ʻकही भी, कभी भीʼ, विचाराचे प्रणेते उद्योजक उदय रेड्डी

0

जगात दोन पद्धतीचे लोक असतात, एक म्हणजे जे प्रसिद्धीच्या मागे धावतात आणि दुसरे ज्यांच्या मागे प्रसिद्धी धावते. या प्रकारात निश्चितपणे दुसऱ्या पद्धतीच्या लोकांचे लक्ष्य कायम काम करत राहणे, हेच असते. अशा लोकांच्या मार्गात बऱ्याच अडचणी येतात. मात्र कायम चालत राहण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्यासमोर असतो तो आशादायी मार्ग. कठीण मार्गाच्या यात्रेत आलेल्या अनेक अडचणींमुळेदेखील त्यांनी लक्ष्यावरुन आपली नजर हटवली नाही. यप टीव्हीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय रेड्डी यांच्या नावाला अशाच लोकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे, ज्यांनी तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या नव्या क्षेत्रात यश संपादित केले आहे. टेलीव्हिजन कुठे ही आणि कधी ही, या संकल्पनेला साध्य करताना त्यांनी इंटरनेटवर टीव्ही चॅनेल्सना आपल्या हव्या त्या वेळेवर बघण्याच्या कल्पनेला शक्य केले आहे.


तेलंगणा तथा आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी असलेल्या हैदराबादपासून १४० किमी दूरवर तीन लहान शहरांची श्रृंखला आहे. काजीपेट, हनमकोंडा आणि वरंगल अशी त्या शहरांची नावे आहेत. उदय रेड्डी यांचा संबंध यापैकी हनमकोंडा येथील एका शेतकरी कुटुंबाशी आहे. एका लहान मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झालेले उदय रेड्डी यांना प्रशासकीय सेवेत कार्य करायचे होते. आयएएस बनून कलेक्टरचे काम करुन त्यांना आपल्या गावाप्रमाणे भारतातील अन्य गावांचा चेहरामोहरा पालटायचा होता. शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडविणे, हे त्यांचे स्वप्न होते. हेच स्वप्न घेऊन ते देशाची राजधानी दिल्ली येथे आले होते. दिल्लीतील कॉलेज ऑफ इंजिनियरींगमध्ये प्रवेश घेण्यामागील त्यांचा उद्देश्यदेखील प्रशासकीय सेवेचा हिस्सा बनणे, हे होते. युअरस्टोरीशी चर्चा करताना उदय सांगतात की, ʻहनमकोंडा येथील शासकीय ज्युनियर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मी प्रशासकीय सेवेत काम करण्याचा विचार केला होता. माझ्या घरातल्यांचेदेखील हेच स्वप्न होते. मी ग्रामीण लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी पाहिल्या होत्या. त्यांच्याकरिता काहीतरी करण्याची माझी जिद्द होती. मात्र दिल्ली येथील कॉलेज ऑफ इंजिनियरींग मधून जेव्हा मी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनची पदवी प्राप्त केली तेव्हा कॅम्पस सिलेक्शनद्वारे माझी निवड डिजिटल कंपनी सिमेन्सकरिता झाली. तेव्हा मी विचार केला की, मी एक वर्ष यांच्यासाठी काम करेन आणि त्यानंतर प्रशासकीय सेवेसाठी प्रयत्न करेन. मात्र ते काही साध्य झाले नाही. त्याकाळी भारतात बाजारपेठा खुल्या होत होत्या. भलेही माझ्या घरातल्या लोकांनी प्रशासकीय सेवेबद्दल मनात काहीतरी भरवून घेतले होते. मात्र सिमेन्समुळे भारतातील अनेक शहरात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर नॉरटेल येथे नोकरी केल्यानंतर मी टेलिकम्युनिकेशन क्षेत्राचाच होऊन गेलो.ʼ


