'बेबीबॉक्स' म्हणजे आपल्या बाळाची संपूर्ण काळजी

0

आपल्या घरी छोटा पाहुणा आल्यानंतर जर आपल्याला जगातील प्रमुख ब्रँड असलेले डायपर्स, बेबी वाईप्स, सॅनिटायझर्स आणि बाळासाठी इतर गरजेच्या वस्तुंनी भरलेले सॅम्पल्स मोफत मिळाले जर तुम्हाला कसे वाटेल? हे स्पष्टच आहे, की तातडीची गरज असलेल्या वस्तू जर योग्य वेळी अशा भेटीच्या स्वरूपात मिळाल्या तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. आणि ही भेट जर आपल्याला आपल्या डॉक्टरांकडून किंवा रुग्णालयातील कर्मचा-यांतर्फे मिळाली तर तुमचा हा आनंद द्विगुणीत झाल्याशिवाय राहणार नाही.

पाश्चात्य देशात अशा प्रकारच्या ‘सॅम्पल गिफ्ट्स’ ग्राहकांना आकर्षित करण्यात अतिशय प्रभावी सिद्ध झालेल्या आहेत. जागतिक ब्रँड तर हा सॅम्पल गिफ्ट देण्याचा प्रयोग करत आलेले आहेत. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर ऑस्ट्रेलियातील बाऊंटी या कंपनीचे देता येईल. या कंपनीने गेल्या ३० वर्षांच्या काळात नव्याने आई झालेल्या लाखो महिलांना अशा गिफ्ट सॅम्पल्सचे वाटप केलेले आहे. भारतात देखील ‘बेबीबॉक्स’ ने नव्याने आई झालेल्या महिलांना जगातील प्रसिद्ध ब्रँड्सची उत्पादने मोफत देण्याचे काम सुरू केले आहे. केसीएल, एचयूएल, डाबर, महिंद्रा रिटेल, आयसीआयसीआय प्रुडेंशियल, आदित्य बिर्ला ग्रुप सारख्या कंपन्यांचे मोफत सॅम्पल्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम बेबीबॉक्स करत आहे.

बेबीबॉक्स ही कंपनी एक वर्षाच्या कालावधीत भारतातील ३२ शहरामध्ये ४००० रूग्णालयांच्या माध्यमातून सुमारे १० लाख आई-वडिलांपर्यंत पोहोचली आहे. यावरून बेबीबॉक्स किती प्रभावीपणे काम करण्यात यशस्वी झाली आहे याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. ‘बेबीबॉक्सचे’ संस्थापक दीपक वर्मा म्हणतात, “ बाजारात उतरल्यानंतर केवळ तीन वर्षांत आम्ही हे करून दाखवले. इतकेच नाही, तर आम्ही जलद गतीने पुढेही जात आहोत.”

अशी सूचली कल्पना

दीपक वर्मा जेव्हा वडिल झाले तेव्हा नुकत्याच जन्मलेल्या आपल्या बाळांची गरज असलेल्या ब्रँडेड गोष्टीच्या गिफ्ट हँपरची त्यांना कल्पना सुचली. त्यांना मूल झाल्याने दीपक वर्मा आणि त्यांच्या पत्नीला अतिशय आनंद झाला होता. आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी काय काय खरेदी करायचे याबाबत ते खूपच उत्सुक होते. दीपक वर्मा आपल्या बाळासाठी बाजारात आपल्याला हव्या त्या योग्य वस्तुंचा कशा प्रकारे शोध घेत होते ते आठवून सांगत होते. त्यावेळी त्यांना बाजारात एक खूच छान ‘ब्रिस्ट फिडींग एड’ मिळाले. हे उत्पादन पाहून ते खूप आनंदी झाले. या उत्पादनाबाबत यापूर्वी त्यांना कुणी कशी कल्पना दिली नाही असा विचार त्यावेळी त्यांच्या डोक्यात आला.

दीपक वर्मा यांनी जेव्हा स्वत: आपला उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी भारतातील एका प्रमुख मीडिया हाऊसच्या जाहिरात आणि मार्केटिंग विभागात १३ वर्षे काम केल्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. ज्या क्षेत्राचा यापूर्वी फार वापर झालेला नसेल असे क्षेत्र ते बाजारात शोधत होते. त्यावेळी त्यांना बाळांच्या पालकांना मोफत सॅम्पल्स देण्याची कल्पना सूचली. आपल्या या कल्पनेवर त्यांनी जवळजवळ दोन वर्षे काम केले आणि २०११ च्या मे महिन्यात त्यांनी ‘बेबीबॉक्स’ लाँच केले.

नवजात बाळाच्या पालकांपर्यंत पोहोचायचे असेल तर रुग्णालय, क्लिनिक आणि प्रसूती केंद्र ( मॅटर्निटी सेंटर) अशा माध्यमांची त्यांना मोठी मदत होऊ शकेल हे त्यांना ठाऊक होते. या कारणामुळे त्यांच्यासमोर पहिले आव्हान रुग्णालयासोबत भागीदारी करणे हे होते. या संदर्भात आपल्याला अचानकपणे लागलेल्या शोधाबाबत ते आवर्जून सांगतात. त्यांना दिल्लीतील मोठ्या रूग्णालयांपैकी एका रूग्णालयाच्या प्रमुखांना भेटण्याची वेळ मिळाली. ते सांगतात, “ तिथे रुग्णालयाच्या प्रमुखांची मला बराच काळ वाट पाहावी लागली. त्या वेळेत मी प्रसूती केंद्रातील नर्स आणि इतर कर्मचा-यांसोबत बोललो. दरम्यानच्या काळात रुग्णालयाचे प्रमुख तिथे पोचले आणि ते मला आत घेऊन गेले. 'बेबीबॉक्स'च्या प्रचारासाठी हे लोक सर्वात चांगले माध्यम सिद्ध होतील हे मला नर्स आणि कर्मचा-यांसोबत बोलत असतानाच लक्षात आले.”

