पन्नास रुपये रोजाची पॅट्रिशिया आता कमवते दिवसाला दोन लाख

पन्नास रुपये रोजाची पॅट्रिशिया
आता कमवते दिवसाला दोन लाख

Tuesday October 13, 2015,

5 min Read

पॅट्रिशिया नारायण… देशभरातील महिला उद्योजकांतले एक आघाडीचे नाव… स्वामी विवेकानंदांचे स्मारक जिथे आहे तिथे म्हणजे कन्याकुमारीत ही गोड कन्या जन्मली. आयुष्य मात्र कटू अनुभवांनी भरलेले अन् भारलेले… एक प्रसंग तर असा आला, की वाटले सगळेच संपले... आता संपवून टाकावे स्वत:लाही… रस्ताच दिसत नव्हता. सगळेच धुसर झालेले. ड्रग्सच्या आहारी गेलेला नवरा. भरीला दारू. नवऱ्याचे घरी असणे आणि परतणे म्हणजे पॅट्रिशियासाठी पराकोटीचे जीवघेणे. मग स्वत:च स्वत:शी नाते जुळवले… स्वत:च स्वत:शी संवाद साधून पाहिला… शंका-कुशंकांचे, चिंता-चिंतनाचे सगळे मळभ दूर झाले. एकेकाळी शून्यवत झालेली पॅट्रिशिया आज यशाच्या शिखरावर आहे…

स्वयंपाकाचा पॅट्रिशियाला बालवयापासूनच नाद. याच नादातून कॉलेजलगत रेस्टॉरंट चालवणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात ती पडली. जातीपातीचा विचार गळून पडलेला होता, हे चांगले झाले असले तरी या प्रेमविवाहात विवेक कुठेही नव्हता. पॅट्रिशियाला लवकरच कळले, की आपण एक चुकीचा माणुस निवडलाय. तिच्या नवऱ्याला कितीतरी वाईट सवयी होत्या. व्यसनांत तो आकंठ बुडालेला होता. लेकरांमध्ये पॅट्रिशियाचा जीव अडके. तिने त्याला आणि संसारालाही सावरण्याचा आपल्या परिने प्रयत्न केला. हरली.

उभे राहायचे तर स्वत:च्याच पावलांवर

लेकरांना घेऊन आईवडिलांकडे चेन्नईला परतली. आता उभे राहायचे तर स्वत:चीच पाउले होती. प्रयत्न सुरू झाला. आईच्या ऑफिसमधील लोकांसाठी जेवणाचा डबा करून देणे, प्लास्टिकची फुले विकणे असे कायकाय तिने केले. रात्र-रात्र जागून ती फुले बनवत असे. दिवसा हॉटेल्सना पाठवी. ओळखीतले एक डॉक्टर होते. त्यांच्याकडून कळले, की सरकार शहरातल्या काही भागांमध्ये फुड स्टॉलसाठी परवानगी सध्या देते आहे. सरकारची अट एवढीच होती, की अपंग मुलांना या फुड स्टॉलमधून कामावर ठेवावे लागेल. त्यांना प्रशिक्षणही द्यावे लागेल. हे डॉक्टर अपंग मुलांसाठी शाळाही चालवत असत. पॅट्रिशियाला अशाप्रकारे मरिना बिचवर एक फुड स्टॉल लावण्याची परवानगी मिळाली.

पॅट्रिशिया पेटलेली तर होतीच. तिने ही संधी एक आव्हान म्हणून स्वीकारली. दुपारी ३ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत मरिना बिचवर कटलेट, समोसा, आइस्क्रिम, शरबत आणखी बरेच काही अशी सुरवात झाली.

पहिल्या दिवशी विकली एक कॉफी

पॅट्रिशिया सांगतात, ‘’२० एप्रिल १९८१ हा तो दिवस होता. दिवसभरात फक्त एक ग्राहक आला आणि नुसती कॉफी प्यायला. इतके पैसे, इतकी मेहनत ओतली आणि दिवसाला एक कॉफी विकली जाईल तर कसे व्हायचे… रात्री कसाबसा डोळा लागला, पण दुसरा दिवस जणू दसऱ्यासारखा… दिवसभर हाताला उसंत नव्हती. शनिवार होता तो. दुकान उघडल्यापासून ग्राहक उन्मळलेले होते. प्रत्येक जण बोटं चाटत होता. गल्लाही ओसंडून वाहत होता. मस्त कमाई झाली. थोड्याच दिवसात आमचा स्टॉल मरिना बिचची शान म्हणून मानाचा झाला. मी ठरल्याप्रमाणे दोन मुकबधीर मुलांना कामावर ठेवलेले होते. दोन्ही मुले कष्टाळू होती.’’

फुड स्टॉलला मिळालेल्या प्रतिसादाने पॅट्रिशियामध्ये नवा जोम संचारलेला होता. गत काळातल्या वेदनाही आता विरलेल्या होत्या. काही भव्यदिव्य करावे, असे वरचेवर मनात येऊ लागलेले होते. नशिबाची साथही त्यांना मिळत गेली. मरिना बिचवर दररोज येणाऱ्या प्रतिष्ठित मंडळींपैकी एक गृहस्थ हे झोपडपट्टी पुनर्वसन मंडळाचे सदस्य होते. त्यांना पॅट्रिशियाच्या हाताची चव आवडे. आपल्याकडल्या कँटिनचे कंत्राट आचारी म्हणून पॅट्रिशियाला त्यांनी दिले.

पुन्हा वाईट दिवस नवऱ्याच्या रूपात

आता पॅट्रिशियाकडे दोन आघाड्यांवर लढणे आले. ती लढली. वेळ पुढे सरकत गेला, तसे त्यांना जाणवत गेले, की अरे चांगले दिवस येताहेत. वाईट दिवस सरलेले आहेत. पण खरं तर वाइट दिवस अगदीच संपलेले नव्हते. पुन्हा त्याच नवऱ्याचे रूप घेऊन ते परतले म्हणजे अक्षरश: त्याच नवऱ्याच्या रूपात! पॅट्रिशियाकडे आता भरपूर पैसे आहेत म्हटल्यावर दारुडा नवरा तर्रर्र येऊ लागला आणि पैसे हिसकवू लागला. पॅट्रिशियाची दया बघा. नवऱ्याला आणखी एक संधी त्यांनी दिली. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. पण तिथूनही तो पळून गेला. पुढे पॅट्रिशियाने ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोर्ट मॅनेजमेंट’च्या कॅटरिंगचे कंत्राट मिळवले.

चेन्नई शहरापासून हे ठिकाण २५ किलोमीटर अंतरावर होते. बस ने त्या ये-जा करू लागल्या. पुढे स्टाफ क्वार्टरमध्ये त्यांना खोली मिळाली. पॅट्रिशिया लेकरांनाही इथं घेऊन आल्या.

image


नवऱ्याने इथेही त्यांचा पिछा पुरवलाच. पुन्हा ये रे माझ्या मागल्या… पिऊन यायचे आणि भांडायचे. मग पॅट्रिशियासमोर कायद्याशिवाय मार्ग उरला नाही. कोर्टाचे दार त्यांनी ठोठावले. घटस्फोट झाला. आता लेकरं एके लेकरं आणि काम एके काम…

याच दरम्यान त्यांनी एनआयपीएमजवळील एका मेडिकल कॉलेजचे आणि एका डेंटल कॉलेजचे अशी कॅटरिंगची दोन कंत्राटे मिळवली. बहुतांश लोक त्यांच्या कामावर प्रसन्न होते. काही जळाऊ वृत्तीचेही होतेच. पॅट्रिशिया यशस्वी होत गेल्या तसतशी तर या जळकुट्ट्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली होती. असेच काही कारणांस्तव एनआयपीएमचे कंत्राट १९९६ च्या सुमाराला हातचे गेले. मरिना बिचवरला स्टॉल आणि तिघा कॉलेजांतील कँटिनचे काम मात्र मस्त चाललेले होते.

आईच्या ममतेने खाऊ घातले...

पॅट्रिशिया सांगतात, ‘‘खाण्या-पिण्याचा विषय लोकांच्या आरोग्याशी निगडित असतो. म्हणूनच मी कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही. आपण आनंदाने खाऊ शकू तेच लोकांना खाऊ घातले. हेच माझ्या यशाचे खरे कारण ठरले. आता प्रत्येकच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नाही. खासगी जीवनात मी दु:खीच होते, पण हे दु:ख मी पदार्थांच्या स्वादात कधी शिरू दिले नाही. दु:ख विसरून आपल्या लेकरांसाठी आई करते, तितक्या वात्सल्याने मी लोकांसाठी स्वयंपाक केला.’’

‘एनआयपीएम एपिसोड’नंतर पॅट्रिशियाने लवकरच स्वत:चे एक रेस्टॉरंट सुरू केले. मुलंही आता मोठी झालेली होती. पुढे काही दिवसांनी ते बंद करून आपल्या मुलासह त्या परदेशी निघून गेल्या. तिन वर्षांनी परतल्या. सिंगापूरच्या एका विख्यात रेस्टॉरंटची शाखा सुरू केली. बालपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून शहरात एक फुलांचे दुकानही सुरू केले.

लेकीचे सोडून जाणे...पुन्हा संपणे

मुलाचे, मुलीचे लग्न लावून दिले. पॅट्रेशियाला वाटले आता जीवन रुळावर आले, पण नियतीला हे मंजूर नव्हते. मधुचंद्रावरून परतत असताना एका रस्ता दुर्घटनेत लाडकी लेक आणि जावई मरण पावले. पॅट्रेशिया आतून खचलेल्या होत्या. सगळे काही संपले, असेच पुन्हा एकदा झाले. पुढे बरेच दिवस या आघातामुळे त्यांचे कामातून लक्ष उडालेले होते.

बुडत चाललेला व्यवसाय मग मुलाने आपल्या हाती घेतला. जुन्या विश्वासातल्या माणसांना सोबत घेतले आणि कामात स्वत:ला झोकून दिले. पॅट्रिशियाचंच पोर ते. कष्टाचं आणि कष्टाच्या जोरावर यशाचं बाळकडू प्यायलेलं.

‘‘सध्या आमचे चार ब्रँड मार्केटमध्ये आहेत. कॅटरिंगचे काम आता आम्ही बंद केलेय. एकट्या चेन्नईमध्ये आमचे १२ फुड कोर्ट छान चाललेले आहेत. मीही आता जुनी दु:खे विसरून कामात गुंतलेले आहे.’’

पॅट्रिशिया यांचा आवाज जड झालेला असतो. लेकीच्या स्मृतींची किनार त्याला असते.

२०१० च्या जानेवारीमध्ये पॅट्रिशिया यांना ‘फिक्की’कडून ‘सर्वश्रेष्ठ महिला उद्योजक’ हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला. विपरित परिस्थितीचा सामना करत कॅटरिंग व्यवसायातील यशाद्दल हा पुरस्कार होता. नंतर ‘रिडिफॅ डॉट कॉम’नेही त्यांचे प्रोफाइल आपल्या वेबसाइटवर अपलोड केले.

मुलीच्या मृत्यूनंतर पॅट्रिशिया यांना कळले, की दुर्घटनेनंतर तिथे अपघातातील जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्थाच नव्हती. वेळेत मुलीला अन् जावयाला हॉस्पिटलमध्ये नेता आले असते तर ते वाचले असते, असे अजूनही पॅट्रेशिया यांना राहून-राहून वाटते. म्हणून मग त्यांनी एक धर्मार्थ रुग्णवाहिका लोकार्पित केली. कितीतरी अपघातग्रस्तांना या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आज दिलासा मिळतोय.