पूनम: अपंगांचं आयुष्य घडवणारी ‘आई’

स्वत:च्या पोटी अपंग मूल जन्माला आलं म्हणून निराश न होता आयुष्याशी दोन हात करत झगडणारी आई म्हणजे पूनम नटराजन. आपल्या मुलाला स्वत: खपून शिक्षण दिल्यानंतर पूनम सर्व अपंग मुलांची आई झाल्या. त्यांच्या असामान्य मायेची ही कहाणी.

0

भारतात सुमारे दोन कोटीपेक्षा अधिक लोक कोणत्या ना कोणत्या अपंगत्वानं ग्रस्त आहेत. ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के इतकी आहे. याबाबतच्या आकडेवारीनुसार अपंगांमध्ये महिलांपेक्षा पुरूषांचं प्रमाण जास्त आढळतं.

आपल्या देशात मुख्यत्वे पाच प्रकारच्या अपंगत्वाची प्रकरणं समोर आली आहेत. भारतात दृष्टीसंबंधातल्या असमर्थ असलेल्या अपंग लोकांचं प्रमाण सर्वात जास्त आहे हे या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं. एकूण अपंगांमध्ये दृष्टीदोष असेल्यांची संख्या ४८.५ टक्के इतकी आहे. यानंतर पायाशी संबंधित अपंगांची एकूण २७.९ टक्के इतकी प्रकरणं समोर आली आहेत. याबरोबर मनोरूग्ण( १०.३ टक्के), मुके ( ७.५ टक्के), आणि बहिरे ( ५.८ टक्के), अशी प्रकरणं दिसून आली.

अपंगांची आई पूनम नटराजन
अपंगांची आई पूनम नटराजन

अपंगत्वाची स्थिती किती गंभीर आहे हे दाखवण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. परंतु, अपंगांच्या समस्या आणि अडचणींचा अंदाज मात्र या आकड्यांनी येणार नाही. अपंगांच्या स्थितीबाबत जाणून घेण्याच्या उद्देशानं आम्ही राष्ट्रीय ट्रस्टच्या अध्यक्षा पूनम नटराजन यांच्याशी बातचित केली. त्याच्याशी केलेल्या वार्तालापामुळं आम्हाला त्यांची ट्रस्ट आणि त्याच्या कार्याबाबत बरीच माहिती मिळू शकली. राष्ट्रीय ट्रस्ट ही केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी एक घटनात्मक संस्था आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश अपंग आणि विशेष आवश्यकता असणा-या लोकांसाठी काम करणे हा आहे.

आपल्या आयुष्यात येणा-या प्रत्येक समस्येला पूनम संधीच्या रूपात बदलून टाकतात. आणि हीच गोष्ट त्या इतरांपासून वेगळ्या असल्याचं अधोरेखित करते. ३० वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या अपंग मुलाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारे हिंमतीनं आपलं वेगळेपण सिद्ध केलं. आपल्या मुलाच्या जन्मानंतर ज्या ज्या समस्य़ा पुढे आल्या त्या सर्व समस्यांना त्यांनी चिकाटीनं तोंड दिलं. हा संघर्ष करत असताना मुलाच्या अपंगत्वामुळं हताश होत त्यांनी कधीही हार मानली नाही.

पूनम सांगतात, “ माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी मी विद्यापीठात संशोधन करत होते. आम्ही तुमच्या मुलाच्या अपंगत्वाच्या प्रकरणात काहीही करू शकणार नाही असं म्हणत डॉक्टरांनी हात वर केले. मी तेव्हाच ठरवलं की या डॉक्टरांना आपण चुकीचं सिद्ध करून दाखवू. त्यासाठी मी माझ्या मुलाचं अपंगत्व डोळ्यासमोर ठेवून स्वत:ला त्या दृष्टीनं प्रशिक्षित केलं. मला हे काम मजेदार वाटलं. माझ्या मुलानं मला जुन्या विचारांच्या पुराणमतवादी समाजाला विसरून पुढं जाण्याची शिकवण दिली आणि माझा माझ्या जीवनाकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. शारीरिक असमर्थतता किंवा अपंगत्व आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून टाकतो आणि आपण एका उच्च हेतूबरोबर जीवनाला एका वेगळ्याच परिघात बघू लागतो.”

