‘लखनवी चिकनकारी,’ खाणे नव्हे, हे कापड भारी! ‘आंचल’ सप्त-आकाशी… तयाची दुमदुमते ललकारी!!

‘लखनवी चिकनकारी,’ खाणे नव्हे, हे कापड भारी!
‘आंचल’ सप्त-आकाशी… तयाची दुमदुमते ललकारी!!

Thursday October 08, 2015,

5 min Read

वैविध्यात अंगभूत असलेली एकात्मता, विषमतेत सामावलेली समरसता ही भारतमातेची आणि तिच्या लेकरांची खास वैशिष्ट्येच. भाषा, पेहराव, खाणे-पिणे असे सारेच इथल्या वेगवेगळ्या प्रदेशागणिक वेगवेगळे आहे. प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र ओळख आहे… आणि म्हणूनच कदाचित आपल्या देशाबद्दल आणि इथल्या संस्कृतीबद्दल अवघ्या वसुंधरेला एक खास असे आकर्षण आहे. इथले पेहराव पाहून तर अगदी कुणीही प्रेमात पडावे! इथल्या परिधानांची चलती जगभरात उगीचच नाही. इथली रंगीबेरंगी अन् कलाकुसरीने नटलेली वेशभुषा परकीयांनाही भुरळ घालते. परदेशांतूनही या वेशभूषेचे कोडकौतुक हमखास होते.

चिकनकारीची भुरळ पडतेच

भारताच्या वेगवेगळ्या भागांतून आपापल्या खास धाग्यांची वीण ल्यायलेली विविध वस्त्रप्रावरणे नुसती पाहिली तरी नेत्रपल्लवी सुखावल्या म्हणून समजा. बनारसी साडी ही उत्तर भारताची खासियत. सुती कपडे गुजरातची. रंगीबेरंगी धोतर-कुर्ते पंजाबचे वैशिष्ट्य तर दक्षिणेत रेशमाच्या धाग्यांचे चलन… या झाल्या चार ठिकाणच्या चार गोष्टी. भारतातल्या अगदी लहानसहान भागांतूनही वस्त्रप्रावरणांच्या तिथल्या खासियती आहेत. उदाहरणार्थ पैठणची पैठणी, महेश्वरची महेश्वरी, कांजिवरमचे सिल्क असे कितीतरी. आता या यादीतून लखनौची चिकनकारी काय वगळण्याची गोष्ट आहे. चिकनकरीच्या जवळ जाणारा हा शब्द असला तरी खाण्याचा पदार्थ नाही बरं का… नेसण्या-घालण्याचा आहे. चिकनकारीचा अंगाला येणारा ‘फिल’च असा काही आहे, की सातसमुद्रापार त्याची ख्याती पसरत गेली, त्यात इंटरनेटने जग जसे जवळ आले तसे तर चिकनकारीच्या भरारीला आकाशही अपुरे येऊ लागलेय. अर्थात त्याचे श्रेय एकट्या इंटरनेटला नाही. एक नेटकरिणीलाही आहे. ते पुढे येईलच. तर चिकनकारीची खास कलाकुसर म्हणजे खरोखर खासच. सुती कापडावर कलासक्त हातांनी साकारलेली वेलबुट्टी, अप्रतिम असे नक्षीकाम म्हणजे चिकनकारी… चिकनकारी घडवणारे हात लखनौ परिसरातून सर्वाधिक संख्येने आहेत. म्हणूनही चिकनकारीला ‘लखनवी’ असे आणखी एक विशेषण जुळले. एखादा उर्दू कवी लखनौचा रहिवासी असला तर तो जसा आपल्या नावानंतर ‘लखनवी’ हा शब्द ‘तखल्लूस’ (खास परिचय) म्हणून पेरतो अगदी तसेच चिकनकारीच्या आधी हा शब्द (लखनवी) वरील कारणाने आपोआप पेरला गेला.

image


ऑनलाइन गोष्ट… अन् आंचल गुप्ता

इंटरनेटवरून अनेक लोक आता कपड्यांची खरेदी ‘ऑनलाइन’ करू लागलेले आहेत. ‘तिने’ जेव्हा ऑनलाइनच्या माध्यमातून चिकनकारी सर्च करायला सुरवात केली. चिकनकारी इतकी भारी असूनही ऑनलाइन डिमांड म्हणावी तशी नाहीच. ज्या काही मोजक्या कंपन्या ऑनलाइन चिकनकारी उपलब्ध करून देत होत्या, त्याही चिकनकारी म्हणून चालू माल विकणाऱ्या. पुढे ‘तिला’ हेही कळले, की लखनवी चिकनकारी अनेकांना ऑनलाइन हवे आहे, पण मिळतच नाही. मग तिने ठरवून टाकले, की आपण हे आव्हान पेलायचे. ‘ड्रेस ३६५’च्या माध्यमातून चिकनकारी लोकांपर्यंत पोहोचवायचे. लखनवी चिकनकारी तीही सर्वोच्च दर्जाची… आणि ते ग्राहकांपर्यंत सहज-सुलभ पोहोचवणारी ही ‘ती’ म्हणजे… आंचल गुप्ता…

