बाल कलाकार ते यशस्वी बिजनेसमन.. अभिनव बॅनर्जी यांचा प्रेरणादायी प्रवास

0

मानवी जीवन कधीच सरळ रेषेतलं नसतं. जे आपल्याला हवं ते अगदी सहज मिळेल असं होत नाही. उतारचढाव मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यामुळेच जीवनाला मजा ही येते आणि अर्थही प्राप्त होतो. हे उतारचढाव असतील तर आपला जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो. आपल्याला जे हवंय ते साध्य करण्यासाठी आपण जोमाने कामाला लागतो. हा संघर्ष तुमच्यात जास्तीत जास्त सकारात्मकता भाव निर्माण करतो. स्वप्न प्रत्येकजण पाहतो, पण काही कारणास्तव ती पूर्ण नाही झाली तर त्यातून नवी उमेद घेत नवा मार्ग निवडण्याचा आत्मविश्वासही हेच प्रयत्न आपल्याला देतात. मुंबईच्या अभिनव किर्तीकुमार बर्मन यांच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरलंय.

गर्दीनं भरलेल्या मुंबई शहरातल्या उत्तरेला अभिनव रहायचे. घरी परिस्थिती बेताची. पण आईची एक इच्छा होती आपल्या मुलानं अभिनेता व्हावं. मोठ्या पडद्यावर चमकावं. मग वयाच्या पाच वर्षांपासून अभिनव यांच्या ऑडीशनला सुरुवात झाली. एका वर्षाभराच्या संघर्षानंतर एका सिनेमात कामही मिळालं. सिनेमाचं नाव होतं, सन्मान. सिनेमाचं शुटींग तर झालं. तो तयार झाला पण रिलीज झाला नाही. मोठ्या पडद्यावर स्वत:ला पाहण्याचं त्याचं आणि त्यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पण ते निराश झाले नाहीत. आपले प्रयत्न करत राहिले. नवीन काम मिळालं सिरीयल्सच्या डबींगच. दहा-बारा वर्षांचे असताना त्यांनी डब होणाऱ्या सिनेमांसाठी लहानमुलांसाठीचा आवाज दिला. मालगुडी डेज या गाजलेल्या मालिकांमधल्या लहानमुलांचे आवाज अभिनव यांनी दिलेत. डबींग हे काही आपलं करीयर नाही हे त्यांना माहित होतं. म्हणून मग शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय़ त्यांनी घेतला.

घरची परिस्थिती आणखी बिघडत चालली होती. त्यामुळं हातात काम असणं गरजेचं होतं. एका हाऊस किपींग कंपनीत महिना दोन हजार रुपये पगारावर नोकरी करायला सुरुवात केली. सोबत कॉलेज सुरु होतंच. त्या दिवसांमध्ये या नोकरीनं फार मदत केली. अभिनव सांगतात “ ते दिवस फार संघर्षाचे होते. हातात पैसे नाहीत त्यामुळं १० -१५ तास काम करणं भाग होतं. शिक्षणही सुरु होतं. त्यामुळं सकाळचं कॉलेज आणि रात्री उशीरापर्यंत काम असं सुरु होतं. पण हे असं काही जास्त दिवस खेचत राहणं शक्य नव्हतं.”

हाऊस किपींग कंपनीला अनुभव हाती होता. काही ओळखीही झाल्या होत्या. त्यामुळं आपण आपली स्वत:ची कंपनी सुरु का नाही करु शकत असं त्याला वाटलं. त्यांनी स्वत:ची कंपनी सुरु केली. ब्राइटन फॅसिलिटी इंडिया मेन्टेनेन्स सर्विस. अगोदरच्या कंपनीतले काही मित्र मदतीला आले. हळू-हळू जम बसत होता. गेल्या १७ वर्षात या कंपनीनं मुंबईतल्या हाऊस किपींग क्षेत्रात आपलं नाव कमावलंय. शेकडो बेरोजगार हातांना काम दिलंय. मुंबईतल्या नामांकित कंपन्यांमध्ये अभिनव यांची कंपनी हाऊस किपींगसाठी कामगार पुरवतात. ते सांगतात “ हा व्यवसाय विश्वासाच्या जोरावर चालतो. त्या कंपनीचा तुमच्यावर विश्वास असायला हवा. तरंच हे शक्य आहे. आम्ही जी माणसं कामाला ठेवतो त्यांना अगदी पारखुन घेतो. जो जास्त गरजू आहे त्याला आमच्या कंपनीत प्राधान्यानं काम मिळतं.” अभिनवच्या कंपनीनं एक शाळाही सुरु केलीय. ही शाळा पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त प्रात्यक्षिकावर भर देते.

कंपनीचा व्याप वाढत असताना अभिनव यांनी आणखी एक गोष्ट केली. ती म्हणजे ते हस्ताक्षर एक्सपर्ट झाले. शिवाय त्यांनी फेस रिडींगचा कोर्सही केला. आता या दोन्ही क्षेत्रात त्याचं नाव होतंय. ते हॅण्ड रायटींग एक्सपर्ट एन.एल.पी प्रॅक्टीशनर्स यु.एस सर्टिफाइड लाइसेंस होल्डर आहेत. ही त्यांची आवड आहे. अभिनव म्हणतात, “आतापर्यंत जी मजल मारलेय ती माझ्या कुटुंबाच्या मदत आणि प्रोत्साहनाशिवाय शक्य नव्हतं. यापुढे आमच्या कंपनीला देशातली सर्वोत्तम कंपनी बनवण्याची माझी इच्छा आहे. आणि ते होणारच.”