भागीदारी व्यवसायात आणि नात्यातही पक्क्या मैत्रिणी, अपर्णा आणि केतकी घडवतायत त्यांची स्वत:ची यशाची कहाणी

भागीदारी व्यवसायात आणि नात्यातही पक्क्या मैत्रिणी, अपर्णा आणि केतकी घडवतायत त्यांची स्वत:ची यशाची कहाणी

Wednesday January 27, 2016,

6 min Read

अपर्णा फडके आणि केतकी अन्नछत्रे एकमेकींच्या नात्यातल्या. स्वत:चा व्यवसाय असावा हे या दोघींचही स्वप्न. पण अनेक भारतीय महिलांप्रमाणेच घर आणि मुले सांभाळण्याच्या कसरतीत ते स्वप्न मागे पडलं. मुलं थोडी मोठी झाल्यावर मात्र या दोघींनी आपल्या या स्वप्नांना भरारी देण्याचं ठरवलं. आधी काय करायचं हे ठरवण्यासाठी आणि कमीत कमी पैशात व्यवसाय कसा सुरु करायचा याचं पूर्ण नियोजन त्यांनी केलं. " आम्ही नवीन असल्याने अगदी कमी गुंतवणूक करून व्यवसायाची नांदी करायचं ठरवलं. कारण आम्हाला धोका पत्करायचा नव्हता, अपर्णा सांगत होत्या. केतकीची फॅशनमधली आवड आणि अपर्णाचा डिझाईनमध्ये असणारा छंद यामुळे त्यांनी अर्थात फॅशन आणि लाईफस्टाइल या उद्यमात उडी घ्यायचं ठरवलं . २०१३ साली त्यांनी आपल्या चाणक्य लाईफस्टाइल आणि रिटेल या दुकानाची नोंदणी करून घेतली. ज्यामध्ये आता नामांकीत ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत ते म्हणजे मोडो विवेंडी आणि इंडो मूड!

image


मोडो विवेंडी : शिरपेचातले पीस :

सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेत या दोघींनी बाहेरून एखादं उत्पादन आणायचं ठरवलं. जे लोकांना हमखास आवडेल. म्हणून मग त्यांनी युरोपियन बाजारपेठेत अत्यंत आवडीचं असलेले उत्पादन भारतात आणलं. मोडो विवेंडी ब्रांड या नावानं त्यांनी या टोप्या विकल्या. त्याच्या पहिल्या वहिल्या फळीतल्या सगळ्या टोप्या विकल्या गेल्या. आज याच सदराखाली त्या २५० विविध उत्पादनं विकतात, ज्यामध्ये हातमोजे, शाली, स्कर्ट्स, पर्सेस, हॅण्ड्बॅग्स, जॅकेट्स, टॉप्स आणि कोट्स अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.

आठ महिन्यातल्या त्यांच्या व्यवसायातल्या प्रवासात त्यांनी भारतीय पारंपारीक कपड्यांची गाथा मांडायचं ठरवलं. यावेळी त्यांनी स्वत: कलाकुसर केलेल्या साड्या ठेवायच्या ठरवलं. त्यांचं हे नवे सदर इंडो मूड! यात आता दुपट्टे सुद्धा मिळतात . त्याचबरोबर स्टोल्स, कुर्तीस, आणि ड्रेस मटेरियलसुद्धा उपलब्ध आहेत.

image


अपर्णा सांगतात," पन्नास हजारांच्या आर्थिक गुंतवणुकीवर आम्ही आमचं उद्योजिका व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झेप घेतली. आज आमच्या ब्रांडची आर्थिक गुंतवणूक तीस लाखांच्या वर आहे आणि दरवर्षी हे उत्पन्न वाढत जाता आहे." ५० चौरस फुटांच्या जागेत सुरु केलेल्या त्यांच्या कामाचा डोलारा आता १० पटीने मोठ्या जागेत हलवण्यात आलाय .

आज त्यांनी चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केलीय. जे त्यांच्या वेबसाईटच्या तांत्रिक बाबीं , मागणी पुरवठा आणि वाहतूक आदी बाबी काटेकोरपणे बघतात. अपर्णा म्हणतात, " आमचा व्यवसाय जरी छोटासा असला आणि आजच्या जमान्यात कर्मचारी वर्गाला धरून ठेवणं, हे कठीण काम असलं तरी आम्ही या बाबतीत सुदैवी आहोत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना मित्रत्वाच्या नात्याने वागवतो. आम्ही एक छोटा आणि अगदी घट्ट बांधलेला संघ आहोत ."

