भिवंडीतील खारबाव गावात होणार १०० टक्के दारू बंदी ; विशेष ग्राम सभेत ग्रामस्थांचा क्रांतीकारी निर्णय!

0

न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात दारूबंदीची मोहीम जोरदार सुरु आहे . मात्र ग्रामिण भागात अनेक ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू आजही सुरूच आहे . गावठी हातभट्टीच्या दारूमुळे ग्रामीण भागातील अनेक संसार उध्वस्त झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दारूमुळे संसाराची व जीविताची होणारी हाणी लक्षात घेवून भिवंडीतील खारबाव गावातील ग्रामस्थांनी संपूर्ण गावात १०० टक्के दारू बंदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. 


या ग्राम सभेत महिलांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे गावात दारूबंदीचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी कुणी ना कुणी छुप्या मार्गाने गावठी दारू बनविण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गावात आणि आजूबाजूच्या परिसरात दारू बनविण्यासाठी लागणारा नवसागर , काळा गुळ व इतर कच्चा माल अशा वस्तू देखील गावात कोणी आणू नये असाही निर्णय या ग्राम सभेत घेण्यात आला आहे . मात्र यासाठी शासकीय प्रशासन पोलीस यंत्रणेच्या मदतीची आवश्यकता असून तालुका पोलिसांनी या दारू बंदी मोहिमेला सहकार्य करून या परिसरात दारू बनविणाऱ्या व विकणारयानवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी ग्रामस्थांनी या ग्रामसभे प्रसंगी केली आहे . 

दारू बंदी साठी आयोजित केलेल्या या विशेष ग्राम सभेत खारबाव गावचे सरपंच वैशाली रमाकांत पाटील , उपसरपंच अशोक पालकर , पोलीस पाटील किरण मुकादम , ग्राम विकास अधिकारी बी बी पाटील यांच्यासह खारबाव गावचे जेष्ठ व प्रतिष्टीत नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते . खारबाव ग्राम पंचायतीने घेतलेल्या या दारू बंदीच्या निर्णयाचा महिला वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.