उदय यांच्या जीवनातील हीच वेळ भरारी घेण्याची होती. ते नॉरटेल सारख्या मोठ्या कंपनीसोबत जोडले गेले होते. प्रसिद्ध अशा केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये वित्त कार्य़कारी प्रबंधनाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले एमबीए करण्याचे स्वप्नदेखील पूर्ण केले. १९९५ नंतर त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्ण दिन होते. ते सांगतात की, ʻक्रांतिकारी बदलाच्या सुरुवातीचा तो काळ होता. तेव्हा वायरलेस नेटवर्कची सुरुवात होत होती. सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलियासहित अन्य अनेक देशांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. नॉरटेल्ससोबत मी डायरेक्टर सेल्स म्हणून काम पाहिले. सेरेबियन तसेच लॅटीन अमेरिकन बाजारपेठांची माहिती घेण्याची मला संधी मिळाली. नॉरटेलसोबतच्या ११ वर्षांच्या कार्य़काळात मी अनेक देशांमध्ये काम पाहिले. प्रगत तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत करण्याची ही माझ्यासाठी सुवर्णसंधी होती.ʼ एका उद्योजक व्यक्तिला जगातील कोणतीही आकर्षक पगाराची नोकरी अधिक काळ बांधून ठेऊ शकत नाही. त्याला कायम आपले विश्व स्थापन करण्याची इच्छा असते. उदय यांच्यासोबतदेखील असेच झाले होते. २००६ साली त्यांनी यप टीव्ही यूएसए इंकची स्थापना केली. ही कंपनी त्यांनी अमेरिकेतदेखील सुरू केली. हा विचार त्यांच्याकरिता नवा नव्हता, मात्र अमेरिकेत त्यांचा हा उद्योग यशस्वी ठरला नाही. कोणताही व्यवसाय सुरू करणे, हे सोपे नसते. त्याकरिता फक्त निधीचीच आवश्यकता नसते, तर व्यवस्थापन कौशल्यदेखील गरजेचे असते. ते दिवस उदय यांच्याकरिता संघर्षपूर्ण होते.


उदय आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना सांगतात की, ʻअमेरिकेत एका बेसमेंटमध्ये मी माझे कार्यालय सुरू केले. ब्रॉडबॅण्ड तंत्रज्ञानाचा तेव्हा विस्तारदेखील झाला नव्हता. माझा उद्योजकतेचा कालखंड काही काळापूर्वीच सुरू झाला होता. मी याकरिता बाजारातून पैसे घेतले नव्हते. तर माझ्याकडे असलेल्या जमापुंजीतूनच हा व्यवसाय सुरू केला होता. माझ्या डोक्यात ही कल्पना होती की, लोकांना ब्रॉडबॅण्ड इंटरनेटच्या माध्यमातून लाईव्ह टीव्ही पाहता यावा. ʻकही भी, कभी भीʼ, ही संकल्पना तेव्हादेखील माझ्या मनात होती. मी विचार करायचो की, टीव्हीवर दाखवण्यात येणारा एखादा कार्य़क्रम बघण्यास आपल्याला वेळ नसेल, तर आपल्या वेळेनुसार तो का बघता येऊ नये?, याच विचाराने ʻलाईव्ह टीव्ही कैच अप टीव्ही ʼ संकल्पनेचा जन्म झाला आणि आज तिने मूर्त रुप धारण केले आहे.ʼ उदय यांच्याकरिता हे सर्वकाही सोपे नव्हते. खरे पाहता त्यांचा हा विचार आपल्या भूमीपासून दूर अमेरिका किंवा अन्य देशात राहणाऱ्या लोकांना भारतीय टेलीव्हिजनवरील मनोरंजनाचे चॅनेल्स उपलब्ध करण्याच्या कल्पनेतून जन्मला होता. उदय यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांच्या या स्वप्नाला मूर्त स्वरुप मिळाले. अमेरिकेत जेव्हा त्यांनी व्यापाराला सुरुवात केली तेव्हा एकाच कंपनीचा एकाधिकार होता. त्यांनी ज्या कंपनीला आपले साथीदार बनवले होते, त्यांना अचानक त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीने आपल्या बाजुने करुन घेतले होते. ते सांगतात की, ʻबरे झाले की, सहयोगी कंपनीने अचानक आमच्याशी संबंध तोडला. आम्हाला काहीसा वेळ मिळाला. आम्ही जेवढ्या ग्राहकांपर्यंत पोहोचलो होतो, त्यांना कायम ठेवण्यासाठी आम्हाला भरपूर मेहनत करावी लागली. हैदराबाद येथे शेअरिंगमध्ये एका कार्यालयात मी माझ्या कंपनीचे काम सुरू केले. आतापर्यंत मी माझी सर्व जमापुंजी खर्च केली होती. या व्यापाराबद्दल अजून लोकांमध्ये जागरुकता आली नव्हती. त्यामुळे या व्यवसायाला अधिक यश मिळत नव्हते. काही काळ वाट पाहिल्यानंतर २०१० साली मी माझा प्लॉट विकला. माझ्या परिवारासहित मित्रपरिवारानेदेखील मला काही प्रमाणात आर्थिक सहयोग केला. दरम्यान या विषयात काहीप्रमाणात जागरुकता झाली होती. त्यामुळे व्यापाराची शक्यता वाढली आणि आमचे काम पुन्हा सुरू झाले.ʼ