कामाच्या ठिकाणचा दिवस

डिझाईन प्रक्रियेत अपर्णा आणि केतकी या दोघींचाही सहभाग असतो. एकदा का डिझाईन नक्की झालं आणि वस्त्र निवडण्यात आल की या दोघी उत्पादनाची संख्या ठरवतात आणि शिंप्यांना त्याप्रमाणे काम देतात . प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता चाचणी होते. सध्या त्यांच्याकडे १० शिंपी आहेत आणि प्रत्येकाला त्यांच्या कौशल्यानुसार त्या काम देतात .

image


मोडो विवेंडी आणि इंडो मूड या दोन्हीचा आपला ग्राहक वर्ग आहे. भारतातील विविध ठिकाणाहून लोक ही उत्पादनं मागवतात. तर अनिवासी भारतीय आणि परदेशस्थ ग्राहकांनाही ही उत्पादनं आवडू लागली आहेत. विशेषत: हाताने विणलेली भारतीय वस्त्रं, त्याचंही उत्पादन ई-बे, त्यांच्या स्वत:च्या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. ई-बेनं केतकी आणि अपर्णा यांच्यातील कौशल्य ओळखत त्यांच्या ,"शी मिन्स बिझनेस " या महिला उद्योजकांसाठी असणाऱ्या स्पर्धेतल्या एक मानकरी म्हणून निवड केली होती .

केतकी आणि अपर्णा यांचं उद्दिष्ट्य म्हणजे घरगुती उत्पादनांचा व्यवसाय वाढवणे. त्यांनी सुरुवात तर कपड्यांपासून केली पण हळूहळू त्यांच्याकडे आता वैयक्तिक स्वच्छतेची उत्पादनं सुद्धा मिळू लागली आहेत. ज्यात साबण, शाम्पू ,प्रसाधनं आदींचा समावेश आहे. तर पुरुषांसाठी वस्त्र प्रावरणाचा विभाग वेगळा सुरु करण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील आहेत. " आम्ही आमच्या ग्राहकांना उत्तम गुणवत्ता देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत" केतकी आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेविषयी सांगत होत्या .

चाणक्य का ?

केतकीचे पती (अपर्णाचा भाऊ ) हे एक ब्रांड्रींग एक्स्पर्ट अहेत. त्यांनी हे नाव सुचवलं. मोडो विवेंडी म्हणजे, लॅटिन भाषेत जगण्याची तऱ्हा आणि इंडो मूड म्हणजे , पारंपारिक वस्त्राला दिलेल रूप.

चाणक्य ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. चाणक्य हा व्यवहार कुशल होता आणि अर्थशास्त्र व राजकारणात त्याचा व्यासंग दांडगा होता. भारतीय अर्थशास्त्रातील नितीमुल्य आणि नियम यांचा त्यांनी आदर्श परीपाठ घालून ठेवला आहे. त्यांची 'चाणक्य नीती' हा पाठ आपल्याला आजही समाजाप्रती असणाऱ्या आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो. मग व्यवसाय कोणताही असो .

image


आणि म्हणूनच अपर्णा आणि केतकी यांनी सी एस आर म्हणजेच कोर्पोरेट सोशल रेस्पोन्सिबिलिटी यावर सतत भर ठेवला आहे. " आमची जबाबदारी म्हणूनच गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका गावात आम्ही १०० रेन कोट्स आणि वह्यांचं वाटप केल . जेंव्हा या मुलांनी आम्हाला पत्र लिहून कळवलं की , या रेनकोट मुळे शाळेत जायला आम्हाला खूप मदत झाली, आम्ही शाळेचा दिवस चुकवला नाही तेव्हा खूप समाधान वाटलं ." अपर्णा सांगत होत्या.

चढता आलेख :

त्यांच्या विक्रीचा आलेख चढता आहे. तब्बल ९०% नी त्यांची विक्री वर्षभरात वाढली आहे आणि या चढत्या आलेखामुळेच त्यांना नवनवीन गोष्टी विक्रीमध्ये आणण्याची उर्जा मिळत राहते. अपर्णा त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी सांगत होत्या, “पहिली ऑर्डर आम्हाला आली ती एका आठवड्याच्या आत आणि दुसरी यायला मात्र २० दिवसांचा कालावधी जावा लागला. पण याने खचून न जाता त्यांनी आपली विपणन पद्धतीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. ज्यामध्ये छोट्या छोट्या कार्यक्रमांना स्पॉन्सरशिप देणं, ज्या ग्राहकांनी त्यांची उत्पादनं परिधान करून, त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकले त्या ग्राहकांना विशेष सवलत देणं”. त्यांच्या ब्रांडचं नाव लोकप्रिय करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. आज ते दिवसाला तब्बल १५ ऑर्डर्स पूर्ण करतात. आता हेच ध्येय त्यांनी ५० ऑर्डर्स असं ठरवलं आहे .

