मुख्यमंत्र्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणा-या पहिल्या महिलाधिकारी सुभाषिनी शंकरन!

0

या वर्षीच्या जुलै महिन्यात सुभाषीनी शंकरन या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी महिलेने आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्विकारली. असे केल्याने सुभाषीनी शंकरन या देशातील मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या महिला सुरक्षा अधिकारी ठरल्या आहेत, असे वृत्त झळकले आहे.

एका उच्चशिक्षीत मध्यमवर्गीय कुटूंबातल्या सुभाषिनी यांचा जन्म तामिळनाडूच्या कुंभकोणम या तंजावर जिल्ह्यातील गावात झाला. त्यांनतर पालकांसोबत त्या मुंबईत रहायला गेल्या. मुंबईत त्यांचे बालपण गेले आणि तेथेच शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयातून समाजशास्त्र या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापिठातून एम फिल ची पदवी मिळवली.

जेएनयु मध्ये असतानाच सुभाषिनी यांनी युपीएससीच्या परिक्षा दिल्या. सन २०१०मध्ये त्यांनी मुख्यपरिक्षेत उत्तिर्ण होवून २४३वा क्रमांक मिळवला. त्यानंतर त्या हैद्राबाद येथे पोलिस अकादमीच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाल्या, आणि त्यांची नियुक्ती आसाम मध्ये करण्यात आली. “ सर्वासाठीच ही नविन गोष्ट होती, पण हळुहळू लोकांनी ही गोष्ट स्विकारण्यास सुरुवात केली की, एक महिला अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची प्रमुख अधिकारी आहे.” सुभाषिनी सांगतात.

याबाबत त्यांना जाणिव आहे की, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही कामगिरी किती अचूक असायला हवी, त्यात कोणत्याही चुकीच्या दुरुस्तीला वाव नाही. सुभाषिनी यांना मुख्यमंत्र्यांच्या प्रवासाचे मार्ग ठरविण्याच्या महत्वाच्या जबाबदारीचे पालन करावे लागते. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक तंत्राचा त्या त्यांच्या सहका-यांसोबत अवलंब करतात, त्यासाठी आवश्यक त्या सूचना आणि आढावा त्या घेवून फेरसूचना त्या देत असतात.