दिल्लीतल्या सम आणि विषम संख्येच्या ट्रॅफिक नियमाचा परिवहन सेवा फायदा घेण्याच्या तयारीत

दिल्लीतल्या सम आणि विषम संख्येच्या ट्रॅफिक नियमाचा परिवहन सेवा फायदा घेण्याच्या तयारीत

Saturday January 02, 2016,

3 min Read

गाडीचा क्रमांक सम आणि विषम असण्यावरुन त्यांचा रस्त्यावरुन जायचा दिवस ठरवणाऱ्या दिल्ली सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलं. डिझेल आणि दोन हजार सीसी पेक्षा अधिक क्षमता असणाऱ्या एसयुव्ही इंजिन असणाऱ्या वाहनांवरील या निर्बंधामुळे प्रवासीसेवा पुरवणाऱ्या स्टार्टअप्सकरता नविन मार्ग उघडला गेलाय.

ग्राफिक्स – गोकुल के

ग्राफिक्स – गोकुल के


दिल्लीत सम आणि विषम संख्येवरुन वाहन चालवण्याच्या निर्णयाची चाचणी करताना, कारपुलींग, सेल्फ-ड्राईव्ह आणि मागणीनुसार सेवा पुरवणारे लोक सर्व सज्ज झालेत. जानेवारी १ ते १५ दरम्यान खाजगी वाहनांना त्याच्या गाडीच्या नोंदणीक्रमांकाच्या अखेरच्या सम अथवा विषम आकड्यानुसार, सम अथवा विषम तारखेसच वाहन चालवता येणार आहे. राजधानीत वाढणाऱ्या प्रदुषणाच्या विळख्याला आळा घालण्याकरता हे पाऊल उचलण्यात येत आहे.

ट्रॅफिक प्रचंड असताना स्वतः गाडी चालवणं जास्त सुलभ आणि सोयीचं करण्याचा प्रयत्न करणारी ‘झूमकार्स‘ दिल्लीकरांकरता आता नवीन सेवा घेऊन सज्ज झालीय. कंपनी सम आणि विषम संख्येच्या या नियमाचा अभ्यास करुन त्यावर तोडगा काढत, रोजच्या प्रवासाकरता लोकांना कार भाड्याने घेण्याकरता प्रोत्साहन देत आहे.

कॉरपोरेटस् आणि कार्यालयीन प्रवाशांकरता 'झुम कम्युट' या विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ज्यात परवडणाऱ्या किंमतीत आठवड्याचा प्रवास करता येणार आहे.

झुमकार चे सीइओ आणि सहसंस्थापक ग्रेग मॉरन सांगतात, “मालकीची गाडी घेण्यापेक्षा, बाहेरील गाडी वापरणं हे एक प्रकारे हरित पर्यायाला पूरक आहे. तसचं ती गाडी स्वतः चालवण्यामुळे गाडीची उपयुक्तता वाढते असं म्हणता येईल. स्वतःची गाडी केवळ खरचं गरज असताना रस्त्यावर आणल्यास रस्त्यावरील एकंदरीत वाहनांच्या संख्येवर आणि वर्दळीवर मर्यादा येईल. आमची टीम गाडीची काटेकोरपणे देखभाल करते. त्यामुळे ग्राहकांना गाडीची देखभाल आणि प्रदुषण याबाबत निश्चिंत राहता येतं. दिल्लीच्या वाढत्या ट्रॅफिक समस्येकरता आम्हांला हा एक योग्य पर्याय दिसत आहे”.

अशाप्रकारची सेवा देणारी आणखी एक कंपनी रेव्हचे सहसंस्थापक करण जैन यांना सम आणि विषम तारखांच्या बुकिंगमध्ये आणखी एक फायदा दिसतो, “स्वतः गाडी चालवणं, कारपूलींग आणि शटल सर्व्हिस या गोष्टी आता आणखी वाढतील. आत्ताच गाड्यांच्या बुकींगमध्ये 30% नी वाढ झालीय”.

ते सांगतात की, हा नियम लागू झाल्यावर मागणी किती आहे हे पाहून आम्ही कारपूलींगची सेवा आणखी वाढवू.

कारव्यतिरिक्त ऑटोरिक्षा सेवा पुरवणाऱ्यांनाही यातून फायदाच होईल असं वाटतयं. जुगनू नावाची रिक्षा सेवा पुरवणारी कंपनी प्रवासी सेवेसोबतच अन्न आणि किराणासामानही पोहोचवण्याचं काम करते. त्यांच्याकडे रिक्षांचं चांगल जाळं आहे.

जुगनुचे सीईओ आणि सहसंस्थापक समर सिंघला म्हणतात, “बरेचसे लोक ऑटोरिक्षावर अवलंबून आहेत. आमच्याकडे दिल्लीत एक हजार रिक्षा आहेत आणि लोकांना वेगवेगळ्या सेवा पुरवण्यात आम्हांला आनंद वाटतो. आम्ही सरकार आणि ‘पुछो’ या एपसोबत एकत्र येऊन काम करणार आहोत. जुगनूकरता मागणीतली वाढ म्हणजे काम करण्याची आणखी संधी. त्यामुळे आमची सेवा वाढवून जास्तीत जास्त कार्यक्षम आणि विश्वासार्ह कसं होता होईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत”.

ते पुढे सांगतात की, पूर्वी कमी विश्वासार्हता आणि वेळखाऊपणा जास्त असल्यामुळे लोक रिक्षाने जायचं टाळायचे. मात्र आता बऱ्याच रिक्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची सोय झाल्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक या सेवेचा लाभ घेत आहेत.

युअरस्टोरीचं मत

राजधानीतल्या अर्ध्या गाड्याच रस्त्यावर धावणार असल्याने उबेर, ओला, ब्ला ब्ला कार, शटल आणि अशा अनेक सेवा पुरवणाऱ्या कंपन्याही या संधीचा फायदा घ्यायला उत्सुक आहेत.

उबेर बेंगळुरूनंतर आता दिल्लीतही कारपूलींगची सेवा सुरू करणार आहे. ओलाने आता ‘ओला शेअर’चा पर्यायही आणला. यात तुम्ही कोणा अनोळखी व्यक्तीसोबत कार शेअर करण्याऐवजी तुमच्या सोशल ग्रुपमधील व्यक्तीसोबत कार शेअर करता. सरकारच्या चाचणीचा अंदाज येण्याकरता ‘शटल’ने oddevenbyshuttl.com ही वेबसाईटच सुरू केली आहे. याव्दारे लोकांना सम-विषम तारखांनुसार दिल्लीतलं गाड्यांचं वेळापत्रक समजायला सोप जाईल.

स्टार्टअपच्या या सर्व प्रयत्नांमुळे पुढील काळात प्रवाशांचा नक्कीच फायदा होणार आहे. पण, हे काही संपूर्ण समस्या निवारण नाही. दिल्लीतल्या लक्षावधी प्रवाशांकरता पुरेशी प्रवासव्यवस्था असणं आवश्क आहे.

दरम्यान, दिल्ली शेजारील गुडगावमध्ये रस्ते आणि परिवहन विभागाने शटल आणि ओला शटलची सेवा शहरात थांबवली आहे.

प्रदूषण आणि ट्रॅफिकच्या समस्येतून तोडगा काढणाऱ्या परिवहन संबंधित स्टार्टअपना सरकारने सोयी आणि मार्गदर्शक तत्त्व आखून दिली पाहिजेत. त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करायला नको.

लेखक – तौसिफ अालम

अनुवादक – साधना तिप्पनाकजे