सात खंडांत, सप्तशिखरांवर डौलवते तिरंगा.. तारुण्यही लाजावे, ऐसा पन्नाशीतील ‘दंगा…’

सात खंडांत, सप्तशिखरांवर डौलवते तिरंगा..
तारुण्यही लाजावे, ऐसा पन्नाशीतील ‘दंगा…’

Sunday October 04, 2015,

5 min Read

भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा यांच्या नावाने ओळखले जाणारे जमशेदपूर. टाटा समूह आणि त्यांचा इथला पोलाद उद्योग भारतासह जगभरातच प्रसिद्ध आहे. टाटा स्टिल जसे इथे जमशेदजींच्या पोलादी इराद्यांचे प्रतीक म्हणून मजबूत उभे आहे, तशीच आणखी एक मजबूत इराद्यांची गोष्ट इथे आहे आणि ती म्हणजे प्रेमलता अग्रवाल! पहाड पाहूनच भले-भले डगमगतात. तो पार करायची… सर करायची गोष्ट मग दूरच राहिली… आणि बावन्न वर्षांची ही साधीसरळ, अस्सल भारतीय बाजाची गृहिणी… पण गिरीरागिणीच जणू! पहाड पाहिला की प्रेमलता यांना आधी खुणावते ते थेट शिखर… केव्हा पहाड पार करते अन् शिखर केव्हा सर करते, असे होते आणि एखाद्या लतेने वृक्ष कवेत घ्यावा, तसा प्रेमलता यांनी पहाड कवेत घेतलेला असतो अन् शिखर पायाखाली….

image


प्रेमलता अग्रवाल

गिर्यारोहणात प्रेमलता अग्रवाल हे आताशा जगभरात प्रसिद्ध असलेले नाव आहे. पद्मश्री हा चौथा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय नागरी सन्मानही त्यांना बहाल करण्यात आलाय.

पन्नासावे लागले म्हणजे आता सगळे खल्लास, गेल्या गोवऱ्या मसणात, असाच आपल्याकडे सर्वसाधारण समज. आणि वयाच्या याच अर्धशतकी टप्प्यावर प्रेमलता यांनी ते करून दाखवले जे नवोन्मेषालाही अशक्य वाटावे. ‘सेवन समिट्स’ म्हणजेच जगातील सातही खंडांत त्या-त्या खंडातील सर्वांत उंच असलेली सर्व शिखरे प्रेमलता यांनी पादाक्रांत केली. सातही खंडांतून सर्वत्र सर्वांत उंच ठिकाणांवर डौलाने तिरंगा फडकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. २३ मे २०१३ हा प्रेमलता यांनी गाजवलेला तो दिवस होता. उत्तर अमेरिकेतील अलास्का पर्वतरांगेतील माउंट मॅक्किन्लेवर यशस्वी चढाई करून हे रेकॉर्ड त्यांनी नोंदवले.


ही ती सप्तशिखरे

सप्तखंडांतील सर्वांत उंच सप्तशिखरांना ‘सेवन समिट्स’ म्हटले जाते. किलिमंजारो, विन्सन, मॅसिफ, कॉस्क्युज्को, कार्सटेन्सज् पिरॅमिड, माउंट एव्हरेस्ट, एलब्रुस आणि मॅक्किन्ले ही ती सप्तशिखरे.


याआधी माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वांत वयस्कर भारतीय महिला म्हणून त्यांनी अवघ्या जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. पन्नाशीतल्या दैदिप्यमान यशाच्या अवघ्या दोन वर्षे आधी म्हणजे अठ्ठेचाळिशीत त्यांनी हे कर्तृत्व गाजवलेले होते. प्रेमलता यांना एका झटक्यात हे यश मिळाले का? तर नाही. खूप चटके त्यासाठी खावे लागले. कितीतरी कसोट्यांवर स्वत:ला सिद्ध करावे लागले. आणि कितीतरी लिटमस टेस्ट पार कराव्या लागल्या.


पहाडांच्या कुशीतील बालपण…

दार्जिलिंगमधल्या सुखीपोकरी या लहानशा वस्तीत जन्मलेल्या प्रेमलता यांचा विवाह जमशेदपूरमधील सरळरेषेत चालणाऱ्या मारवाडी कुटुंबात १९८१ मध्ये संपन्न झाला.

व्यापार-व्यवसाय सोडून सहसा वेगळी वाट न धरणारी मारवाडी परंपरा, सहसा कुणालाही आव्हान वगैरे न देणारी, पण या परंपरेतील प्रेमलता यांनी थेट पहाडांना आव्हान दिले. सायंकाळ झाली म्हणजे प्रेमलता इथे जमशेदपुरात आपल्या दोन लेकींसह जेआरडी क्रीडा संकुल आवारात योग शिकायला आवर्जून जात असत. आणि याचदरम्यान विख्यात गिर्यारोहक बचेंद्री पाल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘डोल्मा गिरीपदभ्रमंती मोहिमे’त त्यांनी सहभाग नोंदवला. कहर म्हणजे तृतीय स्थान पटकावले. पुरस्कार स्वीकारताना प्रेमलता यांनी पाल यांना विनंती केली, की माझ्या लेकीला हा साहसी खेळ शिकायचा आहे. कृपया शिकवा. पण पाल यांच्या पहाडपक्व दृष्टीने प्रेमलता यांच्यातील पर्वताशी एकरूप झालेला पदताल हेरला होता. ते म्हणाले, ‘‘लेकीचे सोडा. गिर्यारोहणासाठी तुम्हीच परफेक्ट आहात. तुम्हीच हा खेळ शिकावा, असा माझा प्रस्ताव आहे.’’

पर्वतारोहणातील पहिले पाऊल

…आणि १९९९ मध्ये वयाच्या छत्तिसाव्या वर्षी प्रेमलता नावाचे हे पाऊल पहिल्यांदा पर्वतारोहणाच्या वर्तुळात पडले. हे पाऊल पुढे अनंत पाऊलखुणा सोडणार आहे, असे त्यावेळी बचेंद्री पाल सोडून कुणालाही वाटले नव्हते, अगदी प्रेमलता यांना स्वत:लाही नव्हते वाटले.

लाडक्या लेकीसह उत्तरकाशी गिर्यारोहणाचा बेसिक कोर्स करायला त्या पहिल्यांदा गेल्या आणि १३ हजार फूट हिमालय पर्वत श्रुंखला पार करून केवळ ‘अ’ श्रेणीच मिळवली नाही, तर ‘सर्वश्रेष्ठ प्रशिक्षणार्थी’ हा खिताबही पटकावला. प्रेमलता यांचे पर्वतावरील पहिलेच पाऊल हे असे दमदार ठरले. वयाच्या छत्तिसाव्या वर्षी नव्या क्षितिजांचा पाया या पावलाने रचला. छत्तीसचा आकडा हा असा शुभांक ठरला, की पुढे सप्तशिखरे पावलाखाली आली.

प्रेमलता म्हणतात, ‘‘माझे बालपण दार्जिलिंगमध्ये गेले. पहाड, पर्वतांशी तेव्हापासूनची माझी मैत्री आहे. अर्थात पहाडांवर चालणे आणि घसरगुंडीपुरते पहाडावर चढणे, इथपर्यंतचेच हे सख्य होते, पण गिर्यारोहण मी करेन, शिखरे सर करेन, असे कधीही स्वप्नातही वाटले नव्हते.’’


पुन्हा मिशन एव्हरेस्ट

बचेंद्री पाल यांच्यासमवेत लडाख आणि नेपाळमध्ये २००४ पर्यंत अनेक गिर्यारोहण मोहिमा प्रेमलता यांनी यशस्वीपणे राबवल्या होत्या. आता लक्ष्य होते माऊंट एव्हरेस्ट. पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात हे लक्ष्य जणू दबून गेलेले होते. २०१० उजाडले तोवर दोन्ही लेकींची लग्ने उरकलेली होती. श्वास मोकळा झालेला होता आणि आता प्रेमलता पहाडांसाठी मोकळ्या होत्या… पुन्हा मिशन एव्हरेस्ट!


नवऱ्याचा धीर जसे ऑक्सिजन किट्स

प्रेमलता म्हणतात, ‘‘या सहा वर्षांत बरेच काही बदललेले होते. लपवायचे काय? माझे वयही वाढत चाललेले होते. शिखरांबद्दलची ओढ मात्र तसूभरही ढळलेली नव्हती. ऑक्सिजन किट्सपेक्षा पाठीला असलेला नवऱ्याचा धीर माझ्यात नवीन प्राण फुंकून गेलेला… डिसेंबरला मी सिक्किमला ट्रेनिंगसाठी गेले. जीवाचे रान केले. एव्हरेस्ट सर करण्यासाठी आवश्यक स्टॅमिना कमवायला मी आतूर होते. खूप मेहनत घेतली. मी स्टॅमिना कमावलेला होता. हे सिद्ध झालेच पुढे.’’


अखेर तो दिवस उजाडला

अखेर तो दिवस उजाडला, ज्याची ओढ होती. २५ मे २०११. प्रेमलता आपल्या सोबत्यांसह काठमांडू आणि त्यापुढे लूकला जाण्यासाठी जहाजात बसल्या. मोहिमेसाठी १८ हजार फूट उंचावरील आधार शिबिर आणि एव्हरेस्ट शिखरादरम्यान लागलेली ३ शिबिरे पार करायची होती आणि मग एव्हरेस्ट सर करायचा होता. २७ हजार फुटांची उंची. उणे ४५ डिग्रीपेक्षा कमी तापमान. शरिराची कुल्फी करणाऱ्या थंडीचा सामना याहून मोठे आव्हान ते कोणते?


तिरंगा रोवला सारे रंग भरून पावले

प्रेमलता सांगतात, ‘’२० मे २०११ हा माझे सगळे कष्ट फळाला आणणारा दिवस ठरला. सकाळी साडेनऊला बरोब्बर मी एव्हरेस्टच्या शिखरावर होते. तिरंग्यासाठी मी स्तंभ रोवला. तिरंगा फडकावला आणि आयुष्यात जणू सारेच रंग भरून पावलेले होते. २० मिनिटे मी तेथे होते. काही फोटो मी इथे काढले. परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा काठमांडूतच माझे पती आणि दोन्ही लेकी माझी वाट बघत होत्या. खरे तर हे यश या तिघांचेच होते.’’


एवढ्या उंचावर पैसे, की परमेश्वर?

नंतर प्रेमलता यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘सेव्हन समिट्स’ सर करण्याच्या दिशेने नवी वाटचाल सुरू झाली. २०१३ मध्ये हा टप्पाही पूर्ण केला. प्रेमलता यांची खंत अशी, की अजूनही त्यांना अशी काही माणसे भेटतात, जी विचारतात, ‘एव्हरेस्ट चढण्याचा फायदा काय? म्हणजे एवढ्या उंचावर जाऊन पैसे मिळतात, की परमेश्वर?’

भविष्यात महिलांसाठी फिटनेस सेंटर सुरू करण्याचा प्रेमलता यांचा मानस आहे. इथे योग, एरोबिक्स आणि प्राणायमाचे धडे महिलांना देण्यात येतील. मारवाडी समाजातील महिलांसाठी त्या एक महिन्याचे फिटनेस शिबिरही वर्षातून आयोजित करीत असतात.


औक्षण, पेढे अन् पुष्पहार

एव्हरेस्ट सर केल्यानंतर प्रेमलता यांच्या लक्षात आले, की लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. ‘‘जेव्हा मी जमशेदपुरात परतले तेव्हा रेल्वे स्थानकावर इथल्या बायका मोठ्या संख्येने खास माझ्या औक्षणासाठी जमलेल्या होत्या. आरतीसह पुष्पहार आणि पेढ्यांनी झालेले हे स्वागत माझ्यासाठी मधूर असेच होते. बहुदा या लोकांच्या लक्षात आलेले होते, की मी जे काही करतेय, ते जरा हिमतीचेच आहे आणि नाव करणारेच आहे… म्हणजे त्यांचे आणि त्यांच्या गावाचेही.’’


‘अविरामम् ही छात्रत्वम्’

‘अविरामम् ही छात्रत्वम्’ हे सुभाषित प्रेमलता जगल्या आहेत. काही शिकायचे आहे, काही साध्य करायचे आहे, तर वयाचा मुद्दा हा मुद्दाच नसतो, हा मुद्दा पटवून देणारी मुद्रा प्रेमलता यांनी उमटवली आहे… अगदी अमीट… ‘सेव्हन समिट्स’सारखी अन् अगदी उंच… एव्हरेस्ट सारखी…