मॉरिशसच्या उभारणीमध्ये भारताचे योगदान खूप मोठे : पंतप्रधान अनिरूध्‍द जगन्‍नाथ यांचे प्रतिपादन

0

मॉरिशसमध्ये विविध क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणा-या सर्व भारतीय गुंतवणूकदारांचे स्वागत आहे, तेथील गुंतवणूकदारांना सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन मॉरिशसचे पंतप्रधान अनिरूध्‍द जगन्‍नाथ यांनी केले. भारत व मॉरिशसचे नाते आर्थिक नव्‍हे तर रक्‍ताचे नाते असल्‍याचे प्रतिपादन महाराष्‍ट्राचे वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मॉरिशसचे पंतप्रधान अनिरूध्‍द जगन्‍नाथ दिनांक १८ नोव्‍हेंबर रोजी मुंबईत वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी झालेल्या विशेष अनौपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. 

मॉरीशसच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरीशसला आले असतांना दोन्ही देशांमध्ये दुहेरी कर आकारणी टाळण्यासंदर्भातील करारावर यशस्वी बोलणी झाल्याने मॉरीशसच्या वित्तीय क्षेत्रात संधीचे नवे दालन खुले झाल्याचे सांगून अनिरूध्‍द जगन्नाथ म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये व्यापक आर्थिक सहकार भागीदारी करारावर (Comprehensive Economic Cooperation Partnership Agreement) नव्याने वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. यासंबंधीच्या सुधारित मुसद्यामुळे सीमेपलिकडे जाऊन दोन्ही देशांमध्ये उद्योग आणि व्यापाराच्या संधी फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. मॉरिशसमधील एकूण आयातीच्या २१ टक्क्यांहून अधिक आयात ही भारतातून होत असून भारत हा मॉरिशसच्या व्यापार क्षेत्रातील दुस-या क्रमांकाचा महत्वाचा भागीदार आहे. मॉरिशसमध्ये बँकिंग, कृषी, उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात शंभर हून अधिक भारतीय कंपन्यांनी गुंतवणूक केली असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. मॉरिशस हे भारतीयांसाठी दूर असलेले त्यांचे एक घर असल्याचे सांगून जगन्नाथ पुढे म्हणाले की आजच्या मॉरिशसच्या उभारणीमध्ये भारताचे योगदान खुप मोठे आहे. भारताकडून मॉरिशसला नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आले आहे. सर्वच क्षेत्रात मॉरिशस आणि भारताचे संबंध विस्तारले असून बॉलीवूडच्या धर्तीवर मॉरिशसमध्ये फिल्म इंडस्ट्री स्थापन व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मॉरिशस जसे गेट वे ऑफ अफ्रिका आहे तसेच ते गेट वे ऑफ इंडियाही आहे. मॉरिशसच्या वित्तीय बाजारपेठेत गुंतवणूकीच्या संधी कायम उपलब्ध आहेत. दुहेरी कर व्यवस्था नाहीशी करण्याचा प्रयत्न केल्याने अनेक मॉरिशस कंपन्या भारतात येत असल्याची माहिती ही त्यांनी दिली. मॉरिशसला एज्युकेशन हब बनवण्याचा शासनाचा प्रयत्न असून येथे येऊन विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालये सुरु करू इच्छिणा-यांचे स्वागत असल्याचेही ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात क्रांती केली आहे. जग गतीने धावत असतांना मॉरिशसही मागे राहू इच्छित नाही. भारताच्या सहकार्याने मॉरिशस ही पुढे जाऊ इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थितांनी साधला पंतप्रधानांशी थेट संवाद

या कार्यक्रमात मॉरिशसमधील गुंतवणूक संधीबाबत पंतप्रधानांनी माहिती दिल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. उपस्थित प्रतिनिधींनी मॉरीशसमधील उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञानाचे आदानप्रदान, विद्यापीठांची स्थापना, बॉलीवूडसाठीच्या संधी या विषयांवर पंतप्रधानांना थेट प्रश्न विचारले. जगन्नाथ यांनी या प्रश्नांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत उपस्थितांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. आमची मुंबईप्रमाणे आमचे मॉरिशस ही भावना भारतीयांच्या मनात, भारतीय गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाल्यास आनंदच वाटेल, अशी प्रतिक्रिया यावेळी पंतप्रधानांनी दिली. कार्यक्रमात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक प्रगतीची माहिती देणारी तर मॉरिशसमध्ये असलेल्या गुंतवणूक संधींची माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली.

गरीबीविरूद्ध लढायला सर्व देशांनी एकत्र यावे- सुधीर मुनगंटीवार

गरिबीविरूद्ध लढायला सर्व देशांनी एकत्र यावे, असे आवाहन करून महाराष्ट्र या वाटेवर नेहमीच अग्रेसर राहील असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र हे देशाचे “वित्त राज्य” असून विदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण आहे. जगातील २०१ देशांच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ३६ व्या स्थानावर आहे. महाराष्ट्र अजून वेगाने पुढे जाणार आहे. राज्यात उद्योग, कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधांचा विकास होतांना राज्यात “पर कॅपीटा हॅपीनेस”वाढावा यासाठी शासन काम करत आहे. वन विभागाने लोकसहभागातून २ कोटी ८३ लाख झाडे १ जुलै २०१६ रोजी एका दिवसात लावली ज्याची दखल लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डसला घ्यावी लागली. त्याचप्रमाणे उत्तम अर्थव्यवस्थेसाठी इंडिया टुडे समूहाने महाराष्ट्राचा पुरस्कार देऊन गौरव केला. अशा या महाराष्ट्राचे आणि मॉरीशसचे नाते खुप जुने आणि रक्ताचे आहे. हे नाते अधिक वृद्धींगत व्हावे यातून दोन्ही देशांमध्ये विचारांचे, तंत्रज्ञानाचे आदान प्रदान व्हावे, एक भक्कम संवाद सेतू निर्माण व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जगन्नाथ यांनी मॉरिशसला पूर्ण क्षमतेने विकासाच्या मार्गावर नेले आहे. मॉरिशस पृथ्वीतलावरचा स्वर्ग आहे.

दोन्ही देशांच्या सांस्कृतिक परंपरामध्ये मोठे साम्य आहे. इथे साजरी होणारी दिवाळी, होळी तिथेही साजरी होतांना दिसत आहे. जात-धर्म आणि पंथापलिकडे जाऊन एक मानवधर्म आणि कर्माचे महत्व भगवतगीतेने सांगितले आहे. त्यातून महाराष्ट्र आणि मॉरीशसचे संबंध अधिक दृढ होतांना दोन्ही देशाच्या माध्यमातून “महारिशस” ही संकल्पना ख-या अर्थाने एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जावी, दोन्ही देशात व्यापार-उद्योगातील सहकार्य वाढावे ही इच्छा असल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.