निसर्गाची साद जिनं ऐकली..आणि घडवून आणला एक चमत्कार !

इशिता खन्ना..निसर्ग आणि माणसात सुसंवाद घडवून आणणारी रोल मॉडेल

0

सध्या सर्वांनाच शहरात यायचंय, रहायचंय आणि आपलं भवितव्य घडवायचंय. पण असेही काही लोक आहेत, की जे भारतातल्या ग्रामीण भागात जाऊन तिथे विकासकामं करत आहेत. आणि अशाच एक आहेत इशिता खन्ना. अवघ्या ३४ व्या वर्षी इशिता खन्ना यांनी डोंगरी भागाच्या विकासासाठी ‘इकोस्फेअर’ नावाची संस्था सुरु केली. हिमाचल प्रदेशातल्या स्पिती या डोंगराळ प्रदेशात संस्थेनं अनेक विकासकामं केली आहेत. ‘इकोस्फेअर’च्या माध्यमातून या भागातल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात इशिता यांना यश आलंय. बेरी या बोरासारख्या एका फळाच्या संरक्षणासाठीही संस्थेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जातं. तसंच संस्थेच्या माध्यमातून स्थानिक ग्रामीण लोकांना रोजगार मिळू लागला आहे आणि त्यांच्या राहणीमानात मोठा बदल दिसून येतोय.

इशिता यांचा जन्म डेहराडूनमध्ये झाला. लहानपणापासूनच पर्यावरण आणि डोंगरी भागाचं त्यांना विशेष आकर्षण होतं. कधीकधी त्या आपल्या आईसोबत ट्रेकिंगलाही जायच्या. पुढच्या शिक्षणासाठी इशिता दिल्लीला आल्या आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमधून त्यांनी भूगोल विषयात पदवी मिळवली. त्यानंतर टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स या प्रसिद्ध संस्थेतून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. काही अभ्यासाशी संबंधित प्रकल्पांसाठी इशिता यांनी साधू, पर्यटक आणि मंदिर ट्रस्टच्या काही अधिका-यांशी चर्चा केली. याच प्रकारचं काम करायचं असं त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं. त्यांचा निश्चय झाला होता, आणि मनात काहीतरी करून दाखवायचा निर्धार होता.


स्पिती...स्वर्ग बहुधा इथेच असावा
स्पिती...स्वर्ग बहुधा इथेच असावा

पर्यावरणाशी संबंधित काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्या हिमाचल प्रदेशातल्या स्पिती या डोंगराळ भागात आल्या. हा भाग निसर्गसौंदर्यानं नटलेला होता. वर्षाचे सहा महिने इथे संपूर्ण बर्फ पसरलेलं असायचं. हा एक असा भाग होता, जिथे पर्यटन व्यवसाय खूपच चांगला चालला असता. पण एकही पर्यटक या भागाकडे फिरकत नव्हता. त्यातूनच या भागात विकासकामं आणि पर्यावरण रक्षण अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी करण्याची कल्पना इशिता यांच्या डोक्यात आली. पण हे कसं शक्य होऊ शकेल याबाबत मात्र अजूनही निश्चित काही सापडत नव्हतं. आणि मग इशिता यांनी तिथल्या स्थानिकांशी बोलायला, त्यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी त्या भागाची संपूर्ण महिती गोळा केली. स्पितीच्या घाटांमध्ये बोरासारखे लहान आकाराचे बेरीचे फळं उगवायचे. या फळांमध्ये सी व्हिटामिनचं मोठं प्रमाण असतं. आणि त्यामुळेच त्यांना प्रचंड मागणी असते.

२००४ मध्ये इशिता यांनी नोकरी सोडली आणि त्यांच्या दोन मित्रांसोबत ‘म्यूस’ नावाची एक सामाजिक संस्था अर्थात एनजीओ सुरु केली. बेरी गोळा करण्यासाठी त्यांनी स्थानिक महिलांचा एक गट तयार केला आणि लोकांना बेरी गोळा करण्याचं प्रशिक्षण दिलं. तिथल्या स्थानिकांना फायदा व्हावा केवळ याच उद्देशाने ही योजना सुरु केली होती. आणि त्यामुळेच कोणत्याही मध्यस्थाचा यामध्ये समावेश नव्हता. लेह बेरीसोबत माल खरेदीचा करारही करण्यात आला. याचदरम्यान जर्मन टेक्निकल को-ऑपरेशन अर्थात जीटीजेड या कंपनीने त्यांना मदत देऊ केली आणि त्यातून बेरीवर प्रक्रिया करण्यासाठीच्या मशीन्स खरेदी करण्यात आल्या. या फळांची स्वच्छता आणि सुरक्षेचं काम स्थानिक महिलांकडे देण्यात आलं. २००४मध्ये इशिता खन्ना यांनी स्वत:चा नवीन ब्रॅण्ड सुरु करण्याचा निर्णय घेतला.


एकीकडे इशिता यशाच्या शिखरावर एक एक पाऊल पुढे जात होत्या, मात्र त्याचबरोबर त्यांना या भागात पर्यटन व्यवसाय विकसित करण्याचा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांना वाटलं, की जर आपण पर्यटकांना नवीन काहीतरी दिलं, तर अधिकाधिक पर्यटक या भागाकडे वळतील. मग इशिता यांनी स्थानिकांशी चर्चा केली आणि पर्यटकांना स्थानिकांच्या घरीच स्वस्तात रहाण्याची व्यवस्था केली. यामुळे स्थानिकांना पैसे तर मिळतच होते, मात्र पर्यटकांनाही या डोंगरी भागाला अगदी जवळून पहाण्याची, अनुभवण्याची संधी मिळत होती. पर्यटक इथे येऊन स्थानिक लोकांच्या घरी राहू लागले. त्यांच्यासोबत जेऊ-खाऊ लागले, त्यांच्याशी संवाद साधू लागले. याशिवाय काही स्थानिक तरुणांना या पर्यटकांना आसपासच्या भागामध्ये फिरवण्याचंही प्रशिक्षण देण्यात आलं. पर्यटकांसाठी तर हा सर्व एक नवीन आणि मोठा मजेदार अनुभव होता. यामुळे एक मोठा फायदा झाला. अधिकाधिक पर्यटक या भागाला भेट देऊ लागले. इंटरनेटच्या माध्यमातून या भागाबद्दल आणि इथल्या या ‘विशेष’ पर्यटनाबद्दल माहिती देण्यात आली. त्यामुळे आता फक्त भारतातलेच नाही तर परदेशातले पर्यटकही इथे येतात. मात्र या सगळ्यात निसर्गाला कोणतीही हानी पोहोचणार नाही याची कटाक्षानं काळजी घेतली जाते. प्लॅस्टिकचा वापर तर इथे अगदी नगण्य स्वरूपात केला जातो. इशिता यांनी सुरु केलेल्या ‘पर्यटन कार्य योजने’च्या माध्यमातून दरवर्षी ३५ ते ४० लाख रुपयांचा नफा होऊ लागलाय.

'इकोस्फेअर'..हिमाचलच्या डोंगरात जन्मलेला आशेचा किरण
'इकोस्फेअर'..हिमाचलच्या डोंगरात जन्मलेला आशेचा किरण

‘इकोस्फेअर’च्या वर्षभराच्या आर्थिक उलाढालीत ५० टक्के रक्कम ही त्यांच्या स्वत:च्या योजना आणि सुविधांमधून उभी रहाते. आणि उरलेली ५० टक्के रक्कम ही आर्थिक मदत करणा-या विविध संस्थांच्या माध्यमातून येते. इशिता खन्ना यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी २००८ मध्ये ‘वाईल्ड एशिया रिस्पाँसिबल टूरिजम अवॉर्ड’ तर २०१० मध्ये ‘वर्जिन हॉलिडे रिस्पॉन्सिबल टूरिजम अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं. याबरोबरच २०१० मध्येच त्यांचा ‘सीएनएन आयबीएन रिअल हिरोज अवॉर्ड’नेही सन्मान करण्यात आला.

या पुरस्कारांमुळे इशिता यांना नव्या कामांसाठी प्रेरणा मिळते. त्यांना मार्गदर्शन मिळतं. खरंतर एवढ्या लहान वयात एवढं मोठं काम करुन दाखवणं हे काही सोपं काम नव्हतं. पण इशिता खन्ना यांनी ते करुन दाखवलं. इशिता यांच्या संस्थेने एकीकडे स्थानिकांना रोजगार देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावला, तर दुसरीकडे स्पितीच्या डोंगराळ प्रदेशात पर्यटन व्यवसायालाही चालना दिली. शिवाय पर्यावरण रक्षणासाठीही अनेक उपाययोजना केल्या. आणि त्यामुळेच इशिता खन्ना आजच्या युवा पिढीसाठी एक आदर्श ठरल्या आहेत. उत्तुंग यशाचा आणि ख-या समाजसेवेचा.

Related Stories