मानसिक आरोग्याबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी 'युवर दोस्त' प्रयत्नशील

0

"मी जेव्हा गुवाहाटी येथे इंडियन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेत शिकत होते, त्यावेळी वसतीगृहात माझ्या खोलीत राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीने आत्महत्या केली. नोकरी मिळेल की नाही याच्या सतत तणावाखाली ती होती. पण हे आधी कळलं असतं तर ते टाळता आलं असतं. आमच्या महाविद्यालयात समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञ होते आणि कधीतरी एखादा विद्यार्थी त्यांच्याकडे जायचा". युवर दोस्त या गटाची संस्थापक रिचा सिंघ हे सांगत होती.

रीचाने जेव्हां या समस्ये संदर्भात काम सुरु केलं तेव्हा तिला असं जाणवलं की, तिच्याबरोबरच्या अनेकांना नोकरीचा तणाव आणि नातेसंबंधांमध्ये समस्या आहेत. पण सामाजिक बंधनांमुळे त्यांच्या समस्यांवर बोलायला कोणी तयार नाही.


एकत्र होऊ

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात एकमेकांना संपर्क साधणं फार सोपं झालं आहे. तरीही आपण एकटे आहोत, असं रिचाचं मत आहे. यामुळेच रिचा आणि तिच्या काही मित्र मैत्रिणीनी एकत्र येउन मानसिक स्वास्थ्यासाठी एक गट सुरु केला. या माध्यमातून मानसोपचार तज्ञ समुपदेशक किंवा इतर तज्ञ यांची मदत घेणं सहज शक्य होईल.

रिचा आणि पुनीत मनुजा यांनी एकत्र येउन यावर चर्चा केली. तसंच यातून काही नवीन उद्योग धंदा सुरु करता येईल का याचाही त्यांनी विचार केला. परंतु दोघांचाही मनोविज्ञान किंवा सायकोलॉजी हा अभ्यासाचा विषय नसल्याने सुरवातीला थोडा अवघड गेलं. पण नंतर दोघांनीही मानसोपचार तज्ज्ञांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याशी बोलून ते माहिती घेऊ लागले आणि या माहितीच्या आधारावर महत्वाचे मुद्दे नोंद करून ठेवत होते तसंच त्यांनी ब्लॉग लिहिण्यासही सुरवात केली.

या सगळ्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी रिचाचा मित्र सत्यजीत याने मदत केली. पण तो अमेरिकेत राहायला नसल्याने काही आव्हानं होती. म्हणून रिचा ही प्रखर वर्मा यांना भेटली ज्याने सी टी ओ म्हणून कामाला सुरवात केली. रिचा सांगते, " आम्ही दोघं कोस्टा कॅफे मध्ये बसलो होतो आणि अजून कशातही काही नसतांना त्याने एकही मिनिट विचार न करता आमचं काम करण्यास मान्यता दिली.

या प्रकल्पाचे महत्वाचे पैलू

विशेषतज्ञ खालील समस्यांवर मार्गदर्शन

१) उत्तम नातेसंबंध जपण्यासाठी.

२) काम आणि आयुष्य या गोष्टी समाधानकारक आणि लाभदायक होण्यासाठी.

३) ध्येय्यपूर्तीसाठी, योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी.

४) आत्मविश्वास वाढवण्यासाठी

५) वैयक्तिक, सामाजिक तसंच इतर तणाव शांतपणे हाताळता यावेत यासाठी मार्गदर्शन.

युवर दोस्त या गटाकडे तुम्ही तातडीने आणि इंटरनेटच्या माध्यमातूनही मदत किंवा सल्ला घेऊ शकता. याठिकाणी ७५ हून अधिक तज्ज्ञ मदतीसाठी उपलब्ध आहेत. या गटाचं महत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे सल्ला किंवा मदत मागणाऱ्या कोणाचंही नांव गोपनीय ठेवलं जातं.

आपल्या देशात मानसिक उपचार घेणं याकडे नकारात्मक दृष्टीने बघितलं जातं. मदत घेणाऱ्याची ही भीती दूर करण्यासाठी आणि गरजूंना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तातडीने सल्ला मिळावा, यासाठी ही गोपनीयता ठेवली जाते असंही रीचाने सांगितलं.

मनोरुग्ण पण वेड लागलेलं नाही :

रिच पुढे म्हणाली, " मनोरुग्ण असलेली व्यक्ती ही वेडीच आणि मूर्ख असते असा गैरसमज समाजात आहे. त्यामुळे मानसोपचार घेणं म्हणजे काहीतरी भयंकर गोष्ट करण्यासारखं मानलं जातं. एखादी व्यक्ती सल्ला किंवा मदत घेते कारण ती कमकुवत असते. बरेचदा आपण आपल्या समस्या कोणापुढे मांडत नाही कारण आपली कमतरता मान्य करण्यास आपण तयार नसतो."

या कमतरता भरून काढण्यासाठी इंटरनेट हे एक उपयुक्त माध्यम आहे. यामध्ये त्वरित मदतही मिळते आणि संबंधित व्यक्तीचं नावंही गुप्त ठेवलं जातं.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत, आणि त्या सोडवणं हे एक मोठं आव्हान आहे. समुपदेशन केल्यामुळे संबंधित व्यक्तीची निर्णय क्षमता वाढते, जे फक्त औषधं देऊन किंवा फक्त सल्ला देऊन साध्य होत नाही.

"प्रसिद्ध व्यक्तींपासून ते गुंतवणूकदार हे ज्या पद्धतीने मानसिक आरोग्याला महत्त्वं देत आहेत. ते लक्षात घेता, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आम्ही योग्य मार्गावर आहोत." असं रिचा सांगते.

दिवसेंदिवस वाढणारी संख्या

डिसेंबर २०१४ मध्ये हा मदत गट सुरु केल्यांनतर या गटाचे ७० हजार सदस्य झाले आणि हि संख्या दर महिन्याला ४० टक्क्यांनी वाढत आहे. सध्या १० हजार नोंदणीकृत सदस्य असून, ७५ तज्ञ रोजच्या रोज सुमारे ३०० जणांना मार्गदर्शन करतात.

"सुरवातीच्या काळात अगदी छोट्या प्रमाणात सुरु केलेल्या कामाचा पसारा आता वाढला आहे. सध्या आमच्या कामाची उलाढाल चार लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे अडीच कोटी रुपये इतकी झाली आहे. ही एक वैशिष्ठपूर्ण कल्पना असल्याने, (रेड बस चे संस्थापक) फणींद्र समा, (टेक्सी फोर शुअर चे संस्थापक) अपरामेय राधाकृष्ण, (कॅपिलरी चे संस्थापक) अनिश रेड्डी तसंच अनेक अनुभवी गुंतवणूकदार म्हणजेच संजय आनंदराम (सिड्फंड) वेंक कृष्णन (नु वेंचर) इत्यादी उद्योजक सध्या आमचे गुंतवणूकदार आहेत." अशी माहिती रीचाने दिली.

मानसिक आरोग्य हा विषय नवीन असून तो आता मुख्य प्रवाहात येत आहे. सध्या युवर दोस्त वैयक्तिक स्वरुपाची मदत पुरवत आहे. पण लवकरच कॉर्पोरेट क्षेत्रात सल्ला मार्गदर्शन करण्याचाही विचार आहे.

भारतीय बाजारपेठेत उतरून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करण्याच त्याचं नियोजन आहे. एकाच ठिकाणी आरोग्याच्या सगळ्या सुविधा उपलब्ध असाव्यात असं त्यांना वाटतं, मग त्या व्यावसायिक, वैयक्तिक किंवा शैक्षणिक समस्या असोत, या सगळ्यावर एकाच ठिकाणी मदत पुरवण्याचा त्यांचा विचार आहे. " आम्हाला निधी उपलब्ध झाल्यास भारतात सगळीकडे तातडीने सेवा पुरवणं आम्हाला सहज शक्य होणार आहे. " असं रिचा सांगते.

आकडेवारी काय सांगते

जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार भारतात मानसिक तणावात असलेल्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. आरोग्य संघटनेनं २०१० मध्ये गेलेल्या मानसिक आरोग्याच्या पाहणी नुसार आत्महत्या मुळे झालेले मृत्यू हे तिसरे कारण आहे आणि यामुळे १५ ते ३५ वर्ष वयोगटातील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात होणाऱ्या एकूण आत्महत्यापैकी ३२ टक्के आत्महत्या या भारतात होतात.

आज मानसिक आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी अनेक संस्था संघटना प्रयत्न करत आहेत. व्हाईट स्वान फांऊन्डेशन, लिव्ह लव्ह फांऊन्डेशन, हेल्थ एमिन्द्स यांच्यासह अनेक संस्था मानसिक आरोग्याबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.


लेखक : सिंधू कश्यप

अनुवाद : श्रद्धा वार्डे