"सात महिन्यांची असताना मी माझ्या आईला पहिल्यांदा भेटले"

0

मी दत्तक अपत्य आहे, हे माझ्या आईने मला अगदी लहानपणापासूनच सांगितलं होतं. भारतात पालक आपलं मुल दत्तक घेतलेलं आहे हे सांगायला अद्यापही कचरतात. कारण त्यांना समाजाच्या प्रतिक्रियांची अधिक चिंता असते. याच कारणामुळे त्या मुलाच्या मनातही आपण दत्तक घेतले गेलो म्हणजे लाजिरवाणी बाब आहे ही भावना घर करून राहते. पण माझ्या बाबतीत मला हे अगदी लहानपणापासून माहित असल्यानं मला या गोष्टीचं कधीच वाईट वाटलं नाही. मला आठवतंय की मी एका गरोदर महिलेला पाहिलं आणि माझ्या आईला विचारलं होतं ,की त्या बाईचं पोट इतकं मोठं का आहे ? त्यावर तिचं उत्तर होत की तिला बाळ होणार आहे. मग मला हेही जाणून घ्यायचं होतं की मी सुद्धा तिच्या पोटातून आले का ? त्यावर तिचं उत्तर होतं " तू माझ्या पोटातून नाही तर हृदयातून आली आहेस ." मला असं वाटत की जिथे एका मुलाचं परिपूर्ण संगोपन प्रेमानं आणि काळजीनं होतं, तिथे कोणत्याही असुरक्षिततेला थारा नसतो.

माझी आई समाजसेविका आहे आणि ती विविध स्वयंसेवी संस्थाना भेटी देत असे. मी अर्थात तिच्या मागे-मागे असे. आम्ही त्यावेळी कोलकात्ताला राहत असू आणि बालपणीचा बराचसा काळ मी एसआयडब्ल्यूएस या संस्थेत व्यतीत केला आहे. मी तेव्हा चार वर्षांची होते आणि तिथल्या लहान बाळांशी खेळणं मला खुप आवडत असे. तिथे एक छोटं बाळ होतं ज्याच्या हृदयाला छिद्र होतं. मला तो खूप आवडायचा. एक दिवस माझ्या पालकांनी त्याला दत्तक घ्यायचं ठरवलं हा माझ्यासाठी खूप  रोमांचक क्षण होता. त्याचं नाव ठेवण्यात आलं अदीप.  काही दिवसातच तो छान बरा झाला आणि तेंव्हापासून तो सशक्त आयुष्य जगतो आहे. तो माझा चांगला भाऊ आहे आणि आमच्यात एक विशेष बंधन आहे. आम्हीही इतर भावा-बहिणींप्रमाणेच भांडायचो. पण त्याहून अधिक आमच्या आठवणी या मस्त रमणीय आहेत. दत्तक घेणारे पालक बऱ्याचदा अपंगत्व असणाऱ्या मुलांना दत्तक घेणं टाळतात. कारण त्याच्या आजारपणाने मुलं हिरावली गेल्यास त्याच्याबरोबर निर्माण झालेले भावनिक बंध त्यांना त्रासदायक ठरतील. भीती ही एकमेव भावना आहे, ज्यामुळे आपण आपल्याला आनंदी बनवणारे निर्णय घेणं टाळतो.

मी स्वत:ला नशीबवान समजते कारण माझे नातेवाईक सुद्धा खूप छान आहेत. माझे वडील हे शांत स्वभावाचे आहेत पण त्यांची विनोदबुद्धी मात्र अफलातून आहे. आजही जेव्हा मी आणि माझा भाऊ त्यांना भेटायला घरी जातो तेंव्हा खाण्याच्या पदार्थांनी डबे भरले असतील, याची खातरजमा तेच करून ठेवतात. आमचे खूप लाड होतात तेंव्हा. आमच्या अन्य नातेवाईकांसोबत सुद्धा आमचे चांगले संबंध आहे. म्हणजे आजी आजोबा, काका, मामा, मावश्या आणि सगळे भावंडं या सर्वांसोबत आमची गट्टी आहे. मी माझ्या मित्र मैत्रीणीना आणि सहकाऱ्यांना सुद्धा मी दत्तक असल्याचं सांगितलं आहे.  मला स्वत:ला दत्तक असण्याचा त्रास कधीच झाला नाही, पण अनेकांना तो झाला आहे. माझ्या आईचं काम हे बालकल्याण संस्थांमध्ये होतं.  या संस्थांमध्ये दत्तक मुल आणि त्यांच्या पालकांशी संवाद होत असे. ती मला या मुलांशी संवाद घडवून आणत असे. अशीच एक मुलगी होती  जिला वयात आल्यावर तिच्या पालकांनी सांगितलं की, तिला दत्तक घेतलं आहे आणि ही बाब तिला खूप टोचत होती. मी या मुलीशी अनेकदा संवाद साधला आणि मला असं वाटत की मी तिला या परिस्थितीशी जुळवून घ्यायला नक्कीच थोडीफार मदत केली.

आज माझं लग्न झालेलं आहे आणि मला स्वत:ची दोन मुलं आहेत. माझ्या आईनेच माझ्या मुलांना मला दत्तक घेतल्याचं सांगितलं. त्यांच्यासाठी ही बाब नगण्य आहे कारण आजी आजोबांचं भरपूर प्रेम त्यांना मिळतंय. खर तर माझ्या पहिल्या अपत्यावेळी माझ्या आईने सगळे रोमांचक क्षण आणि ताण सुद्धा अनुभवले जणू काही तीच पुन्हा आई होणार होती ! माझी सासरकडची मंडळी सुद्धा खूप समजूतदार आहेत आणि आमच्या या मोठ्या परिवारासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते. माझा भाऊ आणि वाहिनी ऑस्ट्रेलियामध्ये राहतात पण हे अंतर आमच्या प्रेमात कधीच आलं नाही.

मी थोडी मोठी झाले तेंव्हा माझ्या आईने मला मैसुरमधल्या अनाथाश्रमात नेलं, जिथून मला दत्तक घेण्यात आलं होतं. तिनं मला सांगितलं की, मला जन्म देणारी आई शोधायची असली तरी तिची हरकत नव्हती. पण मला स्वत:लाच यात काही रस नव्हता किंवा माझ्या भावाला सुद्धा ! आमच्यासाठी आमचे आई वडील हे आम्ही आमचं भाग्य समजतो.  माझ्या आईशी मी दररोज ५ते ६ वेळा दूरध्वनीवरून बोलते.  त्यांच्याशी बोलल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.

जे पालक मुलं दत्तक घेऊ इच्छितात त्यांना मी एक सल्ला देऊ इच्छिते. तो म्हणजे, "आपल्या पाल्यांशी खुलेपणाने संवाद साधा. त्यांना योग्य वेळी त्यांची गोष्ट सांगा मुलं ज्या काही शंका विचारेल त्याची योग्य उत्तरे द्या".

दत्तक घेण्याचा निर्णय नातेवाईकांपासून किंवा मित्रपरिवारापासून लपवू नका. एखाद्या व्यक्तीने नकारात्मक सल्ला दिला किंवा मुलाच्या जन्माविषयी शंका उपस्थित केली तर त्यांना वेळीच टोका आणि ही वर्तणूक खपवून घेतली जाणार नाही, हे निक्षून सांगा. कायद्याने दत्तक प्रक्रिया ही लालफितीत अडकलेली नाही आणि भारतात तर आता अतिशय पारदर्शी आणि केंद्रीय अशी पध्दती विकसित झाली आहे.

मी हे एक पद्यातील चरण वाचलं होतं आणि मला वाटतं की हे सर्वच पालकांना लागू होते, मग दत्तक घेतलेल्या मुलांचे असोत वा स्वत:ची मुलं असलेले पालक असो.

आजपासून बरोबर शंभर वर्षांनी ,

हे महत्त्वाचं नसेल की मी कोणती कार चालवत होतो,

मी कोणत्या घरात राहत होतो,

माझ्या बँकेत किती पैसे होते,

किंवा माझे कपडे कसे होते,

पण जग मात्र अधिक सुंदर असेल,

कारण मी एखाद्या मुलाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा घटक होतो.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

हेही वाचा :

अनाथ मुलींचे माहेरघर ठरले ‘परिवर्तन कुटूंब’

व्हीलचेअरवर बसून एका सैनिकी अधिकाऱ्याने पेलले ५०० मुलांचे भविष्य

पत्नीच्या सोबतीशिवाय बनले, ३०० विवश आणि गरीबांचे आश्रयदाता
लेखिका - आरती विनील

अनुवाद - प्रेरणा भराडे