त्यांची पार्श्वभूमी

केतकी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या आहेत. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आणि सध्या त्या ई -कॉमर्स या विषयात एमबीए करत आहेत . " येत्या ४ ते ५ महिन्यात, माझा एमबीएचा कोर्स पूर्ण होईल आणि मग माझ्याकडे ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्हीमध्ये काम करण्याची गुणवत्ता असेल.

दुसरीकडे अपर्णा या पुण्याच्या राहणाऱ्या आहेत. पुणे विद्यापिठातून त्यांनी आर्किटेक्चरची पदवी मिळवली. त्यांनी काही वर्ष इंटेरियर डिजायनर म्हणून काम केलं. मुंबई ,पुण्यात अनेक ठिकाणी अनेक व्यापारी आणि गृह संकुलात त्यांच्या कामाची छाप पाहायला मिळते. डिजायनिंग आणि सौंदर्य या त्यांच्या प्रमुख आवडी आहेत. म्हणूनच प्रत्येक वस्त्र प्रावरणाला अपर्णा यांचा परिस स्पर्श लाभतो. महिला उद्योजकांना गंभीरतेनं घेण्याची गरज आहे असं त्यांना वाटतं ," मला स्वत:ला असं वाटतं की महिला या काही बाबतीत अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध असतात. त्या घरही सांभाळतात आणि बाहेरील कामंही ! मल्टिटास्कींग हे महिलांचं कौशल्य आहे . " त्या म्हणतात .

परिवार आणि पाठबळ

केतकी यांना व्यवसाय करायचाच होता आणि त्यांचा कल हा फॅशन उद्यमाकडे होता. त्या अगदी आनंदाने आपली कहाणी सांगत होत्या. " आज मी माझं स्वप्न जगतेय ." त्यांच्या संपूर्ण परिवारानं त्यांना खूप सहकार्य केलं. अपर्णा सुद्धा स्वत:ला नशीबवान समजतात. त्या म्हणतात ,"माझ्या सासरीसुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून सर्वांचं सहकार्य मला लाभलं. माझ्या कामात सुध्दा त्यांची मदत होते. अनेकदा घराच्या जबाबदारी मी त्यांच्यावर टाकून बाहेर काम सांभाळते. कुटुंबाचं सहकार्य लाभलं तरच आपण उत्तुंग यशाची पायरी गाठू शकतो."

अपर्णा आणि केतकी या दोघींनाही कामानिमित्त बाहेर जावं लागत, अपर्णाला केतकीपेक्षा अधिक प्रवास करावा लागतो. अपर्णाकडे 'इंडो मूड ' साठी कच्चा माल आणावा लागतो. केतकीवर 'मोडो विवेन्डीची जबादारी आहे . अपर्णाच्या प्रवासानं तिला बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड, आंध्र प्रदेश कर्नाटकासारख्या राज्यांमधील गावागावात नेलं आहे . या ठिकाणाहून ती कापड नेते.

त्या दोघी एकमेकींच्या कामात हस्तक्षेप करणे टाळतात आणि एकमेकींच्या निर्णयाचं स्वागत करतात अंतिम निर्णय मात्र दोघींच्या सामंजस्याने होतो. त्या एकत्र प्रवास कधीच करत नाहीत. एक प्रवास करत असेल तर दुसरी दैनंदिन कामाकडे लक्ष देते. त्यांच्या सुट्ट्याही तशाच आखलेल्या असतात.

हस्तकामाला प्राधान्य :

आज अनेक विणकाम कामगार आणि पारंपारिक हातमागावरील कापड पुरवण्याचा व्यवसाय ग्राहकांअभावी अखेरच्या घटका मोजत आहे. सरकारनं या उद्यमाला जीवनदान देण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. पण हा व्यवसाय वाचवण्यासाठी खरंतर पारंपारिक वस्त्रोद्योगाचा व्यवसाय करण्यासाठी अनेकांनी पुढे यायला हवं. इंडो मूड लोकांना आवडतं कारण हातमागावरील सिल्क, लिनेन आणि सेंद्रिय कॉटन या कापडांमध्ये कोणतंही रसायन मिश्रित नसतं .

भविष्यातील योजना :

अपर्णा आणि केतकी आता लवकरच त्याचं दुसरं स्वप्न पूर्ण होताना पाहतील. पुण्यामध्ये त्याचं स्वत:चं वस्त्रांचं एक दालन उभारणं, कारण त्यांना याची जाणीव आहे की अनेकजण आजही कपडे परिधान करून समाधान झाल्याशिवाय ते विकत घेत नाहीत. पुण्यातला हा प्रकल्प यशस्वी ठरल्यावर इंडो मूड चा विस्तार त्यांना फ्रांचाईसी स्वरुपात अन्यत्र करायचा आहे .

लेखिका : शरिका नायर

अनुवाद : प्रेरणा भराडे