार कौशल्य कामी आले.

हरिश सांगतात की सुरुवातीला सारेच माहिती होते असे नाही, ते सांगतात की, खूपच तरूण असल्याने त्यांच्या गाठी अनुभव नव्हता. पण काहीतरी वेगळे करण्याची महत्वाकांक्षा होती आणि त्यातूनच त्यांना मार्ग मिळत गेला. शेतीची सुरुवात होताच जयपूरच्या काही एजन्सी सोबत चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर कोरफडच्या पानांच्या विक्रीचा करार करण्यात आला. त्यानंतर काही मित्रांनी हे काम आणखी पुढे नेण्याबाबत चर्चा केली. हरिश सांगतात की या नंतर त्यांनी आपल्या केंद्रावर कोरफडपासून पल्प तयार करण्याचा प्रकल्प सुरु केला. प्रारंभीच्या काही दिवसांनंतर राजस्थानच्या काही खरेदीदारांना हा पल्प विकण्यास सुरूवात झाली.

टर्निंग पॉइंट

हे सारे सुरू असताना एक दिवस ऑनलाईन सर्च करुन हे पाहत असताना की कोण कोण मोठे स्पर्धक आहेत जे मोठ्या प्रमाणात कोरफडचा पल्प विकतात, आम्हाला मोठ्या खरेदीदाराची गरज होती. कारण शेतीचा आकार वाढला होता आणि उत्पन्न वाढले होते. “त्याचवेळी मला पतंजलीबाबात माहिती मिळाली, पतंजली देशातील कोरफडच्या पल्पचा मोठा खरेदीदार आहे, मग काय मी इमेल करून पतंजली यांना माझ्या पल्पबाबत कळविले” हरिश सांगतात. त्यांचे उत्तर आले आणि नंतर त्यांचा प्रतिनीधी भेटीला आला. युअर स्टोरीशी बोलताना हरिश सांगतात की, येथूनच या कहाणीचा टर्निंग पॉईंट सुरु झाला. पतंजली आल्याने गोष्टी बदलल्या आणि उत्पन्न वाढले. गेल्या दीड वर्षापासून हरिश बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदला कोरफडचा पल्प विकतात.

उत्पन्नासोबतच कामाचे ज्ञान वाढले

हरिश सांगतात की, “सुरुवातीला मला ही शका होती की हे सारे कसे होणार? हे कसे वाढवणार? पुढे हरिश सांगतात की हळूहळू कामासोबत सारेच समजत गेले. आज केवळ हरिश यांची कंपनी नॅचरल ऍग्रोचे उत्पन्न वाढले आहे असे नाहीतर त्यांच्यासोबत काम करणा-यांचे उत्पन्न सुध्दा वाढले आहे. हरिश सांगतात की पतंजली सोबत आल्यावर कामाची पध्दत सुधारली आहे आणि आम्ही अधिक व्यावसायिक पध्दतीने काम सुरू केले आहे.

दर्जावर राहते विशेष लक्ष

हरिश सांगतात की, आम्ही उत्पादनाच्या दर्जावर खास लक्ष देतो. आम्हाला त्याबाबत कोणत्याही तक्रारी नको आहेत त्यामुळे प्रत्येक स्तरावर आम्ही यावर लक्ष देतो की या पल्पमध्ये काही भेसळ होणार नाही.

कोरफडच्या शेतीमधून करोडपती झालेल्या हरिश धनदेव यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे, ते मुळचे जैसलमेरचे रहिवासी आहेत. येथूनच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी जयपूर आणि दिल्लीला गेले. दिल्लीत एमबीएच्या शिक्षणादरम्यान सरकारी नोकरी मिळाली आणि जैसलमेर नगरपालिकेत अभियंता झाले. तेथील नोकरी सोडून हरिश आज करोडपती शेतकरी झाले आहेत. हरिश यांचे यश हिंदी सिनेमातील सुखांत शेवट असणा-या कहाणीसारखे आहे. सोबतच अधिक पैश्याच्या मोहाने विदेशात जाणा-या तरुणांना प्रेरणा देणारी आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आयटी उद्योगातून आलेल्या कर्मचाऱ्यांची शेती उद्योगात यशस्वी इनिंग- अक्षयकल्प फार्म्स

सॉफ्टवेअर अभियंत्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणला आशेचा नवा किरण

परदेशातील करोडोची नोकरी सोडून गोशाळेद्वारे गावाचा कायापालट करत आहेत 'विज्ञान गडोदिया'

लेखक : नीरज सिंह
अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील