वाराणसी जवळच्या विणकरांच्या गावात अगरबत्ती विकून घर चालवणाऱ्या महिलांची कहाणी

वाराणसी जवळच्या विणकरांच्या गावात अगरबत्ती विकून घर चालवणाऱ्या महिलांची कहाणी

Sunday July 17, 2016,

3 min Read

जगभरात बनारसी साडी प्रसिद्ध आहे, पण या बनारसी साडीचे विणकाम करणाऱ्या विणकरांची काय दुर्दशा आहे हेही सर्वांना माहित आहे. पावरलूममुळे विणकरांच्या रोजीरोटीवर वाईट परिणाम झाला. हताश झालेल्या या विणकरांच्या घरात एक वेळ जेवणाची भ्रांत होती. कर्जबाजारीपणामुळे सर्वजण हैराण होते. मात्र म्हणतात न इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मार्ग मिळतोच एक मार्ग बंद झाला तरी अनेक मार्ग खुले झालेले असतात. फक्त आपली नजर त्या मार्गावर गेली पाहिजे. हे खरं आहे की एखादी गोष्ट बंद पडली म्हणून जगणं थांबत नाही. असेच काहीसे झाले वाराणसीच्या सटे सारनाथ जवळच्या भासौड़ी गावात. आपले घरमालक घर चालवण्यासाठी धडपडताना पाहून तिथल्या महिलांनी स्वतः काहीतरी काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचे ठरवले.

image


त्याच वेळी त्यांना अगरबत्ती बनवण्याची प्रेरणा मिळाली. या महिलांना वाटले की अगरबत्ती बनविण्याचे काम चांगले आहे आणि पैसेही मिळतील. गावातल्या सर्व महिलांनी निर्णय घेतला की, पूजेत वापरण्यात येणारी अगरबत्ती त्या बनवतील आणि बाजारात जाऊन विकतील. त्या सर्वांनी ठरवले आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली. सर्व महिला एकत्रित येऊन अगरबत्ती तयार करू लागल्या आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करू लागल्या. त्यात त्यांना यश मिळू लागले. चांगले पैसेही मिळायला लागले. त्यामुळे घरखर्च भागवणे या महिलांना सोपे झाले. अगरबत्ती तयार करायला फारसे कष्ट लागत नाही. त्यामुळे हे काम या महिला आनंदाने करतात. त्याच परिसरातल्या समाजसेविका संतारा पटेल या महिलेने युवर स्टोरीशी बोलताना सांगितले की,

"जेव्हा विणकाम बंद झाले तेव्हा पुरुषांना कामासाठी बाहेर जावे लागले. त्याचवेळी या महिलांनी विचार केला की, घर चालवण्यासाठी आपणही काहीतरी काम केले पाहिजे. आणि त्यानंतर महिलांनी अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरु केले आणि आज बघा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. "
image


एक अशी वेळ होती की साधारण पंधराशे लोकसंख्या असलेल्या या गावातील प्रत्येक घरात विणकाम होत होते. इथे बनारसी साड्या विणल्या जायच्या आणि बाजारात विकल्या जायच्या. तेव्हाही जरी काम असले तरी परिस्थिती फार चांगली होती असे म्हणता येणार नाही. त्यानंतर कमी वेळात जास्त साड्या विणण्यासाठी पावरलूमचा वापर करण्यात आला. ज्यामुळे गावकऱ्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. हळूहळू विणकाम कमी झाले आणि काही कालावधीनंतर तर बंदच झाले. विणकर कर्जबाजारी झाले. रोज मजुरी करून खाणाऱ्या या लोकांची अवस्था फारच दयनीय झाली होती, मात्र गावातल्या महिला एकजुटीने अगरबत्ती तयार करण्यास सज्ज झाल्या आणि ते पूर्ण करण्यास परिश्रम घेतले. या महिलांच्या पुढाकाराने इथले कुटुंब आनंदी आहेत.

image


या गावातील रहिवाशी गुड्डी हिने युवर स्टोरीशी बोलताना सांगितले की,

" घरकाम आणि स्वयपाक आटोपून या महिला रोज एकत्रित जमा होतात आणि गाणी गात गात अगरबत्ती तयार करतात. त्यानंतर तयार झालेल्या अगरबत्ती बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात. आम्हाला याचा आनंद आहे की घरातले कामही होते आणि नंतरच्या वेळात अगरबत्ती तयार करून पैसेही कमावणे शक्य झाले आहे. ज्यामुळे कर्ज फेडणे शक्य झाले आहे. "

प्रगती करायला कोणाला आवडत नाही भासौडी गावातल्या महिलांनी आपल्या आजूबाजूच्या गावातल्या महिलांना देखील हे काम करण्यास प्रेरित केले. इथल्या महिलाही मग आपापल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पुढे सरसावल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे या महिलांचे घरमालकही त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. रोज बाहेरून मजुरी करून आल्यानंतर हे पुरुष महिलांच्या कामात हातभार लावतात.

image


भासौडी हे गाव महिला सशक्तिकरणाचे एक चांगले उदाहरण बनले आहे. महिला सशक्तिकरणासाठी आज देशभरात अनेक योजना राबवल्या जात आहे. मात्र वाराणसी जवळच्या गावातल्या या महिलांनी कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही आणि काम मिळावे म्हणून कोणालाही संपर्क केला नाही. त्यांच्या जवळ असलेल्या थोड्याश्या पैशातून त्यांनी काम सुरु केले आणि बघता बघता स्वयंपूर्णतेकडे त्यांनी वाटचाल केली. यावरून हे सिद्ध होते की जिद्दीने एखादे काम करायचे ठरवले तर त्यात यश नक्कीच मिळते. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आकाश दिव्यांच्या उद्योगातून अनेकांच्या जीवनात आशेचे दिप उजळणा-या गोदावरी सातपुते!

तळागाळातील वीणकाम कारागिरांना रोजगाराची संधी देणारे ʻबायलूʼ

एक अशी बँक जिने सरकारी मदतीशिवाय महिलांना बनविले आहे स्वावलंबी, गावातल्या महिलांना जिथे कर्जात दिले जातात गहू!

लेखक : नवीन पांडे

अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील

    Share on
    close