बजारातील उणीव कोणती, ते जाणून आपण ती भरून काढण्यासाठी जोपासलेला ध्यास, कल्पना, कष्ट आणि काही तरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द या बळावर आंचल गुप्ता ‘त्या’ एका ‘क्लिक’नंतर आज एका यशस्वी कंपनीच्या संचालिका आहेत. ऑनलाइन विश्वामध्ये ड्रेस ३६५ स्टोअरच्या माध्यमातून देशातच नव्हे तर परदेशांतही लखनवी चिकनकारी आता कमालीची लोकप्रिय आहे.

image


सुरवात तशी सोपी नव्हती…

‘ड्रेस ३६५’चे नवे व्रत अंगिकारणे आंचल गुप्तांसाठी फार सोपेही नव्हते. एकतर त्या विवाहित होत्या आणि त्यांचे बाळोबा दोनच वर्षांचे होते. तान्हे मूल त्याची जबाबदारी कुठल्याही अन्य गोष्टीपेक्षा महत्त्वाची होती, पण नवऱ्याने ती वाटून घेतली. ‘ड्रेस ३६५’ची सुरवात म्हणूनच यशस्वी होऊ शकली, असे आंचल प्रांजळपणे सांगतात. ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’, या प्रसिद्ध उक्तीचा आधार घेत त्या म्हणतात, ‘‘मी एक यशस्वी स्त्री होऊ शकले कारण माझ्यामागे नवऱ्याचा हात होता.’’ प्रत्येक आघाडीवर आश्वस्त करणारा हात.

इतिहासात डोकावून पाहताना…

लखनवी चिकनकारीला मोगल काळापासूनचा इतिहास आहे. ग्रिक विद्वान मॅगेस्थेनिसने आपल्या भारत दौऱ्याच्या वृत्तांतातून चिकनकारीचा उल्लेख केलेला आढळतो. चिकनकारी मोगलकालिन असली तरी तिचे मूळ तुर्कस्तान किंवा उजबेकिस्तान नाही. चिकनकारीच्या मुळा पर्शियन संस्कृतीत दडलेल्या आहेत. पर्शियातील (आजचे इराण-इराक मिळूनचा भूभाग) एका वस्त्रप्रावरणातून प्रेरणा घेऊन त्यात उत्तर भारताचा बाज मिसळण्यात आला आणि अशाप्रकारे चिकनकारीची कला इथली लखनौ परिसरात रुजली. सम्राज्ञी नुरजहाँ हिने या कसबाला राजाश्रय दिल्याचेही बोलले जाते. बहुतांशी सुती कापडावर हस्तकलेच्या माध्यमातून एका सुईच्या साहाय्याने केलेले नक्षीकाम ही चिकनकारीची सर्वसाधारण ओळख असली तरी रेशमी कापडही बरेचदा वापरला जातो.

चिकनकारीचा इतिहास असा समृद्ध असला तरी हे कसब असलेले कारागिर अलीकडच्या काळात कमी होत चाललेले आहेत. चिकनकारीला मिळणारे प्रोत्साहन सर्वच आघाड्यांवरून लयाला गेले. चिकनकारीच्या नावाने ग्राहकाच्या माथी भलतेच कापड मारले जाणेही या वस्त्रप्रावरणाला मारक ठरले.

आंचल गुप्ता स्वत: ऑनलाइन खरेदी करतात. आंचल वस्त्रप्रावरणप्रेमी आहेतच, त्यासह त्या चिकनकारीच्या जाणकारही आहेत. एकतर चिकनकारी ऑनलाइन मिळत नाही आणि ऑनलाइन मिळणाऱ्या चिकनकारीवरील नक्षीकामात लखनवी शैलीतील कुठेच आढळत नाही. चिकनकारीच्या जगभरातील प्रशंसकांना आपण खरीखुरी चिकनकारी ऑनलाइन उपलब्ध करून देऊयात हा संकल्प आंचल यांनी यातूनच सोडला आणि अखेर यशस्वीरित्या पूर्ण केला. लखनवी चिकनकारी युक्त तलम रेशमी ‘लहंगे’, साड्या, ‘कामदानी अनारकली’ असे कितीतरी खरेखुरे प्रकार त्या ग्राहकांना पुरवतात.

