एक झुंज नियतीच्या 'कोड्या'शी !

भारतातल्या पहिल्या महिला केशकर्तनकार शांताबाई यादव यांची प्रेरणादायी कहाणी

0

युवर स्टोरीच्या माध्यमातून आपण शांताबाईची अनोखी कहाणी जाणून घेणार आहोत. शांताबाई... शांताबाई... या गाण्यातल्या शांताबाई नव्हे तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या खऱ्या अर्थाने नायिका असलेल्या शांताबाईंची ही विलक्षण कहाणी आहे.

पुरुषांची दाढी करून देणे, केस कापणे हे काम एखादी बाई करते असे सांगितले तर कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण शांताबाई गेल्या पस्तीस वर्षापासून हे काम करत आहेत. हे काम करून त्यांनी चार मुलींचे पालनपोषणच केले नाहीतर त्यांचे शिक्षण करून लग्न सुद्धा लावून दिली आहे.


शांताबाई श्रीपती यादव या गाव हसूर सासगिरी तालुका गडहिंग्लज इथल्या. त्यांचे वडील केस कापायचा धंदा करायचे. गावोगावी जाऊन दाढी, केस कापून ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचे. लग्नानंतर शांताबाईंचे यजमानही न्हावी काम करत असत. जवळच्याच चार- पाच गावात फिरून धंदा करायचे आणि त्याच्या मोबदल्यात धान्य गोळा करायचे. जेमतेम का होईना शांताबाईंचा संसार सुखाचा सुरु होता. म्हणता म्हणता शांताबाईंना चार मुली झाल्या. खर्चही वाढत होता. मात्र शांताबाईंचा वेळ घरकाम आणि चार मुलींची देखभाल यातच जात होता. त्यातच त्या समाधानी सुद्धा होत्या.

कसाबसा संसार सुरु होता, एके दिवशी अचानक त्यांच्या यजमानांच्या छातीत कळ आली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. शांताबाईंवर आभाळ कोसळलं होतं. काय झालं त्यांना काही कळत नव्हतं. हे सांगताना शांताबाई आजही काहीश्या भावूक होतात. त्या सांगतात, " छातीत कळ आल्याचं निमित्त झालं आणि नवऱ्यानं डोळं मिटलं ते कायमचंच, घरात चारही पोरी, मागं काही नाही, जमीनीचा तुकडाबी नाही. पैका कमवयाचं दुसरं साधन नाही. काय करावं काहीच समजत नव्हतं. महिनाभर मी नुसतंच रडून काढलं. गावातले माणसं, नातलग भेटायला यायची. वाईट झालं म्हणायची. पोरींना खाऊ देऊन निघून जायची. माझ्या माहेरची परिस्थिती गरिबीची. दोन-तीन महिने आम्हाला कसंबसं पोसलं.”


रडून रडून किती रडणार समोर चार पोरी, त्याचं शिक्षण, पोटापाण्यासाठी काहीतरी काम करावं लागणार होतं. पण काय करावं काहीच समजेना. खूप विचार करून डोकं चालेनासं झालं. कुठलाही धंदा करावं म्हटलं तर गाठीशी भांडवल नाही. कुणाचीही मदत नाही. आता काम केलं नाहीतर उपासमारीची वेळ येणार. एक दिवस यजमानांनी ठेवलेल्या वसता-या कडे लक्ष गेलं. दाढीचं सामान, आरसा. यापलीकडे ते मागे काहीच ठेऊन गेले नव्हते. शांताबाई सांगतात. मग त्यांच्या मनात विचार आला आपण नवऱ्याचा हजामतीचा धंदा पुढे चालवला तर? पण मग पुढे प्रश्न आला, पुरुषाचं काम आपल्याला कसं जमेल ? केस कापताना काही चूक झाली तर ? एखाद्याला चुकून वस्तारा लागला तर करायचं काय? असे एक ना अनेक प्रश्नांची गुंतागुंत मनात सुरु होती. एका बाईकडून कोणी माणूस दाढी करायला पुढे येईल का ?

झालं विचार सुरूच होता एके दिवशी त्यांनी शेजारच्या काकूंना त्यांच्या नातवाचे केस कापू का म्हणून विचारलं. त्यांनीही शांताबाईना प्रोत्साहन दिलं. मग शांताबाईंनी त्यांच्या नातवाला मांडीवर घेऊन केस कापायला सुरुवात केली. केस थोडेसे वाकडे कापले गेले, पण शेजारच्या काकूने समजून घेऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलं. झालं शांताबाईना धीर आला. मग गावात सर्वत्र सांगतलं

"माझ्याकडे केस कापायला या, दाढी करायला या.‘‘ पहिल्यांदा सगळ्यांनीच कानाडोळा केला मग मात्र हळूहळू एखादा अडला नडलेला येऊ लागला. शांताबाई सांगतात गिर्हाईक म्हणायचे "ये शांताबाई, कान कापशील, शांताबाई गाल कापशील, सरळ केस कापायचं” असा दम देतच पुढे बसू लागला. मग हळूहळू माझा हात कात्री-कंगव्यावर, वस्ताऱ्यावर चांगला बसू लागला”

आपल्या मुलींच्या पालनपोषणासाठी शांताबाईं हे काम सातत्याने करू लागल्या. त्यांचे काम पाहून मग गावकरीही त्यांच्या कामाला दाद देऊ लागले. तेव्हा पासून आजतागायत शांताबाईंचे हे काम सुरु आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण याच कामातून मिळालेल्या पैशातून शांताबाईंनी चार मुलींची लग्न केली. त्यांच्या चारही मुली सुखाचा संसार करत आहे. गंमत म्हणजे यातलाच त्यांचा एक जावईसुद्धा केस कापायचे काम करतो. गावातच त्याने दुकान सुरु केले आहे. शांताबाई आता ६६ वयाच्या आहेत. तरीसुद्धा त्यांना जमेल तसं काम त्या करतात. त्या समाधानी आहेत. त्या म्हणतात, “ पोटाला किती लागतं तेवढं मिळालं तरी पुरतं, अजून काय पाहिजे मरेस्तोर हातपाय चालू राहो म्हणजे झालं”