शेवटचा दिस गोड व्हावा...

0

संवेदना हरवलेले आजचे स्मार्ट युग आहे. या युगात जिवंत माणसाला कुणी विचारत नाही, तर मेल्यावर त्याची काय अवस्था होत असेल, याचा विचारही करवत नाही. आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू ही अतिशय दु:खद घटना. मृत्यूनंतरही संबंधित व्यक्तीचा सन्मान कायम राहावा, ही मागे उरलेल्यांची इच्छा असते. गोर गरीबांना जिवंतपणी यातना होत असतात, मरणानंतर तरी त्यांचा अखेरचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मदतीला उभी राहिली आहे नवीन पनवेल येथील अंत्यविधी सेवा संस्था.

अंत्यविधी सेवा संस्थेचे संस्थापक प्रदिप ठाकरे यांनी हा उपक्रम कसा सुरू केला, असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी एक घटना सांगितली. एकदा एक अपघातग्रस्त युवक रस्त्यावर गंभीर स्थितीत पडला होता. जो तो त्यास पाहुन निघुन जाई. त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी वाढली. परंतु मदत करण्यास कुणीही पुढे येत नव्हते. पोलीसांना कळविण्याचेही कष्ट कुणी घेतले नाहीत. अशा अवस्थेत तो तरुण इतकी गर्दी असूनही एकाएकी तडफडत इहलोकी निघून गेला. बाहेर रस्त्यावर ही अवस्था तर बंद फ्लॅट संस्कृतीत त्या मृतदेहाचे काय हाल होत असतील? याची कल्पनाही करवत नाही. जिथे मनुष्यवस्तीतच असे मरण आले तर पुढे कोणी येत नाही. काय करायचे? काय करावे? हा सुध्दा विचार कोणाला पडत नाही. सारे केवळ बघ्याची भूमिका घेतात, ही फार मोठी शोकांतिका आहे.

भीषण वाळवंटात एखादी हिरवळ दिसावी किंवा काळ्याकूट्ट अंधारात उजेडाचा एखादा किरण दिसावा, त्याचप्रमाणे संवेदना हरविलेल्या मानवी वस्तीत माणुसकी हरवलेल्या वाळवंटात ‘अंत्यविधी सेवा संस्था’ आशेचा फार मोठा किरण आहे. नवीन पनवेल नजिक सुकापूर येथे सेवाभावी व्यक्तीमत्व प्रदिप ठाकरे यांनी या संस्थेला मूर्त रुप दिले आहे. अत्यल्प मनुष्यबळ असणे आणि गोरगरीब यांच्यासाठी अंत्यविधी सेवा पूर्णपणे मोफत पुरवली जात आहे. या संस्थेची स्थापना ५ वर्षापूर्वी प्रदिप ठाकरे यांनी केली. अंत्यविधी सेवा संस्थेचे बीज रोवले आणि पाहता पाहता २५० मृतदेहांचे अंत्यसंस्कार त्या त्या धर्मानुसार करून या रोपट्याचा आता वटवृक्ष होत आहे.

आपली जिवलग व्यक्ती गेल्यावर त्या शोकात माणसं बुडून गेलेली असतात. सगळ्या वातावरणात एक अनामिक मानसिक ताणतणाव असतो. त्यातच अंत्यविधीची चिंता लागून राहते. तिरडी बांधण्यापासून ते पालिकेतून मिळणार्‍या मृत्यू दाखल्यापर्यंतच्या अनेक गोष्टी दु:ख बाजूला सारून कराव्या लागतात. ही चिंता दूर करून ऍम्ब्युलन्सपासून ते अंत्यविधीसाठी मदत करण्यापर्यंत सर्व सशुल्क सेवा या संस्थेतर्फे मिळू लागली.

अंत्यसंस्कार करतेवेळी अनेक कटू तर कधी चांगले आलेले अनुभवही त्यांनी शेअर केले. या संस्थेने कोणाकडेही देणगी मागितली नाही. परंतु या संस्थेची माहिती समाजातील लोकांना समजल्यावर संस्थेला मदतीचा हातभार देण्यास दानशूर व्यक्ती आपणहून पुढे आल्या. त्यातूनच प्रोत्साहन मिळाल्याने अंत्यविधी संस्थेच्या कार्याला हातभार मिळाला आहे. काही मंडळींनी आईवडिलांच्या स्मरणार्थ तर काहींना आपल्या वाढदिवसाचा खर्चच संस्थेला दान करुन आदर्श घालून दिला आहे. कोणी देणगी पेटी आपल्या कार्यालयात ठेवत आहे. तर कोणी एका अंत्यविधीचा खर्च स्वतःहून करत आहेत. तर काहींनी स्वतःहून फोन करून अंत्यविधीवेळी अडचणीच्या प्रसंगी (पोस्टमार्टम रिपोर्ट, पोलीस स्टेशन, डॉ्नटर, आर टी ओ) सरकारी कार्यलयात खुलासा करून वेळेचा अपव्यय होत नाही. या सारख्या सर्व गोष्टींसाठी मार्गदर्शन करीत आहेत. अशा प्रकारे संस्थेचे वृक्षात रुपांतर होत आहे. गेल्या ५ वर्षात या संस्थेचा फार मोठ्या प्रमाणात जनसंपर्क झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षा संस्थेकडून वाढल्या आहेत. त्या दृष्टीने सुचना माहीती पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटीत संस्थेला हातभार लावला जात आहे.

परगावाहून येथे स्थायिक झालेल्या अनेक कुटुंबांमध्ये अल्प मनुष्यबळ गोर गरीब आणि गरजू अशांकरीता ही संस्था जास्त पुढाकार घेऊन कार्यरत आहे. गोर गरीब, गरजू, अल्प मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी एका अंत्यविधी करिता आजच्या महागाईच्या काळात अंदाजे ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. मोफत ऍम्ब्युलन्स, २५ खुर्च्या, पिण्यासाठी पाणी अशा सोयी संस्था उपलब्ध करीत असते. यासाठी फार मोठी आर्थिक कसरत करावी लागते. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन या कार्यास हातभाराची आवश्यकता आहे. ज्या दानशुरांना या उपक्रमासाठी आर्थिक मदत करायची आहे, त्यासाठी त्यांनी http://antyavidhiseva.com या बेवसाईटला भेट द्यावी.


  • अंत्यविधी सेवा संस्थेमध्ये पुढील कामे व सुविधा पुरविल्या जातात.
* सकाळी ६ ते संध्याकाळी ८ या वेळेत गरीब व गरजू लोकांचा मोफत अंत्यविधी व रुग्णवाहिका सेवा स्मशानभूमी पर्यंत दिली जाते. *सर्व गटातील लोकांना मोफत / स्वइच्छेने रुग्णवाहिका सेवा अंत्यविधीसाठी दिली जाते.
* कफीन (शवपेटी) ची मोफत सेवा
* अंत्यविधी ठिकाणी मोफत खुर्च्या व पाण्याची व्यवस्था. *रुग्णवाहिका सेवा ही पनवेल मधील हॉस्पिटलसाठी मोफत/ स्वइच्छेने दिली जाते.

जीवनात यश मिळविण्यासाठी माणसाने सतत धडपडणे गरजेचे आहे. जो माणूस जीवनात जेवढा मोठा संघर्ष करतो त्याला तेवढे मोठे यश मिळते.

Related Stories

Stories by Pramila Pawar