दुबईतील मजूराने आपल्या घरी जाण्यासाठी २०वेळा केल्या कोर्टाच्या फे-या

0

४८वर्षीय जगन्नाथन सेल्वराज, ज्याने मागील दोन वर्षात दुबईत न्यायालयातील चकरा मारण्यात किमान हजार किमी अंतर चालले असेल; केवळ मायदेशी परत जाण्यासाठी तिकीट मिळावे म्हणून ही धावपळ करणा-या या मजूराला आता मायदेशात येण्यास मिळाले आहे.

विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, केंद्र सरकारने त्याची मदत केली आहे. तो तामिळनाडूच्या तिरुचिलापल्ली येथील आहे आता त्याच्या गावी परत आला आहे. किडनीच्या विकाराने सध्या दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या स्वराज यांनी मागील सप्ताहात दुबईतील वकीलातीमध्ये सेल्वराज याच्या बाबत माध्यमातून आलेल्या बातम्यांबाबतचा अहवाल मागितला. सुषमा यांनी ट्वीट केले आहे की, “ आम्ही त्याला पुन्हा मायदेशी परत आणले आहे,आणि त्याच्या गावी रवाना केले आहे. त्याने २० वेळा न्यायालयात फेऱ्या मारल्या आहेत, त्यात तो किमान हजार किमी चालला असेल.”

सेल्वराज यांच्या आईचे अपघाती निधन झाले होते, पण तिच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहण्यास सुटी देण्यास त्याला नकार देण्यात आला होता. “ माझे प्रकरण क्रमांक होता ८२६ आणि दुबईत जेथे न्यायलय आहे तेथे पायी जाण्यास मला रोज दोन तास लागत असत. त्यासाठी सकाळी चार वाजता मी चालत जावून न्यायालयात माझ्या खटल्याचे कामकाज पहायला जात असे. माझ्या जवळ पंधरा दिवस रोज न्यायालयात जाण्यासाठी बस किंवा वाहनाचे पैसेही नव्हते त्यामुळे मी चालत जात असे”. सेल्वराजने सांगितले.

सोनापूर येथील सार्वजनिक बगिच्यामध्ये तो अनेक महिने राहिला, करामा भागात असलेल्या न्यायालयात जाण्यासाठी बसने काही दिरहम्स लागत होते. पण त्याच्याजवळ तेवढेही पैसे नसल्याने नाईलाज म्हणून त्याला पायी जावे लागत होते. त्यासाठी तो रोज दोन तास चालत असे.