आज यप टीव्ही अमेरिकेतच नाही तर भारतासहित अनेक देशांमध्ये १३ भाषांसोबत २०० पेक्षा अधिक टेलीव्हिजन चॅनेलची सेवा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. आज यप टीव्ही एक यशस्वी उद्योग आहे. उदय ही सफलता खूप सहजपणे घेतात. ते सांगतात, ʻआज या पडावावर मला चांगले वाटते. लोक जेव्हा मला भेटतात, तेव्हा यप टीव्हीच्या यशाबाबत चर्चा करतात. मला वाटते की, लक्ष्य अजूनही दूर आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी बऱ्याच कठीण कालखंडातून गेलो आहे. ५० टक्केपेक्षा अधिक वेळ मी माझ्या कुटुंबापासून दूर राहिलो आहे. आजही या यशाची हवा माझ्या डोक्यात गेली नाही. आजही मी या स्टार्टअप संस्कृतीचा हिस्सा नाही. मी पाहिले आहे की, लोक किती वेगात पुढे जात आहेत. मात्र तेवढ्याच वेगाने त्यांची पिछेहाटदेखील झाली आहे. काही कठीण काळाचा सामना मलादेखील करावा लागला आहे. एका टीव्ही चॅनेलला राजी करण्यासाठी मी त्यांच्या कार्य़ालयात आठ वेळा गेलो आहे. अजून एका चॅनेलला राजी करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. मात्र जेव्हा आमचे व्यावसायिक संबंध निर्माण झाले आहेत, ते फार मजबूत आहेत. एक दोन चॅनेल जेव्हा यादीतून वगळले, तेव्हा आम्हाला चिंता वाटली. काही चूक तर होत नाही ना, असे आम्हाला वाटायचे. मात्र त्यानंतर सर्वकाही व्यवस्थित झाले. ते चॅनेल पुन्हा यप टीव्हीकडे परत आले.ʼ


ब्रॉडबॅण्डवर टेलीव्हिजन चॅनेलची सेवा देण्याच्या मुद्द्यावर उदय रेड्डी यांची कंपनी पहिल्या स्थानावर आहे. मनोरंजन चॅनेल्सच्या नंतर त्यांनी वृत्तसेवेच्या जगातदेखील पाऊल ठेवले आहे. मिडियाचे साहित्यदेखील ते देऊ लागले आहेत. अनेक योजना त्यांच्या डोक्यात अद्यापही आहेत, ज्यांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. उदय नव्या पिढीला आपल्या अनुभवाबद्दल सांगतात की, ʻआपल्या लक्ष्यावरील नजर हटवल्यास यश दूर जाऊ शकते. काही नवे करण्याच्या विचारासोबत, नवे काय आहे, याबाबत स्पष्टता मनात हवी. आज आपल्या उद्योगाच्या प्रसारासाठी आपल्याला अमेरिकेत जायची गरज नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण भारतात राहूनदेखील हे काम करू शकतो.ʼ या उद्योगात यशस्वी होताना बालपणी पाहिलेल्या स्वप्नांबद्दल बोलताना उदय सांगतात की, ʻआज ही मी या स्वप्नासाठी काम करत आहे. माझ्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत मी एका गावासाठी काम सुरू केले आहे. यात ते टेलिमेडिसिनद्वारे लहान लहान आजारपणांवर उपचारांची सुविधा तसेच शिक्षणपद्धती सरळ करण्याचे प्रयत्न करत आहेत. आज त्यांचे हे मॉडेल ते फक्त देशभरातच नाही तर दुनियाभर प्रसिद्ध झाले आहे.ʼ

लेखक : डॉ.अरविंद यादव, व्यवस्थापकीय संपादक, युवर स्टोरी

अनुवाद : रंजिता परब

Related Stories

Stories by Team YS Marathi