कशी केली तयारी?

रुग्णालयाच्या कर्माचा-यांच्या वतीने ‘बेबीबॉक्स’ हे उत्पादन बाळाच्या पालकांच्या सन्मानार्थ भेटीच्या स्वरूपात दिले जाईल हे आत्तापर्यंत स्पष्ट झाले होते. दीपक वर्मा यांनी सांगितले, “ या उद्योगासोबत ग्राहकांना अधिक गंभीरतेने जोडण्याची वेळ आता आलेली आहे. कारण जे नवे नवे माता पिता बनलेले असतात, त्यांना अशा प्रकारच्या ‘बेबी प्रोडक्ट्स’ची फारच गरज असते. अशा प्रकारची आवश्यक असलेली उत्पादने जरी लोकांनी अगोदरच खरेदी केली असली तरी आम्ही दिलेल्या उत्पादनांचा वापर करण्याची त्यांची तयारी असल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे ही उत्पादने त्यांना रुग्णालयातर्फे भेटीच्या स्वरूपाच मिळालेली असतात.”

ज्या रूग्णालयांमध्ये नवजात बालकांच्या जन्माचे प्रमाण जास्त आहे अशा रुग्णालयांशी ‘बेबीबॉक्स’ने आपली ओळख वाढवली आणि या रुग्णालयांना आपल्या व्यवसायासाठी लक्ष बनवले. ते म्हणतात, “एकदा का मोठ्या रूग्णालयासोबत करार झाला की मग छोट्या रुग्णालयांना समजावणे सोपे होऊन जाते.” यानंतर हळूहळू शहरातील इतर रूग्णालयाशी देखील ‘बेबीबॉक्स’ने संपर्क केला. सध्या ४० लोकांची टीम देशातील सुमारे ४००० रुग्णालये, क्लिनिक आणि मॅटर्निटी सेंटर्सना हाताळत आहे.

दीपक सांगतात, “ आमचे एक निश्चित असे माध्यम आहे, निश्चित असे संबंध आहेत आणि सॅम्पल्सचे वितरण करण्याची निश्चित अशी यंत्रणा आहे. ज्या नवजात बाळाच्या पालकांना ‘बेबीबॉक्स’चे गिफ्ट हँपर्स मिळतात, त्यांना पुराव्यासाठी नोंदणी कार्ड भरावे लागते. गिफ्ट हँपर्स योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचले आहेत का याची खातरजमा करण्यासाठी टीमचे सदस्य बाळाच्या आई-वडिलांना फोन करुन माहिती घेतात. दीपक वर्मा सांगतात, “ उत्पादने वाया जाऊ नयेत याची आम्ही अशा प्रकारे काळजी घेतो. आम्ही ए, बी आणि सी श्रेणीतील रुग्णालयांसोबत काम करतो. इथे येणारे लोक उच्च ते मध्यम स्तरातील खर्च करणारे असतात. समाजातील असे लोक ब्रँडेड उत्पादने घेण्याबाबत जागरूक असतात.”

उत्पादनाचा उत्तरोत्तर विकास

कलारी कॅपिटल आणि त्याच्या व्यवस्थापकीय संचालिका वाणी कोला या सुरूवातीपासूनच दीपक वर्मा यांच्यासी संलग्न राहिलेल्या आहेत. दीपक वर्मा आठवून सांगतात, “ वाणी या खूपच चांगल्या सहकारी आहेत. त्यांना सॅम्पलिंग टूलची खूपच चांगली जाण आहे. तथापि, भारतात हे काम सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. या क्षेत्रात करण्यासारखे बरेच काही आहे. ‘बेबीबॉक्स’च्या सुरूवातीपासूनच वाणी आमच्या सोबत आहेत. हा व्यवसाय प्रभावी बनवण्याच्या दृष्टीने त्या आम्हाला या व्यवसायातले बारकावे सांगत असतात.”

‘बेबीबॉक्स’ने आत्तापर्यंत केलेला विकास हा भारतातील ‘एफएमसीजी’ सेक्टरमध्ये यापेक्षा अधिक पुढे विकास करण्याच्या शक्यतेकडे अंगुलीनिर्देश करतो. भारताच्या अर्थव्यवस्थेत १३.१ बिलियन डॉलर्सची उलाढाल असलेल्या ‘एफएमसीजी’ सेक्टरला चौथे सर्वात मोठे क्षेत्र मानले जाते.

दीपक वर्मा आणि त्यांच्या टीमने नुकतेच आपल्या ‘बेबीबॉक्स’ला नव्या रूपात सादर केले आहे. ‘बेबीबॉक्स’ आता ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. हा व्यवसाय पूर्वीपेक्षाही अधिक वेगाने प्रगती करेल याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आता नफा कमावणारी कंपनी बनल्यानंतर ‘बेबीबॉक्स’ आता ‘फार्मास्यूटिकल्स’, ‘ब्यूटी’ आणि ‘वेलनेस सॅम्पलिंग’ उपलब्ध करण्याच्या व्यवसायात देखील चाचपणी करणार आहे. यासाठी ते लवकरच पैसा उभारण्यासाठी पुढे येणार आहेत.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Stories by sunil tambe