image


नुरजहाँनंतर आंचल गुप्तांचाच आश्रय

आंचल गुप्ता स्वत: मूळच्या लखनौकर. चिकनकारी ग्राहकांची हौस पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी स्वत:च वर्कशॉप सुरू करण्याचे ठरवले. चिकनकारी सुरवातील त्यांनी स्वत:च्या मर्यादित वर्तुळात फिरवली. नातेवाइक, मित्र अशा मंडळींना प्रावरणे विकली. ‘माउथ टू माउथ पब्लिसिटी होत गेली आणि ग्राहकांचे हे वर्तुळ विस्तारत गेले. एप्रिल २०१३ मध्ये या वर्तुळाची परिणती ‘ऑनलाइन वेब पोर्टल ड्रेस ३६५’च्या रूपात झाली… आणि नुरजहाँच्या राजाश्रयानंतर मोठा कालावधी उलटून अखेर चिकनकारीला ग्राहकाश्रय मिळाला…

वेब पोर्टल सुरू व्हायलाही साधे कष्ट पडले नाहीत. ५ लाख रुपये व्यवसायात गुंतवलेले होते. ऑनलाइन ग्राहकांचा विश्वास जिंकणेही सोपी गोष्ट नव्हती. इरादा प्रामाणिक होता. सेवा सुलभ होती. माल भरवशाचा होता. हळुहळू सगळे सोपे होत गेले. लोकांचा विश्वास बसत गेला आणि अखेर बसला. विदेशातूनही मागण्या येऊ लागल्या.

ड्रेस ३६५ चे वैशिष्ट्य काय?

१) ड्रेस ३६५ ऑनलाइन शॉपिंग स्टोअरमध्ये लखनौच्या प्रसिद्ध चिकनकारीच्या कुर्ती, साड्या, मुलांचे पेहराव, पुरुषांसाठी वस्त्र प्रावरणे उपलब्ध. उत्तम दर्जाची खात्री.

२) उच्च दर्जाची वेलबुट्टी, खास लखनवी शैलीतील अप्रतिम नक्षीकाम. सुती कापडासह रेशम कापडही इथे उपलब्ध आहे. हस्तकौशल्याच्या कलेक्शनचे भांडार आहे.

३) गडद नक्षीकामयुक्त साड्या, कुर्ती, शुद्ध रेशमाची अनारकली असे कितीतरी प्रकार व डिझाइन इथे बघायला मिळतील.

४) चिकनकारीसोबतच देशातील मोठमोठ्या फॅशन हाउसचे कपडे वाजवी दरात उपलब्ध करून देण्याची सुविधा इथे उपलब्ध आहे.

दिवाळी, होळी, ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर तर लखनवी चिकनकारीला जगभरातून असलेली मागणी अगदी पाच-दहा पटींपर्यंत वाढलेली असते.

भारतीय कला-संस्कृतीचे अंग असलेल्या चिकनकारीची जागतिक स्तरावर नुसतीच ओळख व्हावी, हे ‘ड्रेस ३६५’चे उद्दिष्ट नाही, तर चिकनकारीला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी… पूर्ववत ते ऐतिहासिक वैभव प्राप्त करून द्यावे, हे मुख्यत: आहे.

‘‘आम्ही एक प्रयत्न केला. यश आले. लखनवी चिकनकारी ग्राहकांच्या नुसतीच पसंतीला उतरते आहे, असे नाही तर या वस्त्राच्या ग्राहकांचा दिवसागणिक गुणाकार होतो आहे. हजारो विणकरांना त्यामुळे रोजगार उपलब्ध होतो आहे. मधला काळ चिकनकारीसाठी निद्रावस्थेत गेला. ‘ड्रेस ३६५’ने या काळाला असे जागे केले, की पुढे अगदी थोड्याच कालावधीत चिकनकारीच्या वाट्याला पूर्ववत ‘नुरजहाँ’चे वैभव आलेले दिसते आहे. इंग्लंड, कॅनडा, अमेरिका, मध्य पूर्व आशियातील सगळ्याच देशांतून चिकनकारीच्या ऑर्डर्स येताहेत… चिकनकारीची ललकारी सप्तसिंधू, सप्तशिखरे ओलांडून जग आपल्या कवेत घेते आहे…’’

हे सांगताना आंचल गुप्ता भारावून गेलेल्या असतात…