पूनम पुढे सांगतात, “ माझा मुलगा अपंग असल्यानं कोणत्याही शाळेत त्याला प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर मग मी स्वत:च एक प्रशिक्षण केंद्र सुरू करायचं असं ठरवलं. लोकांनी आपल्या मुलाचं अपंगत्व लपवून न ठेवता उघडपणे ते स्वीकारावं आणि लोकांसमोर मोकळेपणानं यावं यासाठी मी लोकांना माझं हे काम सुरू करण्यापूर्वी प्रेरित करायला सुरू केलं. या माझ्या प्रवासाच्या सुरूवातीलाच अपंगांसाठी काही करू इच्छित होते असे धाडसी लोक माझ्या सोबत आले. अशा लोकांच्या सहकार्यानं मग मी माझ्या चेन्नईतल्या घराच्या गॅरेजमध्ये या प्रशिक्षण केंद्राचा पाया रचला.” पूनमनी सुरू केलेल्या या केद्राचं नाव ‘विद्यासागर’ असं ठेवण्यात आलं. सध्या जवळजवळ ३५०० अपंग लोकांचं जीवन या केंद्रामुळं प्रगतीच्या दिशेन वाटचाल करत आहे.

पूनमनी सुरू केलेलं हे केंद्र लवकरच संपूर्ण चेन्नईमध्ये प्रसिद्ध झालं. नंतर पुढे शासनानं देखील त्यांच्या योग्यतेचा आणि क्षमतेचा गौरव केला. पूनम म्हणतात, “ तब्बल २३ वर्ष त्या केंद्राची संचालिका म्हणून काम पाहिल्यानंतर मी या कामाचा विस्तार करू पाहत होते. या केंद्राला मी रक्ताचं पाणी करून चालवत होते आणि आता या केंद्राची प्रगती होताना मला बघायचं होतं. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय ट्रस्टमध्ये एका स्वयंसेवी संस्था तज्ञाची जागा निघाली. मी जर ही जागा मिळवली तर इथून मी जास्तीत जास्त अपंगांची मदत करू शकते असं मला वाटलं. आपल्या देशातल्या लोकांचा अपंगांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल असं काहीतरी मी केलं पाहिजे आणि या ट्रस्टची अध्यक्षा या नात्यानं ही माझी जबाबदारी आहे. आपलं मूल हे अपंग असलं तरी ते कोणावर असलेला भार नाही आणि अपंगत्वावर मात करून ते देशाच्या प्रगतीत आपलं योगदान देऊ शकतं अशा प्रकारचा कायमस्वरूपी विश्वास मी अपंग मुलांच्या आईवडिलांमध्ये निर्माण करू इच्छिते. या दिशेनं त्यांच्या दृष्टीकोनात बदल घडवण्याचा मी प्रयत्न करते आहे.

पूनम पुढे सांगतात की त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास हा अतिशय आव्हानात्मक होता. परंतु आता त्यांच्या कामाचं कार्यक्षेत्रं आणखी वाढलय. हे काम करत असताना त्यांना त्यांच्यासारख्याच अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळते आहे आणि यामुळं त्याना हे काम अधिक उत्साहानं करणं शक्य होत आहे.

एक केंद्र चालवणं आणि शासकीय यंत्रणेत काम करणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शिवाय आपल्या स्वत:मध्ये तसा बदल घडवणं पूममसाठी सुद्धा इतकं सोपं नव्हतं. त्या सांगतात, “ शासकीय यंत्रणेत काम करण्याची एक वेगळी पद्धत असते. तुम्हाला तुमच्या कामाच्या परिघात सतत रहावं लागतं. परंतु माझ्यामध्ये काही तरी करून दाखवण्याचं एक झपाटलेपण होतं. याचं कारण म्हणजे मला हे लक्षात आलं होतं की अपंगत्वाबाबत आपल्या देशातल्या लोकांना काही माहितीच नव्हती. काही गरीब लोक आपल्या अपंग मुलांना रस्त्यावर बेवारस सोडून गायब झाल्याची अनेक प्रकरणं मी पाहिली आहेत. तसं हल्लीच्या काही वर्षांत याबाबतीत लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे आणि अपंगत्वाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनही बदलला आहे. परंतु आताही आपल्याला स्वत:ला बदलण्यासाठी आणखी २० वर्षांचा कालावधी लागणार आहे. प्रत्येक मोठं काम हे एका छोट्याशा पावलानंच सुरू होत असतं आणि अपंगत्वाबाबत लोकांची मानसिकता बदलण्याच्या दिशेनं काही तरी करणं मला शक्य होत आहे याचा मला आनंद आहे.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe